कुमारेश्वर मंदिर

केलसुला, ता. सेनगाव, जि. हिंगोली

हिंगोली जिल्ह्यातील काही मोजक्या प्राचीन शिवमंदिरांपैकी एक असलेले कुमारेश्वर महादेव मंदिर सेनगाव तालुक्यातील केलसुला येथे स्थित आहे. या मंदिराला ‘केलसुला मंदिर’ या नावानेही ओळखले जाते. येथील मंदिर सुमारे आठशे वर्षे प्राचीन असल्याचे सांगण्यात येते. हेमाडपंती स्थापत्यशैलीत बांधण्यात आलेल्या या मंदिरातील शिवलिंग जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यात शेकडो भाविक ‘हर हर महादेव’च्या जयघोषात शिवाला बेलपत्र अर्पण करून अभिषेक करण्यासाठी येथे येतात.

असे सांगितले जाते की या गावाचे जुने नाव कैलासपूर असे होते, त्याचा अपभ्रंश होऊन ते केलसुला झाले. केलसुला, रिसोड व उटी या भागाला उमारण्य असे म्हटले जाते. लोणार येथील सच्चिदानंद स्वामी यांनी १८८२ मध्ये लिहिलेल्या ‘उमारण्य माहात्म्य’ या पोथीत या मंदिराची कथा आहे, ती अशी की विंध्य पर्वताची उंची कमी करण्यासाठी अगस्ती ऋषी उमारण्यात कायम वास्तव्याला आले होते. त्याचवेळी या परिसरात अतापी व वातापी या दोन राक्षसांनी त्राहीमाम करून सोडले होते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अगस्ती ऋषींनी शिवशंकराची आराधना केली. शिवशंकर प्रसन्न झाल्यावर ऋषींनी त्यांना या दोन राक्षसांशी युद्ध करण्याची विनंती केली. तेव्हा शिवशंकर स्वतः बटू म्हणजे कुमाराचे रूप घेऊन युद्धात सामील झाले व त्यांनी या राक्षसांना मारले. या युद्धानंतर अगस्ती ऋषींनी शिवशंकरांना येथेच राहण्याची विनंती केली. त्यानुसार शंकरांनी येथे लिंगरूपात राहण्याचे मान्य केले. ही घटना जेथे घडली, त्या घटनेचे स्मरण म्हणून येथील शिवलिंगाला कुमारेश्वर हे नाव देण्यात आले.

केलसुला गावाच्या वेशीवर एका ओढ्याकाठी हे मंदिर आहे. रस्त्यालगत असलेल्या कमानीतून मंदिराकडे जाणारा मार्ग आहे. मंदिराभोवती असलेल्या तटबंदीत मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. तीन पायऱ्या चढून या मुखमंडपाप्रमाणे असलेल्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराला चार स्तंभ व त्यावर मेघडंबरी आहे. स्वतंत्र नंदीमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. अर्धभिंत, त्यावर चार स्तंभ व त्यावर छत असे येथील अर्धखुल्या स्वरूपात असलेल्या नंदीमंडपाचे स्वरूप आहे. नंदीमंडपाच्या बाह्य भिंतींवर कोरीव काम आहे. त्यावर गजस्तर, नर्तिका, देवदेवता, सप्तमातृका कोरलेल्या आहेत. नंदीमंडपात मध्यभागी अखंड काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती व बाजूने अर्धभिंतीत भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत.

नंदीमंडपासमोर मुख्य मंदिर आहे. संपूर्ण पाषाणात बांधलेल्या या मंदिरासमोर एका लहानशा दगडी घुमटीत गणपतीची प्राचीन मूर्ती आहे. प्रांगणातून सभामंडपात प्रवेश करण्यासाठी अरुंद वाट आहे. अर्धखुल्या सभामंडपात समोरील बाजूने कक्षासने व अनेक दगडी स्तंभ आहेत. प्रवेशद्वाराला लागून सभामंडपात नंदीच्या दोन प्राचीन मूर्ती आहेत. त्यांच्या पाठीवर घुंगुरमाळा व इतर अलंकारांचे कोरीव काम आहे. सभामंडपातील दगडी स्तंभांवर यक्ष, फुले, हत्ती आणि इतर विविध भौमितिक रचनांचे कोरीवकाम आहे. येथील गर्भगृहाचे प्रवेशद्वार वैशिष्ट्यपूर्ण आहे. सात स्तरीय द्वारशाखा असलेल्या या प्रवेशद्वारावर कोरीव काम आहे. प्रवेशद्वाराच्या खालच्या बाजूला नक्षीदार मंडोवर व ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या उत्तरांगावर तोरण कोरलेले आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी अखंड पाषाणातील प्राचीन शिवपिंडी व त्याभोवती वेटोळे घातलेली धातूची नागदेवता आहे. या शिवपिंडीच्या शेजारी महादेवाचा पितळी मुखवटा आहे. मुखवट्याच्या मागे नागदेवतेचा पंचधातूचा फणा आहे. शिवपिंडीच्या मागील बाजूला महादेवाची प्राचीन मूर्ती आहे. गर्भगृहातील एका भिंतीला असलेल्या आयताकृती शिळेवर मनुष्य, नागदेवता, काही प्राणी कोरलेले आहेत. या मंदिराचे छत सपाट असून, त्यावर शिखर नाही.

मंदिराच्या प्रांगणात अनेक प्राचीन दगडी मूर्ती आहेत. त्यात एक मोठी शिवपिंडीही आहे. येथील काही मूर्ती छत्रपती संभाजीनगरच्या वस्तुसंग्रहालयात जतन करण्यात आल्या आहेत. याशिवाय काही वीरगळ व सतीशिळाही आहेत. या मंदिराच्या आवारात एक कुंड आहे. असे सांगितले जाते की या मंदिरापासून काही अंतरावर टेकडीच्या खडकातून वाहणारा एक झरा आहे. याचे पाणी गोमुखातून खालच्या या बांधीव कुंडात पडते.

या मंदिरात साजरा करण्यात येणारा मुख्य उत्सव महाशिवरात्र हा आहे. यावेळी येथे शिवलिंगाला अभिषेक, रुद्राभिषेक केला जातो. भजन-कीर्तन आणि आरतीही होते. यात शेकडो भक्त सहभागी होतात. श्रावणी सोमवारीही हिंगोली जिल्ह्यातील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. या मंदिराच्या गर्भगृहात असलेल्या शिळेचे नागपंचमीला पूजन केले जाते. यानिमित्ताने गावात मिरवणूकही काढली जाते. याशिवाय दरवर्षी ११ ऑक्टोबरला येथे तुकडोजी महाराज पुण्यतिथी साजरी केली जाते. त्यावेळी अन्नदान केले जाते.

उपयुक्त माहिती:

  • सेनगाव येथून २२ किमी आणि हिंगोली येथून ५१ किमी अंतरावर
  • सेनगाव येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home