
पुणे जिल्ह्यातील जुन्नर हा निसर्ग पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्यात आला आहे. जुन्नर शहरापासून काही अंतरावर निमदरी गावातील निसर्गसमृद्ध परिसरात कुलस्वामीनी रेणुका मातेचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच गाभाऱ्यात रेणुकामाता व पुत्र परशुराम यांचे मुखवटे आहेत. आई व मुलाचे हे मंदिर दुर्मिळ समजले जाते.
मीना नदी काठावरील या मंदिराचा परिसर रम्य भासतो. मुख्य रस्त्याला लागून असलेल्या या पेशवेकालीन मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या खाली उतरावे लागते. एका भिंतीला वळसा घालून मंदिरात प्रवेश केल्यानंतर तेथील प्रसन्न व तितकेच वैशिष्ट्यपूर्ण असे रेणुका देवी व परशुराम यांचे मुखवटे आहेत. गाभाऱ्यातील सोनेरी मखरात हे दोन मुखवटे शेजारी शेजारी स्थित आहेत.
मंदिर परिसरात दत्तमंदिर, महादेव मंदिर, शितलामाता मंदिर व काशी विश्वेश्वराचे मंदिर आहे. दगडी चौथरे व नदीकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधल्या आहेत. त्या पायऱ्यांवर नदीकिनारी शंकराची मूर्ती आहे.
रेणुका माता ही जुन्नर व परिसरातील अनेक कुटुंबांची कुलदेवता असल्याने या मंदिरात भाविकांची नेहमीच गर्दी असते.
मंदिराची आख्यायिका अशी, राजगुरूनगर तालुक्यातील कन्हेरसर येथे रेणुकादेवीचे मूळ स्थान आहे. जुन्नरमधील एरंडे घराण्यातील एक ब्राह्मण नियमित कन्हेरसर येथे घोड्यावर स्वार होऊन देवीच्या दर्शनाला जात असे. परंतु पुढे वार्धक्यामुळे त्याला तेथे जाणे कठीण होऊ लागले. त्याने देवीला विनंती केली, की माते मी आता वयोवृद्ध झाल्याने पूजेसाठी तुझ्या ठिकाणी येऊ शकत नाही. त्याच रात्री देवीने ब्राह्मणाला स्वप्नदृष्टांत देऊन मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे, मला तू येथे येऊन घेऊन जा, असे सांगितले. परंतु हे सांगताना देवीने त्याला एक अट टाकली, की तू मागे वळून पाहायचे नाही. नाहीतर मी तिथेच लुप्त होईन. ब्राह्मणाला मोह आवरला नाही आणि निमदरी गावाजवळ आता मंदिर असलेल्या ठिकाणी त्यांनी मागे वळून पाहिले. त्याच ठिकाणी आता रेणुका मंदिर उभे आहे.
महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक या देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात. मंदिरात चैत्रपौर्णिमा आणि नवरात्रीत मोठा उत्सव असतो. नवरात्रीच्या ९ दिवस भरगच्च कार्यक्रम असतात. पहिल्या दिवशी अभिषेक व सात वाजता महाआरती होते. नंतर पालखीतून देवीची गावभर मिरवणूक काढण्यात येते. हरिजागर, कीर्तन, प्रवचन, भजन असे टप्प्याटप्याने कार्यक्रम होतात.
रेणुकामातेचा वास जेथे आहे त्या निमदरीच्या मीना नदीत स्नान केल्याने त्वचारोग बरे होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे आताही अनेक भाविक नदीत स्नान करून देवीचे दर्शन घेतात. सकाळी पाच ते सायंकाळी साडेसात या वेळेत भाविकांना देवीचे दर्शन घेता येते. सकाळी सात व सायंकाळी सात वाजता देवीची आरती होते. मंगळवार व शुक्रवारी सकाळी साडेपाच ते नऊ या कालावधीत देवीला कौल लावले जातात. येथे अन्नदानाचे कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात होत असतात. या मंदिराच्या आवारात भक्तनिवासाचीही सुविधा आहे.