कोर्टेश्वर महादेव मंदिर

कोर्टी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर

कोर्टी हे गाव त्याचा परिसर ही शंभू महादेवाची भूमी मानली जाते. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे गावात अनेक ठिकाणी खोदकाम केले असता जमिनीत शिवलिंग आढळून येतात. असे म्हणतात की या स्थानी एक कोटी देव वास्तव्य करतात म्हणून या गावास कोर्टी असे नाव पडले. कोर्टेश्वर महादेव ही या गावाची आराध्यदेवता आहे. या मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे या मंदिरात सात गर्भगृहे आहेत. वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेल्या या प्राचीन मंदिरात दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांप्रमाणेच कोकणातील भाविकही मोठ्या प्रमाणावर येतात.

सप्तलिंग महादेव या नावानेही ओळखले जाणारे हे मंदिर मोठमोठ्या अखंड शिळांचा वापर करून बांधण्यात आले आहे. या मंदिराच्या उभारणीसंदर्भात अशी आख्यायिका रूढ आहे की या परिसरात एक शिवभक्त असूर राहात होता. शंकरास प्रसन्न करण्यासाठी त्याने आपल्या राक्षसी ताकदीने एका रात्रीत हे मंदिर उभारले. या मंदिर परिसरात एक दगडी जलकुंड आहे. त्याविषयी आख्यायिका अशी की एकदा भगवान श्रीकृष्ण हे पंढरपूर येथे विठ्ठलाच्या भेटीसाठी आले असता त्यांनी दिंडिरवनात वास्तव्य केले होते. तेथून ते सध्या कोर्टेश्वर महादेव मंदिर आहे त्या परिसरात गायी घेऊन येत असत. त्या गायी येथील कुंडातील पाणी पीत असत. लोकमान्यतेनुसार, त्यांच्या पाऊलखुणा या येथे उमटलेल्या आहेत.

रस्त्यालगत असलेल्या या मंदिराचे प्रांगण प्रशस्त आहे. प्राचीन मंदिरासमोर अलीकडील काळात दर्शन मंडप उभारलेला आहे. दर्शनमंडपात प्रवेशद्वारावरील सुमारे दहा फूट रुंद जागा खोलगट आहे. या खोलगट जागेच्या दोन्ही बाजूला चौथऱ्यांना लागून भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपात एकूण ३२ नक्षीदार स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. स्तंभदंडात चौकोन, षट्कोन, अष्टकोन वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. सभामंडपाच्या वितानावर चक्राकार नक्षी आहे. स्तंभदंड, हस्त, तुळई यांवर विविध नक्षी कोरलेल्या आहेत. सभामंडपात मध्यभागी असलेल्या चार स्तंभांच्या मधे चौकोनी रंगशिळा आहे. प्राचीन काळी देवाच्या रंगभोगासाठी रंगशिळेवर नृत्य, गायन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असे. सभामंडपातील दोन चौथऱ्यांवर नंदी मूर्ती आहेत. सभामंडपात देवकोष्टकांमध्ये गणपती, पार्वती आदी देवदेवतांच्या मूर्ती आहेत.

गर्भगृहांच्या द्वारशाखांवर पाना फुलांच्या नक्षी ललाटबिंबांवर गणपतीच्या मूर्ती आहेत. मंदारकावर कीर्तीमुखे आहेत. सर्व गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी त्यावर छत्र धरलेले पितळी नाग आहेत. काही गर्भगृहांत मागील भिंतीलगत पार्वतीच्या प्राचीन मूर्ती नागशिळा आहेत. मुख्य गर्भगृहाच्या छतावर शंकू आकाराचे शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक त्यावर कळस आहे. मंदिराच्या शेजारी विठ्ठल रखुमाई यांचे लहान मंदिर आहे. त्यात वज्रपिठावरील विठ्ठल रखुमाई यांच्या मूर्तींच्या दोन्ही बाजूला संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज यांच्या मूर्ती आहेत. या मंदिराच्या बाजूला दत्तात्रेयांचे मंदिर आहे. मंदिराच्या प्रांगणात एका चौथऱ्यावर प्राचीन विरगळ सतीशिळा आहेत.

या मंदिरापासून साधारणतः २०० फूट अंतरावर भस्माचा डोंगर आहे. येथील शिवशंभू महादेवाच्या नित्य पुजेसाठी याच भस्माचा आवर्जून वापर केला जातो. कोर्टी या चारपाच हजार लोकवस्तीच्या गावात पूर्वीपासून एक प्रथा चालत आली आहे. ती प्रथा अशी की कोर्टीश्वर येथे पोहचले की दगडी जलकुंभावर जावून स्नान करायचे त्यानंतर कृष्णकालीन गोमातेच्या पाऊलखुणांचे दर्शन घ्यायचे, भस्माच्या डोंगरावर जायचे, कपाळी भस्म धारण करायचे आणि कोर्टीश्वराचे दर्शन घ्यायचे. हा दर्शनक्रम भाविकांकडून आजही पाळला जातो

मंदिरात पहाटे .३० वाजता नित्य पूजा सकाळी वाजता आरती होते. येथे चैत्र शुद्ध एकादशीला कोर्टेश्वराची यात्रा असते. श्रावणात येथे मोठा उत्सव असतो. प्रत्येक श्रावणी सोमवारी दिवसभर आजूबाजूच्या परिसरातून लोक दर्शनास येथे येत असतात. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी मंदिरात प्रतीवर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहास सुरूवात होते. मोठ्या संखेने भाविक पारायणास बसतात. सप्ताहाच्या समारोपाला मंदिर परिसरात कीर्तन होते. महाशिरात्रीच्या दिवशी कोर्टी येथे भाविकांची भरपूर वर्दळ असते. या दिवशी तसेच श्रावणी सोमवारी कोर्टीश्वर महादेवाचा परिसर भजन शंखनादाने दुमदुमून जातो

उपयुक्त माहिती

  • पंढरपूरपासून किमी अंतरावर
  • पंढरपूर येथून एसटी खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : गुरव, मो. ९६५७६४५७२५
Back To Home