कोटलिंग जोगेश्वरी देवस्थान

चिखलठाण, ता. करमाळा, जि. सोलापूर

महादेवाचे स्थान असलेल्या भीमाशंकरमधून भीमेचा उगम होतो. गावागावातून वाहणाऱ्या या नदीशेजारी शंकराची असंख्य मंदिरे उभी राहिली. चिखलठाणच्या लिंगमंदिरामुळे त्यांची संख्या एक कोटी झाल्याचे मानण्यात येते. त्यामुळेच या मंदिराची ओळख कोटलिंगेश्वर अशी आहे. उजनी धरणामुळे हे मंदिर पाण्याखाली गेल्यामुळे ग्रामस्थांनी या मंदिरापासून तीन किमी अंतरावर काही वर्षांपूर्वी नदीच्या तिरावर नव्याने दुसरे मंदिर उभारले आहे. तेव्हापासून मूळ मंदिरात साजरे होणारे अनेक सण व उत्सव या मंदिरातही साजरे केले जातात.
भीमा नदीच्या किनाऱ्यावर १६४२ मध्ये हे मंदिर उभारण्यात आले होते. मंदिराची अख्यायिका अशी की पूर्वी म्हसवड येथे नाथ महाराजांचे स्थान होते. तेथे एक मुलगी महाराजांची सेवा करत असे. काही दिवसांनी ती आपल्या घरी निघाली. तिच्या सेवेमुळे प्रसन्न झालेल्या नाथांनी तिला वर मागण्यास सांगितले. ती म्हणाली मी जिथे असेन तिथे मला माझ्या देवाचा चेहरा दिसावा. नाथांनी ते मान्य केले. तुझा देव तुझ्यामागून तुझ्या गावी येईल, असे त्यांनी सांगितले. पण मागे वळून पहायचे नाही, अशी अटही घातली. घरी निघालेली ती मुलगी भीमा नदीकाठी आली. नदीला मोठा पूर आला होता. तिच्या मागून आवाज आला, नदी पार कर मी तुझ्या पाठीशी आहे. त्या विश्वासाच्या बळावर ती नदीत शिरली. पाण्याच्या जोरदार प्रवाहावर मात करत ती पलिकडच्या तीरावर पोहोचली. आपल्या मागे असणारा देव या जोरदार प्रवाहातून किनाऱ्यापर्यत पोहोचू शकला आहे की नाही हे पहाण्यासाठी तिने मागे पाहिले. देव मागे होतेच. पण तिने मागे वळून पाहिल्याने त्यांनी पुढे येण्यास नकार दिला. मग त्याच स्थानी त्यांचे मंदिर उभारण्यात आले. तेच कोटलिंगेश्वराचे मंदिर होय.
धरणाच्या पाण्याखाली हे पुरातन मंदिर गेल्याने गावकऱ्यांनी देवाला साकडे घातले होते. असे सांगितले जाते की धरण बांधल्याच्या पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्यात धरणातील पाणी कमी झाले. हे मंदिर पुन्हा पाण्यावर आले. आनंदित झालेल्या गावकऱ्यांनी त्या मंदिरातील मूर्तीला सुमारे तीन किलोमीटर अलिकडे पुनःस्थापित केले. मंदिराचा परिसर प्रशस्त आहे. तीन बाजूंना असलेले धरणाचे पाणी आणि मंदिराभोवती असलेली गर्द हिरवाई यामुळे येथे रम्य वातावरण असते.
मंदिराभोवती असलेल्या तटबंदीत बाहेरील बाजूने अनेक ओवऱ्या आहेत. या तटबंदीत मंदिराचे तीन मजली प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या समोरील बाजूस एक लहानसे मंदिर आहे. त्यात एक साधुमूर्ती व पादुका आहेत. याशिवाय हत्ती व नंदी यांची शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या महिरपी कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस द्वारपाल कक्ष आहेत. तटबंदीच्या आतील बाजूनेही ओवऱ्या आहेत. या ओवऱ्यांना लागून दोन दीपमाळा आहेत. उजव्या हाताला मंदिराच्या प्रांगणात येण्यासाठीचे दुसरे प्रवेशद्वार आहे. तेही बहुमजली आहे. प्रांगणात मध्यभागी दगडी बांधणीचे कोटलिंग मंदिर आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूच्या भिंतीत दोन विरगळ शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या खालील बाजूस किर्तीमुख व ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती आहे.
प्रवेशद्वारातून मंदिराच्या बंदिस्त सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी दर्शनरांगांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गर्भगृहात वज्रपिठावर कोटलिंगेश्वर व जोगेश्वरी देवीच्या मूर्ती आहेत. या दोन्ही मूर्तींना चांदीचे मुखवटे व मुकुट आहेत. गर्भगृहाचे प्रवेशद्वार लहान असल्यामुळे भाविकांना सभामंडपातूनच गर्भगृहातील कोटलिंग व जोगेश्वरी देवीचे दर्शन घ्यावे लागते. येथील सभामंडपाच्या सज्जावरून कोटलिंगेश्वराच्या नवसाने झालेल्या लहान मुलांना उत्सवकाळात खाली फेकण्याची प्रथा आहे. यावेळी खाली उभे असणारे घडसी व सालकरी यांच्याकडून या मुलांना अलगद झेलले जाते. गर्भगृहावरील शिखर हे दहा थरांचे आहे. यापैकी पहिल्या तीन स्तरांवर स्तंभांची कलाकुसर व उर्वरित स्तरांवर देवकोष्टकांची रचना आहे. शिखराच्या शिरोभागी दोन आमलक व कळस आहेत.
दरवर्षी चैत्र वद्य अष्टमीला येथे मोठी यात्रा असते. यात्रेच्या काही दिवस आधीच उत्सवाची सुरुवात देवपारध या विधीने होते. या दरम्यान देव शिकारीला निघतो व दुसऱ्या दिवशी परततो. यानंतर देवाला तेल लावण्याचा विधी होतो. हा अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो. कारण या दिवशी साऱ्या गावाचेच व्रत सुरु होते. या व्रतादरम्यान गावात मांसाहार वर्ज्य असतो. गावकरी या काळात केस, दाढी वा नखे कापत नाहीत. शेतीच्या मशागतीची कामेही या काळात केली जात नाहीत. हे व्रत देवाच्या लग्नाच्या दिवसापर्यत चालते. ज्या पौर्णिमेला देवाचे लग्न लागते त्याला आंबिल पौर्णिमा म्हणतात. कारण यावेळी देवाचे लग्न लागून पालखी पुन्हा मंदिरात आली की प्रसाद म्हणून आंबिल दिली जाते. मग गावकऱ्यांच्या उपवासाची सांगता होते. आंबिल पौर्णिमेनंतर आठ दिवसांनी म्हणजे चैत्र वद्य अष्टमीला देवाचा छबिना असतो. त्याच दिवशी बारा बलुतेदारांकडून गावाला महाप्रसाद दिला जातो.
या उत्सवासाठी लाखो भाविक उपस्थित असतात. पूर्वी या उत्सवादरम्यान तोफा उडवण्याची प्रथा होती. नंतरच्या काळात तोफांबरोबर फटाक्यांची आतषबाजीही होऊ लागली. त्यासाठी खास नवसही बोलले जाऊ लागले. संपूर्ण रात्र ही शोभेच्या दारुकामाची रोषणाई होत असे. तेही भाविकांच्या आकर्षणाचे एक केंद्र ठरत असे. मात्र १९९४ साली उत्सवासाठी आणलेल्या फटाक्यांच्या दारुचा स्फोट झाल्यानंतर येथील आतिशबाजीवर मर्यादा आल्या आहेत.

उपयुक्त माहिती

  • करमाळा येथून ३२ किमी, तर सोलापूर येथून १३७ किमी अंतरावर
  • करमाळा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home