लक्ष्मण मंदिर तपोवन

नाशिक, जि. नाशिक


‘पश्चिम काशी’ म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये ‘तपोवन’ हे एक महत्त्वाचे आध्यात्मिक स्थळ आहे. गोदावरी आणि कपिला या नद्यांच्या पवित्र संगमावर असलेल्या तपोवन परिसरात लक्ष्मणाचे मंदिर आहे. असे सांगितले जाते की, लक्ष्मणाचे राज्यातील हे एकमेव मंदिर आहे. रावणपुत्र मेघनाथ याच्याशी युद्ध करण्यासाठी लक्ष्मणाने याच ठिकाणी तपश्चर्या केली होती. तसेच शूर्पणखाचेही नाक आणि कान येथेच लक्ष्मणाने कापले होते.

या मंदिराची आख्यायिका अशी की शूर्पणखा ही लंकेचा राजा रावणाची बहीण होती. अनेक राक्षसांचा वध करून संपूर्ण जगावर राज्य करू इच्छिणाऱ्या रावणाने आपली बहीण शूर्पणखा हिच्या पतीचाही वध केला होता. त्यानंतर रावणाने शूर्पणखाला आपला भाऊ खर, याच्याकडे राहायला पाठवले होते. त्यावेळी राम, लक्ष्मण आणि सीता यांचा वनवास काळ सुरू होता. त्यासाठी ते या परिसरात आले होते. तेथे रामाला पाहून शूर्पणखा त्याच्या सौंदर्यावर मोहित झाली. शूर्पणखा ही मागील जन्मात स्वर्गातील अप्सरा होती. तिचे नाव नयनतारा होते. ती एका ऋषींच्या शापाने राक्षसी झाली होती. तिने नयनताराचे सुंदर रूप घेतले आणि मला तुझ्याशी विवाह करायचा आहे, असे रामाला सांगितले. त्यावर रामाने आपण विवाहित असल्याचे सांगितले, पण आपला धाकटा भाऊ लक्ष्मण आहे, तू त्याच्याकडे जा, असे सांगितले. शूर्पणखाने लक्ष्मणाकडेही लग्नाचा प्रस्ताव ठेवला, पण लक्ष्मणाने तिला नकार दिला.

तेव्हा शूर्पणखाने ‘आता मी सीतेलाच मारले तर रामाशी लग्न होण्यात काहीच अडचण येणार नाही’, असे म्हणून ती सीतेला मारण्यासाठी सरसावली, त्यामुळे क्रोधित झालेल्या लक्ष्मणाने, ‘तुला तुझ्या सौंदर्याचा खूप अभिमान आहे ना, थांब तुला विद्रूपच करून टाकतो’, असे म्हणत शूर्पणखाचे नाक आणि कान कापले. या घटनेनंतर या ठिकाणाचे नाव ‘नासिक’ पडले, अशी धारणा आहे. ही घटना जेथे घडली, त्याच ठिकाणी लक्ष्मणाचे हे मंदिर आहे.

मंदिराच्या कमानीतून आत गेल्यावर चार ते पाच फूट उंच एक सुंदर बैठी गणेशमूर्ती पाहायला मिळते. येथेच ग्रंथविक्री व प्रसाद विक्री करणारी अनेक दुकाने आहेत. मंदिरासमोरील भिंतीवर, रामायणातील महत्त्वाच्या प्रसंगांची उठावचित्रे (म्युरल्स) रेखाटलेली आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर गरूडशिल्प आहे. असे सांगितले जाते की, मंदिर परिसरात एक वडाचे झाड असून ते फार प्राचीन आहे. हे झाड उन्मळून पडले तरी त्याच्या मुळांपासून पुन्हा त्याची निर्मिती होते.

काहीसे उंचावर असल्याने १५ ते २० पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश करावा लागतो. मंदिराच्या प्रशस्त सभामंडपात स्वयंभू हनुमानाची चार फूट उंचीची मूर्ती आहे. त्याचबरोबर येथील सभामंडपाला लागून बाहेरील बाजूला लक्ष्मण शूर्पणखाचे नाक कापत आहे, असा सुबक देखावा तयार करण्यात आला आहे. मंदिराच्या सभामंडपातून हा देखावा पाहता येतो.

मंदिराच्या गर्भगृहातील प्रवेशद्वारावर ‘श्री लक्ष्मण शेषनाग अवतार’ असे लिहिले आहे. लक्ष्मण हा शेषनागाचा अवतार मानला जातो. त्यामुळे लक्ष्मणाची येथील मूर्ती ही पंचमुखी शेषनागासोबत आहे. एका चौथऱ्यावर अखंड दगडात कोरलेली ही मूर्ती आहे. येथेच लक्ष्मणाने वनवास काळात रामाची सेवा केली होती, त्यामुळे या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

उपयुक्त माहिती:

  • मुंबई नाका बस स्थानकापासून ४ किमी, नाशिक रेल्वे स्थानकापासून ९ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक जिल्ह्यांतून नाशिकमध्ये येण्यासाठी एसटी व रेल्वे सुविधा
  • तपोवन येथे जाण्यासाठी महापालिका बस सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home