बाळाजी बाजीराव ऊर्फ श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी पर्वतीच्या पायथ्याचे सुशोभीकरण हाती घेतले. त्यासाठी पर्वतीवरील देवदेवेश्वर मंदिर बांधून पूर्ण झाल्यानंतर १७५० मध्ये त्यांनी पर्वती परिसरातील आंबिल ओढ्याजवळ मोठ्या तलावाच्या बांधकामाला सुरुवात केली. असे म्हटले जाते की, तीन वर्षे या तलावासाठी खोदकाम सुरू होते.
या तलावाचे बांधकाम कूर्मगतीने सुरू असल्याची माहिती नानासाहेब पेशव्यांना मिळाली. एक दिवस ते तेथे गेले आणि हत्तीवरून खाली उतरून एक मोठा दगड त्यांनी स्वतः उचलून तलावासाठीच्या बांधापर्यंत नेऊन ठेवला. नानासाहेबांच्या या कृतीने मजुरांनी मान खाली घातलीच, पण आजूबाजूचे नागरिकही खजील झाले. त्यानंतर या कामाला वेग आल्याचे सांगितले जाते. २५ एकरवर पसरलेल्या तलावामध्ये २५ हजार चौरस फूट एवढा बेटासारखा भूभाग आहे. येथे सुंदर बाग तयार करून नानासाहेबांनीच तिचे नाव ‘सारसबाग’ ठेवले. सारस पक्षी या पाणवठ्यावर येत असत म्हणून असे नामकरण झाल्याचेही म्हटले जाते. त्यानंतर १७८४ मध्ये श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांना थेऊरच्या गणपतीने दृष्टांत देऊन तलावाचे पुनरुज्जीवन करण्यास सांगितले. तेव्हा तलावाचे नूतनीकरण करीत माधवरावांनी तेथे पेशव्यांचे दैवत म्हणून गणपती मंदिर बांधले. उजव्या सोंडेचे रूप असलेला हा गणपती तेव्हापासून आजतागायत भाविकांच्या पुण्यातील महत्त्वाच्या श्रद्धास्थानांपैकी एक आहे. तळ्यातील गणपती म्हणूनही तो प्रसिद्ध आहे.
सारसबाग गणपती मंदिराच्या आजूबाजूचा पाण्याने भरलेला तलाव कालांतराने कोरडा पडला. त्यानंतर या भागाचा पुनर्विकास होऊन आताच्या बागेचे स्वरूप आले. एकेकाळी श्रीमंत नानासाहेब काही महत्त्वाच्या चर्चा या तलावात नौकाविहार करीत घडवून आणत. विशेष म्हणजे मराठी न समजणाऱ्या आफ्रिकन वंशाच्या हबशी लोकांकडे किंवा कर्णबधिर नावाड्यांकडे नौकांचे सुकाणू दिले जात असे. सवाई माधवराव, महादजी शिंदे व नाना फडणवीस यांच्यात येथील नौकांवर झालेल्या बैठकांची नोंद ऐतिहासिक दस्तावेजांत सापडते.
मागील सव्वादोनशे वर्षांमध्ये मंदिर आणि या परिसरात अनेकदा नूतनीकरण आणि पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले. ब्रिटिश राजवटीत १८४२ मध्ये येथे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याची नोंद आहे. या परिसराला आताचे रूप प्राप्त झाले ते १९६९ मध्ये. पुण्याचे तत्कालीन आयुक्त भुजंगराव कुलकर्णी यांनी तलावाच्या जागेत सुंदर उद्यान करण्याची योजना आखली. पुणे महापालिकेतर्फे हा प्रकल्प राबविण्यात आला. सुशोभीकरण करताना येथे नियोजनबद्ध वृक्षलागवड, जॉगिंग ट्रॅक, आसन व्यवस्था यांबरोबरच पेशवे पार्कही उभारण्यात आले.
पेशवाई काळातील पारंपरिक वास्तुशैलीचे दर्शन घडविणाऱ्या या मंदिरातील लाल मातकट रंगाचे खांब आणि भिंती, उंच कमानी, निमुळते होत जाणारे शिखर या बाबी मंदिराच्या भव्यतेत भर घालतात. पूर्वाभिमुख असलेल्या मंदिराचा सभामंडप ४० फूट रुंद व ४८ फूट लांब आहे. सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना लहान मंडप आहेत. या मंडपांभोवती कमानीदार महिरपी आहेत. पेशवाईतील दिवाणखान्यातील नक्षीकामानुसार या शिल्पांचे कोरीव काम आहे. मुख्य सभामंडपात कमी उंचीचे कोरीव कठडे आणि त्यावर पितळी कळस आहेत. मंदिराचे शिखर उत्तर भारतातील हिंदू मंदिरांप्रमाणे उभे, चौकोनी व निमुळते आहे. दिल्लीतील लक्ष्मीनारायण मंदिर व गीता मंदिराचे शिखर अशा प्रकारचे आहे.
शिखराची उंची साधारणतः ३६ फूट आहे. या मंदिरात ६८ कमानी आहेत आणि त्यामध्ये धनुष्यबाण व नाग या भारतीय संस्कृतीतील प्रतीकांचा वापर करण्यात आला आहे. सभामंडपात संगमरवरी फरशा आहेत. छतावर सुंदर अशी सोनेरी नक्षी रेखाटलेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात गुलाबी संगमरवराचा वापर करण्यात आला आहे. गाभाऱ्याच्या उत्तर व दक्षिण भिंतीमध्ये दारे आहेत.
मंदिराच्या प्रांगणात सभागृह, ग्रंथालय, अभ्यासिका व ध्यानमंदिर आहे. येथे असलेल्या संग्रहालयात दगड, हस्तिदंत, लाकूड, धातू, कागद व शिंपले यांपासून बनविलेल्या गणेशमूर्ती पाहायला मिळतात.
नवसाला पावणारा गणपती म्हणून हजारो भाविक या स्थानाला भेट देतात. पर्वतीच्या श्री देवदेवेश्वर संस्थानकडून मंदिराची देखभाल केली जाते. आधुनिक, गजबजलेल्या पुण्यात वृक्षराजींनी नटलेला हा परिसर भाविकांबरोबरच फिरायला येणाऱ्यांचेही पसंतीचे स्थान आहे. सकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांना मंदिरातील गणेशाचे दर्शन घेता येते.