‘लवथवती विक्राळा, ब्रह्मांडी माळा… विषे कंठ काळा, त्रिनेत्री ज्वाळा’ या प्रसिद्ध शिवशंकराच्या आरतीचा जेथे जन्म झाला, ते स्थान म्हणजे जेजुरीजवळील प्रसिद्ध लवथळेश्वर मंदिर. समर्थ रामदास स्वामींनी येथे एक रात्र मुक्काम करून ही शिवस्तुतीपर आरती रचली. त्यामुळे या देवस्थानाला विशेष महत्त्व आहे. ‘मार्तंड विजय’ ग्रंथामध्ये या मंदिरासंदर्भातील वर्णन आहे.
सासवडमार्गे जेजुरी येथे जाताना साधारणतः जेजुरीच्या दोन किमी अलीकडे मुख्य रस्त्याला लागूनच हे मंदिर आहे. या मंदिराची रचना ही सर्वसामान्य मंदिरांप्रमाणे जोते, बांधकाम वा कळस अशा स्वरूपाची नाही; तर ते जमिनीखाली पाषाणात बनलेले एक प्राचीन मंदिर आहे. सहा ते आठ पायऱ्या उतरून मंदिरात आत जावे लागते. या पायऱ्यांवर सात ओळींचा शिलालेख आहे. ‘श्री गणेशाय नमः श्री स्वस्ती शके १५३०…’ अशा स्वरूपाचा मजकूर त्यात आहे. त्याशिवाय श्री लवथळेश्वराच्या दारावर आणखी एक शिलालेख आहे. मंदिरात एक छोटेखानी सभामंडप व गर्भगृह आहे. सभामंडपात दगडी खांब आहेत. तेथेच एक भलामोठा नंदी आहे. त्याशिवाय सुबक गणेशमूर्ती व नागमूर्ती आहे. गाभाऱ्यात महादेवाची सुंदर पिंड आहे. ही पिंड लवा ऋषींनी स्थापित केल्याचे सांगितले जाते. या जमिनीखालील शिवालयाजवळ एक पुष्करणीही आहे.
या मंदिरासंदर्भात असे सांगितले जाते की, समर्थ रामदास स्वामी एके दिवशी जेजुरीत तीर्थाटनासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी विश्रांतीसाठी ही जागा निवडली होती. परंतु, त्या काळी अशी लोककथा रूढ झाली होती की, या मंदिरात मुक्काम करणारी व्यक्ती दुसरा दिवस पाहत नाही; त्याआधीच तिचा मृत्यू होतो. समर्थांना हे समजताच समाजातील ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी याच मंदिरात रात्र काढायचे ठरवले. तेथे देवाची पूजा-अर्चा करणाऱ्या व्यक्तीकडून महादेवाचे गुणगान करणारी स्तोत्रे व आरती बोलली जात नव्हती. हे पाहून समर्थांच्या मुखातून एक रचना बाहेर पडली.
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा
। लावण्यसुंदर मस्तकी बाळा, तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा।।
यामधील लवथवती हा शब्दप्रयोग येथील देवाला उद्देशून वापरला गेला आहे. आता सर्वपरिचित असलेल्या या आरतीचा जन्म याच मंदिराच्या सभामंडपात झाला.
‘मार्तंड विजय’ ग्रंथामधील माहितीनुसार, लवा नावाचा दुर्वास ऋषींचा एक शिष्य येथे ध्यानधारणा करीत असे. त्याच्या साधनेमध्ये व्यत्यय येऊ नये यासाठी दुर्वास ऋषींनी आपल्या तपाच्या बळावर हा परिसर भूत व पिशाच्च यांच्या संचारापासून मुक्त केला होता. लवा नावावरून देवस्थानाचे नाव लवथळेश्वर पडले. त्याशिवाय मणिमल्ल दैत्यांकडून होणाऱ्या त्रासापासून सुरक्षित राहण्यासाठी सप्तऋषींनी आपली कुटुंबे याच परिसरात आणावीत, असे नारदमुनींनी सुचविले होते.
या मंदिरासंदर्भात आख्यायिका अशी की, शिवाजी महाराज लवथळेश्वरी असताना एक तरुण त्यांच्याकडे आला आणि आपल्याला शिवाजी महाराजांना भेटायचे आहे, असे त्याने सांगितले. आपल्याला न ओळखल्याचे पाहून तेव्हा शिवरायांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरविले. ‘त्या बंडखोर शिवाजीच्या नादी लागू नका. त्यापेक्षा आदिलशाहीत जाऊन नोकरी करा, कल्याण होईल’, असे सांगून स्वराज्यस्थापनेची खिल्ली उडविली. हे ऐकून त्या तरुणाने राजांनाच सुनावले, ‘राजांबद्दल वेडेवाकडे बोलाल तर खपवून घेणार नाही.’ एवढे बोलून तो तरुण मार्गस्थ झाला. त्यानंतर काही दिवसांनी तो राजगडावर आला. शिवाजी महाराजांनी लवथळेश्वरी पाहिलेल्या त्या तरुणाला ओळखले आणि त्याला आपल्या पदरी घेतले. या कथेला कोणताही पुरावा नसला तरी परिसरात ती सांगितली जाते. हा तरुण म्हणजे हिंदवी स्वराज्याचे पहिले पंतप्रधान मोरोपंत पिंगळे. सर्वसाधारण मंदिरांप्रमाणे या देवस्थानाची रचना नसली तरी त्याचे महत्त्व खूपच आहे. त्यामुळे अनेक भाविक येथे दर्शनाला येतात.