नाशिक शहरापासून जवळच असलेल्या देवळाली छावणी परिसरात खंडोबा मंदिर आहे. हे मंदिर जेथे आहे ती टेकडी ‘खंडोबाची टेकडी’ म्हणून ओळखली जाते. मंदिर ५०० वर्षे जुने असून भाविकांसाठी ते मोठे श्रद्धास्थान आहे. येथे आलेल्या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी त्यांची श्रद्धा आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की मल्ल व मणी या दोन दैत्यांनी महादेवाची भक्ती करून त्यांना पृथ्वीवर कोणी मारू शकणार नाही, असा वर प्राप्त करून घेतला होता. त्यानंतर ते उन्मत्त झाले व साधू-संतांना त्रास देऊ लागले. यावेळी सर्व साधू-संतांनी महादेवाकडे या दैत्यांचा वध करण्याची विनंती केली. त्यानुसार महादेवाने खंडोबाचा अवतार घेऊन या दैत्यांचा वध केला. त्यानंतर जेजुरीकडे प्रस्थान करताना खंडोबा या टेकडीवर काही वेळ आराम करण्यासाठी थांबले होते. त्यामुळे या टेकडीस ‘खंडोबाची टेकडी’ असे म्हटले जाते. असेही सांगितले जाते की, सुरतच्या लढाईनंतर रायगडावर जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी एक रात्र मुक्काम केला होता.
हे मंदिर प्राचीन असून ते कोणी बांधले याबाबत माहिती उपलब्ध नाही. गर्द वनराईत शिवलिंगासारखा आकार असलेल्या टेकडीवर हे मंदिर आहे. टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या उद्यानापासून मंदिरात जाण्यासाठी १०० पायऱ्या आहेत. चारही बाजूंनी तटभिंती असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारावर मोठ्या आकारात ‘जय मल्हार’ असे लिहिलेले दिसते. नंदीची मूर्ती व मणी-मल्ल यांची शिल्पे प्रवेशद्वाराजवळ आहेत. मंदिराबाहेर सोनेरी रंगातील दीपमाळ आहे. काळ्या दगडांचा वापर करून या मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. मंदिर परिसरातून देवळालीचा परिसर, लष्करी रस्ते, थर्मल पॉवर स्टेशन दिसते.
सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. गोलाकार असलेल्या या मंदिरात तीन मुख्य मूर्ती आहेत. खंडोबाची मूर्ती ५ फूट, तर म्हाळसा व बाणाई यांच्या मूर्ती ४ फुटांच्या आहेत. अशा मोठ्या मूर्ती इतर खंडोबा मंदिरांत अपवादानेच दिसतात. खंडोबाचा भारदस्तपणा आणि म्हाळसा आणि बाणाईचा नाजूकपणा या मूर्तींमधून जाणवतो.
भगूर येथील आमले परिवार या मंदिराचे ट्रस्टी व पुजारी आहेत. त्यांच्यामार्फत येथे पूजा व अभिषेक केले जातात. चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळी मूर्तीस महाअभिषेक, त्रिकाल महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. पुजारी आमले कुटुंबीयांकडून भगूर येथून वाजत-गाजत झेंडा-काठीसह पालखी मिरवणूक काढण्यात येते. या उत्सवासाठी व खंडोबाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी असते. अनेक भाविक घरातून आणलेल्या टाकांची (देवघरातील पंचकोनी खंडोबाची मूर्ती) येथील देवाशी भेट घडवली जाते.
मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुध्द षष्ठी असा सहा दिवस ‘खंडोबा षड्रात्रोत्सव’ येथे साजरा केला जातो. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ या जयघोषात व भंडाऱ्याची उधळण करत शेकडो भाविक खंडोबाच्या दर्शनाला येतात. यावेळी भाविक तळी भरून देवाची आरती करतात. (तळी भरणे म्हणजे, एका ताटात कुळातील खंडोबा देवाचा टाक, विड्याची पाने, सुपारी, खोबरे, भंडारा आदी वस्तू ताटात घेऊन ‘येळकोट येळकोट…’च्या गजरात विधिवत पूजा करून ते ताट मस्तकाला लावणे.)