पुणे जिल्ह्यातील जुन्नरपासून जवळच असलेल्या वडज या निसर्गसमृद्ध गावात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबाचे एक सुंदर मंदिर आहे. खंडोबाचे हे स्थान जागृत मानले जाते. बोरीच्या एका झाडाच्या खोडात देवाचे वास्तव्य असल्याने त्याला आपसूकच एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील खंडोबाच्या महत्त्वाच्या स्थानांपैकी हे एक असल्याने भाविकांची येथे कायमच वर्दळ असते.
मीना नदीच्या काठावरील वडज गावातील खंडोबाचे मूळ स्थान गावाला लागून असलेल्या डोंगरावर आहे. देवाचे वास्तव्य असल्यामुळे त्याला ‘भंडारा डोंगर’ असे म्हटले जाते. या मंदिराबाबत आख्यायिका अशी की, सदानंद चव्हाण नावाचा एक भाविक भंडारा डोंगरावरील खंडोबाच्या सेवेत मग्न असे. वाढत्या वयोमानानुसार त्याला या डोंगरावरील चढ-उतार करणे कठीण होऊ लागले. त्याची ही अवस्था पाहून प्रत्यक्ष देवाने त्याला स्वप्नदृष्टांत देऊन मी तुझ्यासोबत खाली यायला तयार आहे, असे सांगितले. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी देव त्याच्यामागे मागे खाली येऊ लागले, परंतु शंका आल्याने त्याने मागे वळून पाहिले, तेव्हा मोठा आवाज होऊन तेथील एका बोरीच्या झाडात खंडोबा लुप्त झाले.
सध्याचे मंदिर हे याच बोरीच्या झाडाभोवती बांधण्यात आले आहे. वेशीतून आत शिरताच एका किल्ल्याच्या परिसरात आल्याचा भास होतो. मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला बुरूज आहेत. बुरुजांच्या मध्यभागी खंडोबाचे वाहन असलेला पांढऱ्या रंगाच्या घोड्याचा पुतळा आहे. किल्ल्यांवर टेहळणीसाठी असतात तशी बुरुजांची रचना येथे केलेली दिसते. मंदिराबाहेर पूर्ण दगडाचे बांधकाम केलेले आहे. मंदिर प्रशस्त असून मोठे दगडी खांब व घुमट व त्यावरील विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. विविध नक्षीकाम, वैविध्यपूर्ण भौमितिक रचना, फुलांचे आकार यांचा योग्य वापर करीत मंदिर सजवण्यात आले आहे.
मंदिरात प्रवेश करताच भलीमोठी मारुतीची मूर्ती दिसते. तेथून आत काही पायऱ्या चढून गेल्यावर नंदी सभामंडप लागतो. नक्षीदार चांदीच्या गाभाऱ्यातील श्रीखंडेरायांची प्रसन्न मूर्ती आकर्षक भासते. मुख्य मंदिरातून बाहेर आल्यावर समोरच ज्या बोरीच्या झाडात खंडेराय विलीन झाले, ते झाड दिसते. या झाडाच्या खोडात खंडोबाची दगडी मूर्ती आहे. हे येथील देवाचे मूळ स्थान. ‘बोरीच मंदिर झाले। चिरंजीवत्व ते पावले।।’ असे वर्णन या स्थानाचे केले जाते. अजूनही हे झाड मंदिराच्या कळसाशी स्पर्धा करीत उभे आहे. भाविकांकडून या बोरीच्या खोडावर भंडारा व खोबऱ्याची उधळण केली जात असल्याने हा संपूर्ण परिसर पिवळा धम्मक दिसतो.
झाडाच्या आजुबाजूला महादेव, विठ्ठल-रुक्मिणी, राम-लक्ष्मण-सीता, गणपती, दत्त, तुकाराम महाराज यांची मंदिरे आहेत. मंदिरासमोर एक जुनी दगडी दीपमाळ आहे त्यावर उत्सवाच्या वेळी दिवे लावण्यात येतात. मंदिराचा परिसर स्वच्छ, नीटनेटका आणि शांत आहे.
चंपाषष्ठीच्या दिवशी देव डोंगरावरून खाली आला म्हणून या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. देवांच्या पादुकांची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते. मुंबई, पुणे व व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहणारे येथील ग्रामस्थ आवर्जून या दिवशी उपस्थित राहतात. हा खंडोबा नवसाला पावतो, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. सकाळी ६, दुपारी ११.३० व सायंकाळी ४.३० वाजता होणाऱ्या आरतीच्या वेळी येथे कौल लावले जातात. त्यानंतर सायंकाळी सात वाजता आरती होते. भाविकांना सकाळी पाच ते सायंकाळी ७.३० या वेळेत खंडेरायाचे दर्शन करता येते.
मंदिर ट्रस्टतर्फे अत्यंत कमी खर्चात सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. त्यामध्ये वर्षाला सहाशे विवाह लावले जातात. परिसरातील गावांतील विद्यार्थ्यांसाठी देवस्थानतर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शाळा चालविल्या जातात. याशिवाय भाविकांसाठी उत्तम भक्तनिवास व प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. या देवस्थानाला शासनाचा ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे.