पुण्यातील पेशवाई, ब्रिटिश कालखंड आणि स्वातंत्र्याचा लढा या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेले खुन्या मुरलीधर मंदिर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सदाशिव पेठेत स्थित आहे. एक ऐतिहासिक देवस्थान म्हणून हे मंदिर प्रसिद्ध असून त्याला रक्तरंजित इतिहास आहे. सध्या ‘हेरिटेज वास्तु’ म्हणून हे मंदिर पुरातत्व खात्याच्या अखत्यारित असले तरी भाविकांना मंदिरात जाऊन मुरलीधर व राधेचे दर्शन घेता येते.
ऐतिहासिक नोंदींनुसार, पेशव्यांचे सावकार असलेले सदाशिव रघुनाथ ऊर्फ दादा गद्रे यांनी हे मंदिर बांधले व श्रीकृष्ण व राधा यांच्या मूर्तींची ६ मे १७९७ मध्ये प्राणप्रतिष्ठापना केली. आज ज्या ठिकाणी अहिल्यादेवी शाळा आहे, त्या ठिकाणी गद्रे यांचा भव्य वाडा होता, तर आता ज्या ठिकाणी मंदिर आहे तिथे त्यांची मोठी बाग होती. दादा गद्रे यांना झालेल्या स्वप्नदृष्टांतानुसार त्यांनी बागेच्या ठिकाणी मुरलीधराचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी जयपूर येथून श्री. बखतराम या मूर्तिकाराकडून राधा आणि कृष्णाच्या संगमरवरी मूर्ती घडवून घेतल्या. त्यासोबतच त्यांनी सवत्स धेनु (गाय वासरू) आणि गरूड मूर्तीदेखील घडवून घेतल्या.
पाहता पाहता या मूर्तींची ख्याती सर्वत्र पसरली. दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नजरेत त्या मूर्ती भरल्या. या मूर्ती आमच्याकडे देण्यात याव्यात, असा प्रस्ताव पेशव्यांनी गद्रे यांच्याकडे मांडला. मात्र, गद्रे यांना ते मान्य नव्हते. त्यांना जो स्वप्नदृष्टांत झाला होता, त्यानुसार मूर्ती त्यांच्या बागेतच असणे गद्रे यांना आवश्यक वाटत होते. मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर त्या हलवता येणार नाहीत, हे ओळखून पेशव्यांच्या फौजेत तैनात असलेला ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा अधिकारी मिस्टर बॉइड याला पेशव्यांनी सैनिकांसह मंदिराकडे पाठवले. त्यावेळी त्र्यंबकेश्वरचे वेदमूर्ती नारायण खरे यांच्या हस्ते गद्रे यांच्याकडून मंदिरात मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना सुरू होती. ब्रिटिश सरकारचे सैनिक आणि गद्रे यांच्याकडे असणाऱ्या अरब सैनिकांमध्ये यादरम्यान चकमक उडाली आणि त्यात शेकडो सैनिकांचा मृत्यू झाला. हा रक्तपात होत असतानाच प्राणप्रतिष्ठापना विधी पार पडला. त्यामुळे या मंदिराला खुन्या मुरलीधर मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले.
प्राणप्रतिष्ठापनेनंतर पेशव्यांनी मूर्तींचा अट्टहास सोडला. मात्र, मूर्ती देण्यास केलेला विरोध म्हणून श्री. गद्रे यांना २३ वर्षे अहमदनगर येथील कारागृहात शिक्षा भोगावी लागली. तसेच त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात आली. त्यादरम्यान, नारायण खरे यांनी मंदिराची देखभाल केली. गद्रे यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी या मंदिराचा कारभार खरे कुटुंबीयांकडे सोपवला आणि संन्यास घेतला. पुढे स्वातंत्र्यलढ्याच्या काळात क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके आणि चाफेकर बंधू यांच्या अनेक बैठका या मंदिराच्या आवारात झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पेशव्यांनंतर इंग्रजांचाही रोष या मंदिरावर होता. त्यामुळे पेशवेकाळापासून या मंदिराला कोणतेही अनुदान मिळू शकले नाही.
या मंदिराभोवती चिरेबंदी भिंत आहे. कळसावर सुंदर नक्षीकाम आहे. मंदिराच्या आवारात अनेक जुने वृक्ष आहेत. मंदिराचा सभामंडप लाकडी आहे. त्यात अत्यंत सुबक फुला–पानांची नक्षीकाम असणारे स्तंभ आणि महिरपी, झुंबर, जुने दिवे, शंभर वर्षांपूर्वीचे घड्याळ आणि गरूड पक्ष्याचे मंदिर पाहायला मिळते. राजा रवी वर्मा यांनी काढलेली काही पौराणिक चित्रेही येथे आहेत.
गर्भगृहात श्रीकृष्ण आणि राधेच्या सुंदर मूर्ती आहेत. मूळ गाभारा आणि मूर्ती स्थापन केलेले सिंहासन एकसंध काळ्या पाषाणाचे आहे. मुरलीधराची मूर्ती एक पाय व दुसऱ्या पायाच्या अंगठ्यावर उभी आहे. महाराष्ट्र सरकारने या मंदिराला हेरिटेज वास्तूचा ‘अ‘ दर्जा दिला आहे. सकाळी ६.३० ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत भाविकांना मंदिरात मुरलीधर व राधेचे दर्शन करता येते.