सातारा गादीचे छत्रपती शाहू महाराज यांचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे जन्मगाव असलेले श्रीवर्धन शहर इतिहास प्रसिद्ध आहे. या शहराजवळील गायगोठण गावातील कुसुमादेवीचे प्राचीन मंदिर हे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्रीवर्धनची ग्रामदेवता सोमजाई देवीची बहीण म्हणून कुसुमादेवीची मान्यता आहे. येथील काळभैरव हा या दोघींचा भाऊ, असे समजले जाते. त्यामुळे अनेक भाविकांकडून एकाच दिवशी या तिन्ही देवस्थानांचे दर्शन घेतले जाते. या देवीला कळे लावून नवस बोलण्याची प्रथा रूढ आहे.
असे सांगितले जाते की कुसुमादेवीची येथील प्राचीन पाषाणमूर्ती ही बाराव्या शतकातील आहे. मंदिराची अख्यायिका अशी की महाभारत काळात पांडव काही दिवस या भागातील दाट अरण्यात अज्ञातवासात होते. येथे असताना त्यांनी आपल्या वैयक्तिक पूजनासाठी अनेक देवस्थाने निर्माण केली. त्यापैकी महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे एकत्रीत रूप म्हणजे कुसुमादेवीचे हे देवालय असल्याची मान्यता आहे. जंगलातील फुलांच्या सहवासातील देवता म्हणून या देवीचे नाव कुसुमादेवी पडले असावे.
श्रीवर्धन शहरातून किनारा मार्गावरून दिवेआगरकडे जाताना तीन किमी अंतरावर असणाऱ्या गायगोठण गावात हे मंदिर आहे. हे मंदिर दाट हिरवाईत लपलेले आहे. येथे जाण्यासाठी गायगोठण गावाजवळून उजव्या बाजूला डोंगराकडे जाणारा एक रस्ता आहे. तिथे काही अंतर वाहनाने गेल्यानंतर पुढचा मार्ग काहीसा अवघड आहे. पावसाळ्यात वाहत्या ओढ्यातून मंदिरापर्यंत यावे लागते. या ओढ्याला पाणी जास्त नसते, केवळ वीतभर पाण्यातून जाता येते.
जास्त पाऊस असेल तर पाण्याची पातळी काहीशी वाढण्याची शक्यता असते. तरीही येथे असंख्य भाविकांचे जाणे-येणे असते. दोन्ही बाजूला वृक्षवेलींच्या झालेल्या कमानीखालून पाण्यातून पुढे पुढे यावे लागते. शहरातील गजबजाटापासून हे ठिकाण दूर आहे. त्यामुळे केवळ पक्ष्यांचे कुजन व ओढ्यातून खळाळत जाणाऱ्या पाण्याचा आवाज तेवढा कानावर पडतो.
मंदिराचे प्रांगण काहीसे उंचावर व त्यात पेव्हर ब्लॉकची फरसबंदी आहे. या प्रांगणास झाडाझुडपांची नैसर्गिक तटबंदी आहे. मंदिरासमोरील एका चौथऱ्यावर तुलसी वृंदावन आहे. मुख्य मंदिरासमोर प्रशस्त व्हरांडा, सभामंडप व गर्भगृह अशी या कौलारू मंदिराची संरचना आहे. भाविकांच्या सोयीसाठी या व्हरांड्यावर पत्र्याची शेड टाकलेली आहे. येथील सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. सभामंडपात प्रत्येकी चार चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. हे लाकडी स्तंभ पाषाणी स्तंभपादांवर उभे आहेत व या स्तंभांच्या वरील बाजुस तुळया आहेत. येथील छतावर अनेक पितळी घंटा टांगलेल्या आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी महिरपी कमानीने जोडलेले चार लाकडी स्तंभ व गर्भगृहाचे प्रवेशव्दार आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवरील प्रवेशद्वारास लोखंडी जाळीदार झडपा आहेत. गर्भगृहात मध्यभागी असलेल्या वज्रपिठावर महाकाली, महासरस्वती व महालक्षी यांच्या दोन फूट उंचीच्या पाषाणमूर्तीं आहेत. या मूर्तींचे कोरीवकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. या तिन्ही देवींना एकत्रीत कुसुमादेवी म्हणून संबोधले जाते. उत्सवाच्या वेळी विविध अलंकार व वस्त्रांनी या मूर्तींना सजविले जाते. विशिष्ट पद्धतीच्या फुलांनी सजविल्यानंतर मूर्तींचे रूप अधिकच खुलते. मंदिरापासून जवळच फक्त छत असलेले लहान मंदिर आहे. येथील वज्रपिठावर गणेश मूर्ती व बाजुला शिवपिंडी आहे.
चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजेच गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी या देवीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी देवीची पालखीतून ग्रामप्रदक्षिणा केली जाते. यावेळी देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी हजारो भाविक मंदिरात येतात. शारदीय नवरात्रौत्सव या दहा दिवसांच्या उत्सवादरम्यान मंदिरात होमहवन, भजन, किर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या मंदिरापर्यंत येण्याचा मार्ग काहीसा खडतर असला तरी देवीवरील श्रद्धेमुळे मंदिरात दर मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमा व अमावस्येच्या दिवशी भाविकांची वर्दळ असते. श्रीवर्धनचा किनारा, दिवेआगर आदी पर्यटनस्थळे येथून जवळच असल्यामुळे अनेक पर्यटकही या देवीच्या दर्शासाठी येथे येतात. दररोज सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरातील कुसुमादेवीचे दर्शन घेता येते.