पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकी एकादशीला येणाऱ्या सर्व पालख्यांचा अखेरचा मुक्काम ज्या स्थळी असतो, त्याच प्रमाणे जेथे अखेरचा रिंगण सोहळा पार पडतो, ते गाव म्हणजे वाखरी. तीर्थक्षेत्र पंढरपूरनजीक वसलेल्या या गावामध्ये अनेक अध्यात्मिक स्थळे आहेत. लक्ष्मणदास महाराज मंदिर हे त्यांतीलच एक विशेष प्रसिद्ध श्रद्धास्थान आहे. लक्ष्मणदास महाराज हे एकोणिसाव्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक संत होते. वाखरी येथील त्यांचे समाधीस्थान, तसेच त्यांनी स्थापन केलल्या गणपती व दत्तपादुकांचे मंदिर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
वाखरी या गावास इतिहासपूर्वकाळापासूनचा इतिहास आहे. थोर संशोधक दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी त्यांच्या ‘मिथ्स अँड रिॲलिटी’ या ग्रंथात असे म्हटले आहे की पंढरपूरच्या वार्षिक यात्रांचे मूळ कृषिपूर्व समाजातील असले पाहिजे. इतिहासपूर्व काळात वाखरी हेच या यात्रेचे शेवटचे ठिकाण होते. कालांतराने या यात्रेस विठ्ठलाच्या भक्तीचा रंग प्राप्त झाला. पंढरपूरच्या वारीस पालखी सोहळ्याचे सध्याचे स्वरूप एकोणिसाव्या शतकात प्राप्त झाले. इ.स. १८३२ मध्ये थोर विठ्ठलभक्त हैबतबाबा आरफळकर यांनी पालखीच्या वारीस शिस्तबद्ध रूप दिले. महाराष्ट्रातून येणाऱ्या या पालख्या आजही प्रथम वाखरी येथे एकत्र येतात. तेथे पूजा अर्चा होते. भव्य रिंगणसोहळा होतो. पंढरीच्या यात्रासोहळ्यात अशा प्रकारे वाखरीस महत्त्वाचे स्थान आहे.
या गावामध्ये एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी लक्ष्मणदास महाराज यांचे आगमन झाले. महाराजांचे बैरागी घराणे मूळचे साताऱ्यातील होते. त्यांच्या वडिलांचे नाव तुलसीदास असे होते. हे घराणे निंबार्क संप्रदायाशी संबंधित होते. निंबार्क हा वैष्णव संप्रदायातील द्वैताद्वैत तत्वज्ञान मानणारा एक वर्ग आहे. कुमार, हंसा, सनकादी आदी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या संप्रदायाचे प्रवर्तक निंबार्क हे एक तेलुगू ब्राह्मण होते. त्यांच्या काळाबद्दल विद्वानांत एकवाक्यता नाही. ते सातव्या ते अकराव्या शतकात होऊन गेले असे मानण्यात येते. लक्ष्मणदास महाराजांना निंबार्कांच्या वैष्णवभक्तीचा वारसा त्यांच्या घरातूनच लाभला होता. त्यांच्याविषयी असे सांगण्यात येते की ते अजानुबाहू होते. कमरेस पंचा व अंगावर उपरणे एवढाच त्यांचा वेश असे. ते तोतरे बोलत असत. क्वचितप्रसंगी ते अन्नग्रहण करीत असत. गुरुंच्या आदेशानुसार ते वाखरी येथे येऊन राहू लागले. येथे एका पर्णकुटीत त्यांचे वास्तव्य असे. ते रोज पहाटे उठून पंढरपूरला विठ्ठलदर्शनासाठी जात असत.
असे सांगण्यात येते की शाहू महाराजांनी त्यांना वाखरीत मोठी जमीन दिली. महाराजांचा मळा म्हणून ती ४५ एकरांची जागा ओळखली जाते. या ठिकाणी महाराजांनी खोदलेली विहिर, तसेच त्यांनी स्थापन केलेला उजव्या सोंडेचा गणपती व दत्ताच्या पादुकांचे स्थान आहे. लक्ष्मणदास महाराजांना दत्ताचा अनुग्रह प्राप्त झाला होता, असेही सांगण्यात येते.
ज्येष्ठ शुद्ध द्वितिया, शके १८२९, इ.स. १९०७ रोजी लक्ष्मणदास महाराजांचे निधन झाले. असे सांगितले जाते की त्यांच्या अंत्ययात्रेस गोंदवले येथील ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज उपस्थित होते. महाराजांविषयी अशी एक कथा आहे की त्यांनी एक गाय पाळली होती. तिला घास दिल्याशिवाय ते अन्नग्रहण करीत नसत. महाराज गेल्यानंतर या गायीने हंबरडा फोडला. ती अंत्ययात्रेतही सहभागी झाली आणि महाराज गेले त्याच दिवशी या गायीनेही प्राण सोडले. या गायीचे स्मारक महाराजांच्या समाधी मंदिराजवळच आहे.
वाखरी येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मंदिराला आवारभिंत आहे. या भिंतीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात तटबंदीला लागून ओवऱ्या आहेत ज्यांचा वापर भक्तनिवास, धर्मशाळा म्हणून केला जातो. सभामंडप अंतराळ व गर्भगृह अशी या समाधी मंदिराची संरचना आहे. सभामंडपात दोन्ही बाजूला प्रत्येकी चार गोलाकार स्तंभ आहेत. पुढे सभामंडपापेक्षा उंचावर असलेल्या अंतराळासमोर स्टेनलेस स्टीलचा सुरक्षा कठडा आहे. एकमेकांना अर्धचंद्राकार कमानीने जोडलेले गोलाकार स्तंभ आहेत. अंतराळात जमिनीवर कासवशिल्प व त्यापुढे कासवमुख तोलून धरलेले नागशिल्प आहे. अंतराळात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीत प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला देवकोष्टकात विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत.
गर्भगृहाच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर चक्रनक्षी आहे. मंडारकावर कीर्तीमुख आहे. गर्भगृहात प्रवेशद्वारासमोर समाधी चौथरा आहे. चौथऱ्यावर मध्यभागी शीर्षपाषाण व चारही कोनांवर नक्षीदार स्तंभ एकमेकांना महिरप कमानीने जोडलेले आहेत. चौथऱ्यामागे वज्रपिठावर लक्ष्मण महाराज यांची ध्यानस्थ मूर्ती आहे. मूर्तीच्या मागील बाजूला आणखी एक समाधी चौथरा आहे त्यावर दोन शीर्षपाषाण आहेत. गर्भगृहातून बाहेर पडण्यासाठी डाव्या व उजव्या बाजूला दारे आहेत. या मंदिरासमोरील एका लहान मंदिरात हिरण्यकश्यपूचे पोट फाडणारा नृसिंह व श्रीदत्त या मूर्ती आहेत.
दर गुरुवारी येथे सकाळी अभिषेक, दुपारी प्रवचन आणि संध्याकाळी हरिपाठ व आरती होते. मंदिरात दत्त जयंती, जन्माष्टमी, नृसिंह जयंती हे उत्सव तसेच महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात येते. तेव्हा पंढरपूरसह मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरांतून भाविक येतात. उत्सवकाळात येथे महाप्रसाद असतो. येथे आषाढी आणि कार्तिकी वारीच्या काळात विशेष कीर्तन सप्ताहाचे आयोजन होते.
लक्ष्मण महाराज मंदिर ट्रस्टच्या वतीने समाजहिताचे विविध उपक्रम राबवले जातात. गरीब आणि गरजूंसाठी अन्नदान, विद्यार्थ्यांसाठी वह्या–वितरण, आरोग्य शिबिरे व नैसर्गिक आपत्तींमध्ये मदतीचे कार्य नियमितपणे केले जाते.