फलटण येथील नाईक निंबाळकर घराणे हे तुळजाभवानीचे निस्सिम भक्त होते. त्यांनी तुळजापूर येथील मंदिराचा जिर्णोद्धार करून अनेक सुधारणा केल्या होत्या. यवनांच्या चाकरीत असतानाही त्यांनी देव व धर्मावरील आपली श्रद्धा ढळू दिली नाही. त्यांनी आपल्याकडे असलेल्या माढा, मोहोळ, करमाळासह ९६ खेड्यांच्या जहागिरीत अनेक मंदिरांचा जिर्णोध्दार केला व अनेक नवी मंदिरे उभारली. आपले श्रद्धास्थान असलेल्या तुळजा भवानीचे प्रतिरूप म्हणून माढा येथे त्यांनी माढेश्वरी देवीचे मंदिर उभारले. सोलापूरची रूपाभवानी, करमाळ्याची कमलाभवानी आणि माढ्याची माढेश्वरी ही सोलापूर जिल्ह्यातील देवींची प्रसिद्ध मंदिरे आहेत.
हेमाडपंती स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम असलेले हे मंदिर धार्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे मानले जाते. असे सांगितले जाते की जहागीरदार बाबाजी नाईक – निंबाळकर यांचे नातू रावरंभा निंबाळकर यांना निजामाकडून फलटणची जहागीरदारी मिळाली होती. या जहागिरीत उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील नळदुर्ग, भूम, तुळजापूर हा भाग तर सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, करमाळा, शेंद्री, रोपळे, दहीगाव तसेच परभणी व अहमदनगर जिल्ह्यातील काही गावे, २२ हजारांची मनसब, पालखी आणि मशालीचा मान होता. रावरंभा हे अनेक वर्षे तुळजापुरात राहिल्याने त्यांची
तुळजाभवानी देवीवर श्रद्धा जडली होती. त्यांनी तुळजापूरच्या मंदिराचा जिर्णोद्धार केला. त्यानंतर रावरंभा निंबाळकर यांनी करमाळ्याचे कमला भवानी मंदिर बांधले व सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात माढ्यातील माढेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार करून त्या जागी भव्य मंदिर बांधले.
या जीर्णोद्धाराबद्दलची कथा अशी की माढा व करमाळा परिसराचे जहागीरदार असलेल्या रावरंभा निंबाळकर यांच्यामागे मोघलांची फौज लागली होती. मोघलांपासून बचाव करताना त्यांनी माढा येथील पूर्वीच्या छोट्याशा माढेश्वरी देवीच्या मंदिराचा आसरा घेतला. यावेळी त्यांनी देवीला आपले प्राण वाचविण्याचे साकडे घातले. तसेच मोघलांपासून बचाव झाल्यास मोठे मंदिर उभारण्याचा नवस केला. यानंतर निंबाळकर वाचले आणि त्यांनी या मंदिराची उभारणी केली.
सतराव्या शतकात जिर्णोद्धार झालेले हे मूळ मंदिर कोणत्या काळातील असावे, याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही.
माढा शहराच्या मध्यवर्ती भागात माढेश्वरी देवीचे मंदिर स्थित आहे. मंदिर प्रांगणाभोवती दगडी तटभिंती आहेत. या तटभिंतीत असलेल्या एका बहुमजली प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या स्तंभशाखांवर द्वारपाल चित्रे रंगविलेली आहेत. कमानीच्या आकाराच्या या प्रवेशद्वाराच्या वरील बाजुला नगारखाना आहे. या प्रवेशद्वारावर असलेल्या शिखरावरून या मंदिराची भव्यता लक्षात येते. तटभिंतीच्या आतील बाजूला ओवऱ्या बांधलेल्या आहेत. देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक विश्रांती, भोजन व धार्मिक विधींसाठी या ओवऱ्यांचा वापर करतात. प्रांगणात मंदिरासमोर डावीकडे दोन आणि उजवीकडे एक अशा तीन दीपमाळा आहे. मुख्य मंदिरासमोर असलेल्या दगडी बांधणीच्या हवनमंडपाला वैशिष्ट्यपूर्ण शिखर व त्यावर अनेक लहान लहान कळस आहेत. हवनमंडपातील चार दगडी स्तंभ एकमेकांशी महिरपी कमानीच्या आकाराने जोडलेले आहेत. चार स्तंभांच्या मध्यभागी हवनकुंड आहे. दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी होमहवन आणि इतर धार्मिक विधी संपन्न होतात.
सभामंडप, अंतराळ व तीन गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे.
अर्धखुल्या स्वरुपाच्या सभामंडपात पुढील बाजूस भाविकांच्या सोयीसाठी दर्शनमार्गाची रचना केलेली आहे. हा सभामंडप मूळ मंदिरासमोर नंतरच्या काळात बांधण्यात आलेला आहे. येथील अंतराळ व गर्भगृहाचे बांधकाम पूर्णपणे दगडांत आहे. गर्भगृहात सिंहासनावर माढेश्वरी मातेची वालूकाश्मापासून बनलेली मुख्य मूर्ती आहे. या चतुर्भुज मूर्तीच्या एका हातात ढाल, दुसऱ्या हातात शंख-चक्र, तिसऱ्या हातात महिषासुराचे मस्तक व चौथ्या हातात त्रिशूल आहे. या गर्भगृहाच्या उजवीकडील उपगर्भगृहात विठ्ठल-रुक्मिणी व डावीकडे शिवलिंग आहे. याशिवाय मंदिर परिसरात अनेक देवतांच्या प्राचीन मूर्ती व विरगळ आहेत.
नवरात्रीच्या उपवासानंतर दसऱ्याला येथे देवीची पालखी निघते. या पालखी सोहळ्यानंतर देवी निद्रेस जाते. कोजागिरी पौर्णिमेला येथे मोठा उत्सव असतो. याच दिवशी येथे मोठी जत्रा असते. या मंदिराची एक वेगळीच परंपरा आहे. बारापैकी नऊ बलुतेदारांना माढेश्वरी देवीच्या वाहनांचा मान देण्यात आला आहे. यामध्ये माने घराण्याला सिंह, काटे घराण्याला मोर, रणदिवे घराण्याला वाघ, जाधव घराण्याला गरुड, मरकड समाजाला नंदी आणि भांगे घराण्याला घोडा हे वाहन देण्यात आले आहेत. नवव्या स्थानी हत्तीचा मान आहे. हा मान गावातील माळी समाजाला आहे. उत्सव काळात देवीची सर्व वाहने मंदिरात एकत्रित येतात. त्यानंतर त्या वाहनांवर देवीच्या मूर्ती बसवून रात्री बारा वाजता गावातून वाजत-गाजत छबिना निघतो तो पहाटे पाचपर्यंत चालतो. यावेळी मंदिर आणि परिसराला आकर्षक रोषणाई केली जाते. माढेश्वरी देवीचे स्थान हे अत्यंत जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे परिसरातील कोणत्याही विवाह सोहळ्याची पहिली भोगी (केळ्याची घट्ट दह्यातील शिकरण) देवीला दिल्याशिवाय लग्नाच्या तयारीला सुरूवात होत नाही.