लक्ष्मी मंदिर

कोळे, ता. सांगोला, जि. सोलापूर

सांगोला तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले कोळे हे गाव ऐतिहासिक दृष्ट्याही महत्त्वाचे आहे. गावात तेराव्या शतकातील हेमाडपंती महादेव मंदिर त्यावरील कामशिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. मंदिराच्या भिंतींवरील मैथुनशिल्पे अभ्यासकांच्या कुतूहलाचा विषय आहे. याच गावात म्हसोबा मंदिर, म्हाकुबाई मंदिर, येसाई मंदिर, कोळेकर महाराज मठ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थी विहार आदी प्रसिद्ध स्थळे आहेत. गावात लक्ष्मीचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. ही देवी कोळे गावची ग्रामदेवता आहे.
हेमाडपंती स्थापत्यशैलीचे हे मंदिर तेराव्या शतकात यादव राजवटीत बांधले गेले असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. या मंदिराबाबत अख्यायिका अशी की पार्वती देवीने राक्षसांचा विनाश करण्यासाठी कालिका देवीचा अवतार धारण केला तेव्हा ती रागाने बेभान होऊन विनाश घडवू लागली. सर्व राक्षस मारले गेले तरी देवीचा राग शांत होत नव्हता. सर्व देवांनी महादेवाला प्रार्थना केली की काहीतरी करून कालिका देवीचा राग शांत करावा. तेव्हा महादेवाने कालिका देवी पुढे लोटांगण घातले. कालिका देवीचा पाय महादेवाच्या देहाला लागताच देवी शांत झाली. शांत झालेल्या देवीची येथे स्थापना करून सर्व देवांनी अभिषेक केला. पुढे या देवीस लक्ष्मी किंवा महालक्ष्मी नावाने संबोधले जाऊ लागले.
गावाच्या वेशीवर असलेल्या या मंदिरास मोठी स्वागतकमान आहे. कोरीव पाषाणात बांधलेल्या कमानीच्या सज्जावर तीन मेघडंबरी आहेत. मेघडंबरीच्या छतावर नक्षीदार शिखर आहेत. कमानीपुढे मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ आहे. मंदिराच्या भक्कम तटबंदीत दुमजली प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराजवळ तटबंदीला लागून प्राचीन वीरगळ शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व वर अर्धचंद्राकार तोरण आहे. प्रवेशद्वारावर बाशिंगी कठडा आहे. त्यावर नगारखाना असलेला मजला अलीकडील काळात बांधलेला आहे. प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष आहेत. मंदिराच्या फरसबंदी प्रांगणात तटबंदीला लागून चोहोबाजूंनी ओवऱ्या व भक्तनिवासाच्या दुमजली इमारती आहेत. प्रांगणात देवस्थानचे कार्यालय, सेवेकऱ्यांची निवासस्थाने व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीचे सभागृह आहे. मंदिरासमोर पद्मपादुका असलेला चौथरा व त्यापुढे यज्ञकुंड आहे. प्रांगणात डाव्या व उजव्या बाजूला दोन चौथरे व त्यावर दीपमाळा आहेत.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. येथील सभामंडप हा मूळ मंदिरास नंतर जोडल्याचे जाणवते. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपाच्या समोरील बाजूस चार स्तंभांवर तीन महिरपी कमानी आहेत. सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. अंतराळ सभामंडपापेक्षा उंचावर आहे. पाच पायऱ्या चढून अंतराळात प्रवेश होतो. अंतराळात आठ नक्षीदार स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. स्तंभदंडात चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी कणी व त्यावर हस्त आहेत. अष्टकोनी वितानावर मध्यभागी चक्राकार नक्षी आहे. अंतराळात डाव्या व उजव्या बाजूला दोन कक्ष आहेत. त्यापैकी डावीकडील कक्षात उत्सवकाळात वापरली जाणारी पालखी व उजव्या बाजूच्या कक्षात देवीचा शयनमंच आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार पंचाशाखीय आहे. त्यात पर्ण शाखा, पुष्पशाखा, वेलबुट्टीशाखा व स्तंभशाखा आहेत. प्रवेशद्वारात दोन्ही बाजूला द्वारपाल शिल्पे आहेत. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व ललाटपट्टीवर पानाफुलांच्या नक्षी आहे. मंडारकास चंद्रशिळा आहे. प्रवेशद्वाराला चांदीच्या नक्षीदार झडपा आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर लक्ष्मी देवीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. पाठशिळेवर शक्ती शिल्पे कोरलेली आहेत. देवीच्या डोक्यावर सुवर्ण मुकुट व अंगावर विविध अलंकार व वस्त्रे आहेत. मूर्तीच्या बाजूला त्रिशूल व खड्ग आहेत. समोर सिंह, अश्व, नंदी व विविध देव देवतांचे पितळी मुखवटे आहेत. गर्भगृहात मागील भिंतीवर देवीची चांदीची प्रतिमा आहे.
गर्भगृहाच्या छतावर तीन थरांचे गोलाकार शिखर आहे. शिखराच्या प्रत्येक थरात बारा देवकोष्टके व त्यांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. देवकोष्टकांवर घुमटाकार शिखर, त्यावर आमलक व कळस आहेत. प्रत्येक दोन देवकोष्टकांमध्ये कुंभस्तंभाची रचना आहे. मुख्य शिखराच्या शीर्षभागी आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे.
या मंदिराच्या बाजूला वीर देवस्थान आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. बंदिस्त सभामंडपात डाव्या व उजव्या भिंतीलगत भाविकांना बसण्यासाठी कक्षासने व कक्षासनांवर एका जागी चुना दळण्याचे पाषाणी गाडे आहे. गर्भगृहात वज्रपिठावर देवाची शेंदूर चर्चित द्विभुज पाषाण मूर्ती आहे. देवाच्या उजव्या हातात खड्ग व डोक्यावर फेटा आहे. गर्भगृहाच्या छतावर घुमटाकार शिखर व कळस आहे.
वैशाख पौर्णिमा हा महालक्ष्मी देवीचा मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. वैशाख शुद्ध त्रयोदशीस मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीला साकडे घालून यात्रेला प्रारंभ होतो. पहिल्या दिवशी गावातील माळी व रामोजी समाजाचा नेवैद्य देवीस अर्पण केला जातो. दुसऱ्या दिवशी देवीचे पुजारी कऱ्हाडे समाजाचा नेवैद्य दाखवून देवीस प्रार्थना करतात. तिसऱ्या दिवशी सर्व गावकऱ्यांचा नेवैद्य दाखवून मुख्य उत्सवाला सुरवात केली जाते. पौर्णिमेच्या रात्री बारा वाजता देवीची पालखी मिरवणूक (छबीना) काढून ग्रामप्रदक्षिणा करण्यात येते. ही पालखी मिरवणूक गावातील प्राचीन महादेव मंदिराला भेट देऊन परत फिरते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचे सामने भरविले जातात. यात्रेनिमित्त आठ दिवस बैलांचा बाजार भरतो. तीन दिवस विविध वस्तूंची दुकाने सजून परिसरास तात्पुरत्या बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त होते.
शारदीय नवरात्रोत्सव व शाकंभरी नवरात्रोत्सवात भाविकांची मंदिरात अलोट गर्दी होते. यावेळी देवीची खणा नारळाची ओटी भरून साडी-चोळी अर्पण केली जाते. नवसाच्या वस्तू व आभूषणे देवीस अर्पण केली जातात. चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी असे वर्षभरातील सर्व सण व उत्सव मंदिरात साजरे केले जातात. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी आदी दिवशी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची विशेष गर्दी असते.

उपयुक्त माहिती

  • सांगोल्यापासून ४० किमी, तर मंगळवेढा येथून ७४ किमी अंतरावर
  • सांगोला येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९६६५०५१०१६
Back To Home