कुलस्वामी खंडेराय

नळावणे, ता. जुन्नर, जि. पुणे


संगमनेर, जुन्नर व पारनेर या तीन तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या नळावणे गावातील श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान हे महाराष्ट्रातील खंडोबाच्या प्रमुख स्थानांपैकी एक. पुण्यापासून ८८ किलोमीटरवर असलेल्या या गावात नवव्या शतकापासून खंडेरायाचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते. २००६ साली गगनगिरी महाराजांच्या हस्ते या मंदिराचा जीर्णोद्धार करून सुंदर वास्तू बांधण्यात आली.

या मंदिराची आख्यायिका अशी की नल-दमयंतीच्या विनंतीला मान देऊन खंडेरायाने बानूसोबत विवाह केला. त्यानंतर प्रवास करीत असताना ते दुर्गडीच्या नळपठारावर आले. येथील सुंदर वातावरण पाहून खंडेराय व बानूने या ठिकाणी दोन दिवस मुक्काम केला. या दोन दिवसांत त्यांनी येथे शिवलिंगाची स्थापना केली आणि पूजा-अर्चा करून ते मार्गस्थ झाले. त्यानंतर अनेक वर्षांनी या गावातील एका भक्ताच्या हाकेला धावून खंडोबा या ठिकाणी पुन्हा आले. तेव्हापासून या स्थानावर खंडोबा व शिवलिंगाची पूजा केली जाते. शिवपिंडीबरोबरच येथे खंडोबाच्या मूर्तीचीही प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

पुणे-नाशिक महामार्गावरील आळे फाट्यावरून नगरकडे जाताना नळावणे गाव लागते. गावाशेजारी असलेल्या डोंगरपठारावर हे जागृत स्थान आहे. ‘पठारावरचा खंडोबा’, अशीही या स्थानाची ओळख आहे. नळावणे गावातून मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या लागतात. मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक छानसे उद्यान विकसित केलेले दिसते. त्यातून मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शोभेची झाडे लावण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसर खुलून दिसतो.

मंदिरासमोर एक भव्य दगडी दीपमाळ आहे. तिच्यासमोर उभे राहिल्यावर जुन्नर तालुक्यातील बराचसा भाग नजरेच्या टप्प्यात येतो. मंदिराच्या प्रशस्त सभामंडपात छानशी सजावट केलेली आहे. चांदीच्या नक्षीदार गाभाऱ्यात खंडेरायासोबतच बानूबाई व म्हाळसादेवी यांच्या मूर्ती आहेत. देवाचे वाहन असलेल्या घोड्याचे शिल्पही तेथे आहे. या मंदिरात भाविकांकडून खंडोबाला फूल (कौल) लावण्याची प्रथा आहे. एखादी गोष्ट करावी अथवा करू नये, यासाठी देवाला फूल लावले जाते. उजवीकडे फूल पडल्यावर ती गोष्ट करावी आणि डावीकडे फूल पडल्यावर करू नये, असा देवाचा संकेत असल्याचे मानले जाते. मंदिराचा सोन्याचा मुलामा दिलेला कळसही सुबक आहे.

मार्गशीर्ष महिन्यात येथे साजरा होणारा चंपाषष्ठी महोत्सव परिसरात प्रसिद्ध आहे. या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. पहाटे ४ वाजल्यापासून पूजेला सुरुवात होते. देवाचे स्नान, अभिषेक झाल्यानंतर दिवसभर भजन-कीर्तनासारखे कार्यक्रम होतात. गावात सकाळी ८ वाजता खंडोबाच्या मूर्तीची मिरवणूक निघते. या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांसोबतच तालुक्यातील हजारो भाविक येथे उपस्थित असतात.

लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात निघणारी ही मिरवणूक संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध आहे. सुके खोबरे व भंडारा (हळद) ताटात घेऊन ‘सदानंदाचा येळकोट’ करीत भंडाऱ्याची उधळण होते. ज्यांनी देवाला नवस केला असेल त्यांच्या नवसपूर्तीसाठी काठी उभारली जाते. ही प्रथा शेकडो वर्षांपासून सुरू असल्याचे ग्रामस्थ सांगतात. या यात्रोत्सवात होणाऱ्या बैलगाडा शर्यती हेही येथील आकर्षण. या बैलगाडा शर्यतीसाठी पुण्यासह नगर जिल्ह्यातील स्पर्धकही येथे येतात. दुसऱ्या दिवशी ‘कुस्तीपटू हंगामा’ म्हणजे कुस्तीच्या स्पर्धा झाल्यानंतर यात्रा संपन्न होते. याशिवाय चैत्र पौर्णिमेलाही येथे यात्रा भरते. देवस्थानातर्फे येथे भाविकांसाठी भक्त निवासाची सुविधा करण्यात आली आहे.

उपयुक्त माहिती:

  • जुन्नरपासून ५२ किमी; तर पुण्यापासून ८८ किमी अंतरावर
  • जुन्नरहून येथे येण्यासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत नेण्याची व्यवस्था
  • मंदिराशेजारी भक्त निवासाची सुविधा
Back To Home