कोटेश्वरी देवी

मुरूड, ता. मुरूड, जि. रायगड

अलिबाग-मुरूड मार्गावर मुरूडच्या आधी दोन किमी अंतरावर तुळजाभवानीचे प्रतिरुप असलेल्या कोटेश्वरी देवीचे मंदिर आहे. एका बाजूला पद्मदुर्ग किल्ला, मध्ये समुद्र व दुसऱ्या बाजूला घनदाट जंगल असलेला डोंगर अशा निसर्गसमृद्ध परिसरात कोटेश्वरी देवीचे मंदिर स्थीत आहे. समुद्रावर वचक रहावा म्हणून मराठ्यांनी मुरूडजवळ कासा म्हणजेच पद्मदुर्ग किल्ला उभारला. असे सांगितले जाते की देवीचे मूळ मंदिर समुद्राने वेढलेल्या याच किल्ल्यात होते. देवी तेथून मुरूडला आली आणि येथेच राहिली. कोटेश्वरी देवी मंदिर हे मुरुडसह अलिबाग तालुक्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
मंदिरासंदर्भात अख्यायिका अशी की येथून जवळच समुद्रात असलेल्या पद्मदुर्ग किल्ल्यात देवीचे मूळ स्थान होते. कोटाच्या म्हणजे तटबंदीच्या ते जवळ असल्याने तिला कोटेश्वरी देवी म्हणत. ती पाषाणातून प्रकट झाली होती. एके दिवशी त्या मूळ स्थानाशेजारी असलेला खांब तुटून समुद्रात पडला. तो वाहत वाहत आज जे कोटेश्वरी देवीचे मंदिर आहे तिथे लागला. आश्चर्याची गोष्ट अशी की खवळलेल्या समुद्रातून वाहत आलेल्या त्या खांबासोबत मूळ स्थानी असलेल्या देवीचा मुखवटाही होता. लाटांबरोबर वाहत आलेला तो खांब आणि त्यासोबतचा मुखवटा ग्रामस्थांनी पाहिला आणि देवीची येथे स्थानापन्न होण्याची इच्छा असल्याचे समजून या जागेवर त्यांनी मंदिर उभारले. सोबत तो लाटेचा खांबही त्यांनी जवळच उभा केला. (लाटेसोबत वाहत आला म्हणून त्याला लाटेचा खांब म्हटले जाते) पद्मदुर्ग किल्ल्यातून तुटून आलेला तो खांब आजही मंदिरासमोर एखाद्या तपस्वीसारखा उभा आहे. अनेक उन्हाळे-पावसाळे सहन करूनही या खांबावर काही परिणाम झालेला नाही. या तुटलेल्या खांबाचा काही भाग अजूनही पद्मदुर्ग किल्ल्यात आहे. त्याचे छायाचित्र मंदिरात पाहायला मिळते.
मुख्य रस्त्यालगत असलेल्या या मंदिराचे प्रवेशद्वार मात्र विरुद्ध दिशेला म्हणजेच समुद्राकडे आहे. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिरासमोर एक मोठी दीपमाळ आहे. तिच्या शेजारीच एका चौथऱ्यावर एक लाकडी खांब आहे. मूळ किल्ल्यात असलेल्या देवीच्या मूळ स्थानाचा हा खांब होय. प्रांगणातून पाच पायऱ्या चढून उंच अधिष्ठानावर असलेल्या मंदिराच्या मंडपात प्रवेश होतो. अर्धखुल्या स्वरुपाच्या या मंडपातून सभामंडपात प्रवेश होतो. येथील आटोपशीर सभामंडपात मध्यभागी काहीशा खोलगट भागात देवीचे स्थान आहे. येथे वाघावर आरुढ असलेली देवीची सुंदर मूर्ती आहे. हातांत त्रिशूल आणि इतर शस्त्रे असली तरी देवीच्या चेहऱ्यावर मात्र प्रेमळ भाव दिसतात. सभामंडपातून या गर्भगृहाला प्रदक्षिणा मार्ग आहे.
अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रोत्सव सुरू होतो. यावेळी देवीला मुखवटा, प्रभावळ, ढाल-तलवार, त्रिशूल, कमरपट्टा, पैंजण आदी आभूषणांनी आणि विविध वस्त्रांनी सजविले जाते. चैत्र शुद्ध चतुर्दशीला होणाऱ्या यात्रेच्या आदल्या दिवशी देवीची पालखी निघते. त्यावेळी नारळ वाढवायला येथील भाविक पद्मदुर्ग किल्ल्यातील मंदिरात जातात. पावसाळ्यानंतर होड्या उतरविण्याआधी देवीच्या दर्शनाला व नवस बोलण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील कोळी बांधवांची येथे हमखास हजेरी असते. कोळी समाजाबरोबरच मारवाडी समाज, तसेच जिल्ह्यातील अनेक भाविक या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येतात.
१७६० ते १७७० या दशकात कोटेश्वरी देवी मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. जंजिरा संस्थानवर मुस्लिम धर्मीय नबाबाचा अंमल असला तरीही या मंदिराच्या देखभालीसाठी धुपाडा दिल्याचाही उल्लेख कागदपत्रात आहे. सुरुवातीला हे मंदिर अगदी छोटे होते. अलिकडे १९७० साली मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि हे टुमदार मंदिर उभे राहिले. नवाब काळापासून या मंदिराला दिवाबत्तीचा खर्च दिला जात होता. अजूनही सरकारकडून ती परंपरा सुरू आहे.

उपयुक्त माहिती:

  • मुरूड बसस्थानकापासून दोन किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून मुरूडसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home