खंडोबा मंदिर

बाळे, ता. सोलापूर, जि. सोलापूर

महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशात खंडोबा विशेष करून पूजला जातो. या तीन राज्यांत मिळून खंडोबाची एकूण चौदा मुख्य पीठे आहेत. यातील यादगीर हे एकमेव स्थान आंध्र प्रदेशात आहे. आदीमैलार, मंगसुळी, मैलारलिंग, देवरगुड्डु, मण्णमैलार ही पाच स्थाने कर्नाटकात आणि जेजुरी, अणदूर, नळदुर्ग, निमगाव, शेंगुड, पाली, सातारे व बाळे ही आठ स्थाने महाराष्ट्रात आहेत. इतर सर्व स्थानांप्रमाणेच सोलापूर शहरापासून जवळ असलेल्या बाळे येथील जागृत खंडोबा नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर सुमारे चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीचे आहे. मंदिराची अख्यायिका अशी की मणी व मल्ल या राक्षसांचा निःपात करण्यासाठी महादेवाने खंडोबा अवतार घेतला. राक्षसांचा वध करून खंडोबा कर्नाटकातील आदीमैलार या ठिकाणी स्थापन झाला. त्यामुळे हे खंडोबाचे मूळस्थान असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील अणदूर येथे राजा नळ व दमयंती यांनी खंडोबाची निःसीम भक्ती केली. खंडोबा त्यांना प्रसन्न झाला. तेव्हा खंडोबाने अणदूर येथे स्थापित व्हावे, असा वर दमयंतीने मागितल्याने खंडोबा अणदूर येथे स्थापित झाला. बाळे गावातील माणकोजी पाटील देवाच्या दर्शनासाठी अणदूर येथे नियमित जात. पुढे वृद्धापकाळाने त्यांना देवाच्या दर्शनासाठी जाणे अशक्य होऊ लागल्याने त्यांनी देवाला आपल्या गावी येण्याची विनंती केली. तेव्हा देवाने आपण तुमच्या मागोमाग बाळ रुपात येतो. मात्र वाटेत ज्या ठिकाणी तुम्ही मागे वळून पाहाल त्याच ठिकाणी मी स्थापित होईन, असे म्हणून देव त्यांच्या मागोमाग चालू लागले. गावातील पाटील वाड्यात पोहोचताच माणकोजी पाटलांनी देव आपल्या मागे आले की नाही म्हणून मागे वळून पाहिले. त्याक्षणीच देव येथे थांबले. पुढे पाटलांनी या ठिकाणी मंदिर बांधले. देव बाळ रूपात येथे आल्याने गावाचे नाव बाळे असे पडले.
पुणे सोलापूर महामार्गावर बाळे हे गाव आहे. येथील पाटील वाडीत खंडोबाचे मंदिर आहे. या मंदिराकडे येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पूजसाहित्याची दुकाने आहेत. मंदिरास असलेल्या भक्कम तटबंदीत उत्तर व पूर्व दिशेला दोन प्रवेशद्वारे आहेत. मंदिर रस्त्यापेक्षा सुमारे पाच ते सहा फूट उंचीवर असल्यामुळे दोन्ही प्रवेशद्वारांसमोर कोरीव पाषाणात बांधलेल्या अकरा पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या वरच्या भागात चौथऱ्यावर मध्यभागी कासव शिल्प आहे. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर खालील बाजूला द्वारपाल शिल्पे आहेत. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व मंडारकास चंद्रशिळा आहे. चंद्रशिळेवर दोन्ही बाजूला किर्तीमुखे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला असलेल्या नक्षीदार स्तंभांवर तोरण आहे. पूर्व दिशेच्या दुमजली प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. दोन्ही प्रवेशद्वारांत आतील दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष आहेत. येथून पुढे मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो.
प्रशस्त प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. प्रांगणात मारुतीचे लहान मंदिर आहे. मंदिरात पद्मासनात ध्यानात बसलेली मारूतीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. मंदिराच्या बाजूला पाषाणी चौथऱ्यावर प्राचीन दीपमाळ आहे. हनुमान मंदिरासमोर गणपतीचे मंदिर आहे. येथे गणेशाची उभ्या स्थितीतील काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. याही मंदिराच्या बाजूला दीपमाळा आहे. प्रांगणात मध्यभागी कोरीव पाषाणात बांधलेल्या चौथऱ्यावर खंडोबा व बानुबाई यांच्या पितळी पादुका आहेत. चौथऱ्याच्या पुढे दोन लहान दीपमाळा आहेत. प्रांगणातील औदुंबर वृक्षाच्या पारावर नरसोबाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. देवाच्या पूजेची सुरूवात या नरसोबाच्या मूर्तीवर पाणी सोडून केली जाते. प्रांगणात देवाचे स्वयंपाकघर आहे. येथील चुलीवर देवाचे अन्न शिजवले जाते. मंदिरासमोर दगडी बांधणीचे तुलसी वृंदावन, नंदी, शिवपिंडी व काही प्राचीन शिल्पे आहेत.
अर्धमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. अर्धमंडप मूळ सभामंडपास जोडून नंतरच्या काळात बांधल्याचे जाणवते. अर्धमंडप प्रांगणापेक्षा उंचावर व सभामंडप अर्धमंडपापेक्षा उंच आहे. प्रांगणातून अर्धमंडपात व अर्धमंडपातून सभामंडपात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. अर्धमंडपाला लागून असलेल्या कक्षात देवाचा रथ, प्राचीन मुखवटे, पूजेची भांडी आदी वस्तू आहेत. याच बाजूला पलंग महाल आहे. येथील पलंगावर खंडोबाचे उत्सव काळात वापरले जाणारे चांदीचे मुखवटे आहेत़.
बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी सहा चौकोनी लाकडी स्तंभांच्या चार रांगा आहेत. सर्व स्तंभ पाषाणी स्तंभपादावर उभे आहेत. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीत देवकोष्टके आहेत. द्वारशाखांवर स्तंभनक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वारावर सज्जा व वर दोन किर्तीमुखे आहेत. मंडारकावरही चंद्रशिळा व कीर्तीमुख आहे. गर्भगृहात वज्रपिठावर मखरात पिंडी आहे. त्यावर खंडोबाचा चांदीचा मुखवटा लावला आहे. देवावर छत्र धरलेला पितळी नाग आहे. देवाच्या शेजारी वज्रपिठावर म्हाळसा देवीची मूर्ती आहे. देवाच्या मागे चांदीची प्रभावळ आहे. प्रभावळीमागे देवाच्या शस्त्रधारी अंगरक्षकांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात उजेड व हवा येण्यासाठी गवाक्ष आहेत. असे सांगितले जाते की पूर्वेकडील गवाक्षातून पहाटे येणारी सूर्यकिरणे वर्षातील काही दिवस देवाच्या चरणावर पडतात. गर्भगृहाच्या अष्टकोनी वितानावर मध्यभागी चक्राकार नक्षी आहेत.
गर्भगृहाच्या मागे अधिष्ठानावर चिंतामणी पाषाण आहे. या पाषाणावर हात ठेवून भाविक देवाला कौल लावतात. हात ठेवल्यानंतर चिंतामणी उजव्या बाजूला फिरल्यास मनातील इच्छा पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखराच्या प्रत्येक थरांतील देवकोष्टकांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखरावर अनेक उरूशृंगी शिखरे, मिनार व स्तंभ नक्षी आहेत. शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक व त्यावर कळस आहे.
मंदिरात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी हा खंडोबाचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक रविवारी देवाचा छबीना निघतो. यावेळी मंदिरात महाअभिषेक, भजन, महाप्रसाद, जागरण, गोंधळ, अरादी नृत्य आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दर रविवारी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत येथे महाप्रसाद दिला जातो. मंदिरात चैत्रपाडवा, दसरा, दिवाळी आदी सर्व सण व उत्सव साजरे केले जातात. रविवार, षष्ठी, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते.

उपयुक्त माहिती

  • सोलापूर येथून ५ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून सोलापूरसाठी एसटी व रेल्वेची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ८१८०९४२०८९
Back To Home