लक्ष्मी नृसिंह मंदिर

घनसावंगी, ता. घनसावंगी, जि. जालना

विष्णूच्या दशावतारातील चौथा नृसिंह अवतार वैशिष्ट्यपूर्ण आणि तेवढाच महत्त्वाचा मानला जातो. पौराणिक कथेनुसार, हिरण्यकशिपूला प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने एक विशेष वर दिला होता. त्यानुसार, ‘तुला मानव अथवा पशू मारू शकणार नाही; तू दिवसा अथवा रात्री, घरात अथवा बाहेर, जमिनीवर किंवा आकाशात मणार नाही.’ असा अमरत्वासारखा वर मिळालेला असतानाही, जेव्हा त्याचा अत्याचार वाढला आणि तो पराकोटीला पोहोचला, तेव्हा विष्णूने नृसिंह अवतार घेऊन त्याचा वध केला होता. नृसिंहाची भारतात अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. यातील एक प्राचीन मंदिर जालना जिल्ह्यातील घनसावंगी शहरालगत स्थित आहे. मराठवाडा क्षेत्रातील हे मंदिर भाविकांचे एक प्रमुख श्रद्धास्थान मानले जाते.

हे ऐतिहासिक मंदिर सुमारे ४०० ते ५०० वर्षे प्राचीन असल्याचे मंदिराचे विश्वस्त सांगतात. या मंदिराबाबत एक आख्यायिका अशी की पूर्वीच्या काळी गावात नृसिंह देवाचे एक निष्ठावंत भक्त राहत असत. ते नियमितपणे देवाची आराधना करीत. त्यांच्या या भक्तीमुळे देवाने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला. त्यानुसार, ‘मी नदीच्या पात्रात आहे. मला पाण्यातून बाहेर काढून लाकडी गाड्यातून गावात न्यावे आणि ज्या ठिकाणी गाड्याचे चाक मोडेल, त्याच ठिकाणी माझी स्थापना करावी,’ असा आदेश देवाने दिला. देवाच्या या दृष्टांतानुसार नदीच्या पात्रात सापडलेली मूर्ती एका गाड्यात बसवून गावाच्या दिशेने तिची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक या ठिकाणी आल्यावर अचानक गाड्याचे चाक मोडले. त्यामुळे हा देवाचा संकेत मानून येथेच मूर्तीची स्थापना करून मंदिर उभारण्यात आले. पुढे या मंदिराचे शास्त्रोक्त पद्धतीने नूतनीकरण आणि जीर्णोद्धार ५ मे २००२ रोजी करण्यात आला.

घनसावंगी शहराच्या उत्तरेला घेवरसळी नदीच्या तीरावर हे मंदिर स्थित आहे. मंदिराच्या सुरक्षेसाठी अलीकडील काळात बांधलेली एक भक्कम तटबंदी आहे. या तटबंदीत एक साधे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. वास्तुरचनेच्या दृष्टीने मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपास समोरील बाजूने दोन प्रवेशद्वारे आहेत आणि या दोन्ही प्रवेशद्वारांसमोर दोन मुखमंडप आहेत. या मुख्य प्रवेशद्वारांना लाकडी झडपा लावलेल्या आहेत. मंदिरात प्रवेश करण्यासाठी अंतराळाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला आणखी दोन दरवाजे आहेत. त्यांसमोर देखील मुखमंडप आहेत. या सर्व प्रवेशद्वारांच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी आहे आणि ललाटबिंबावर गणेशशिल्प कोरलेले आहेत. तसेच ललाटपट्टीवर जीर्णोद्धाराचा दिनांक कोरलेला आहे. सभामंडपात दोन्ही प्रवेशद्वारांच्या मध्ये एका वज्रपीठावर प्राचीन मंदिरातील एक शिलातुळई ठेवली आहे, त्याच्यावर बाळ प्रल्हादाचे शिल्प कोरलेले आहे. अंतराळात गर्भगृहाच्या डाव्या बाजूला दर्शनी भिंतीत एक देवकोष्टक आहे. त्यात श्रीगणेशाची शेंदूरचर्चित पाषाणमूर्ती स्थापित आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर एक चौथरा आहे. गर्भगृहाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला भिंतींवर गरुड आणि हनुमंत यांची चित्रे आहेत. गर्भगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारात द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी आणि ललाटबिंबावर गणेशशिल्प आहे. या प्रवेशद्वारास लाकडी झडपा आहेत. गर्भगृहात वज्रपीठावर भगवान नृसिंहाची काळ्या पाषाणातील कलात्मक मूर्ती आहे. विविध वस्त्रे व अलंकार ल्यालेल्या या मूर्तीच्या डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने भाविकांना प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रदक्षिणामार्ग आहे. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर म्हणजेच मंडोवरात एक देवकोष्टक आहे. त्यामध्ये लक्ष्मीची काळ्या पाषाणातील मूर्ती प्रतिष्ठित आहे. यामुळेच याला नृसिंह लक्ष्मी मंदिर म्हटले जाते. गर्भगृहाच्या छतावर तीन थरांचे शिखर आहे. शिखराचा खालील पहिला थर षटकोनी आणि सपाट आहे. त्याच्या दुसऱ्या अष्टकोनी थरात आठ देवकोष्टके तयार केली आहेत आणि त्यांत विविध देवतांच्या मूर्ती बसवलेल्या दिसतात. शिखराचा तिसरा गोलाकार थर निमूळता होत गेलेला आहे. त्याच्या शीर्षभागी आमलक आणि कळस आहे.

मुख्य मंदिराच्या बाजूला एक प्राचीन नवग्रह मंदिर आहे. दोन प्रवेशद्वारे असलेले केवळ गर्भगृह असे या मंदिराचे साधे स्वरूप आहे. मंदिरात तिन्ही भिंतीलगत नवग्रहांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती स्थापित केलेल्या आहेत. मंदिरात मध्यभागी एक शिवपिंड आहे. ही पिंड शनी ग्रहाचे प्रतीकात्मक रूप असल्याचे येथील पुजारी सांगतात. मंदिराच्या छतावर घुमटाकार शिखर बांधलेले आहे आणि या शिखराच्या शीर्षभागी कळस आहे. या मंदिराच्या बाजूला एक महारुद्र हनुमान मंदिर आहे. त्यातील सभामंडपात बारा ज्योतिर्लिंगांचे प्रतीक असलेल्या बारा शिवपिंडी आहेत. गर्भगृहात हनुमान आणि गणपती यांच्या शेंदूरचर्चित पाषाणमूर्ती आहेत. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणामार्ग आहे. या प्रदक्षिणामार्गावर मागील बाजूस जमिनीवर एक कासवशिल्प आहे, तर समोर वज्रपीठावर शेषशायी विष्णूची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. येथे विष्णूच्या पायाशी लक्ष्मी बसलेली दिसते.

नृसिंह जयंती हा येथील मुख्य वार्षिक उत्सव आहे. या निमित्ताने दरवर्षी वैशाख शुक्ल षष्ठी ते चतुर्दशी असा नऊ दिवसांचा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. वैशाख पौर्णिमेला उपवासाचे पारणे फेडतात. या दरम्यान जिल्ह्यातील प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने आयोजित केली जातात. सलग नऊ दिवस नामांकित भजनमंडळे मंदिरात भजनसेवा देतात. पौर्णिमेच्या दिवशी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी अन्नछत्र चालवले जाते. मंदिरात दसरा, दिवाळी, श्रावण महिना, कृष्ण जन्माष्टमी, मार्गशीर्ष महिना, शारदीय नवरात्री आदी उत्सवांच्या वेळी विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय, दर आठवड्याला गुरुवारी, तसेच एकादशी, पौर्णिमा आणि अमावस्या आदी दिवशी दर्शनार्थी भाविकांची गर्दी असते. दररोज सकाळी सहा ते दुपारी बारा व सायंकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • घनसावंगी बस स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • जालना शहरापासून ४७ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून घनसावंगीसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे

लक्ष्मी नरसिम्हा मंदिर

घनसावंगी, घनसावंगी, जिला. जलना

Back To Home