खंडोबा महाराजांची द्वितीय पत्नी बाणाई हिचे गाव असलेल्या देवभूमी नाशिकमधील चंदनपुरी गावात हे खंडेराव मंदिर आहे. खंडोबाचे महाराष्ट्रातील मुख्य स्थान जेजुरी हे मानले जाते, तर चंदनपुरीला द्वितीय स्थानाचे महत्त्व आहे. या ठिकाणाला ‘प्रतिजेजुरी’ असेही म्हटले जाते.
या मंदिराबाबत आख्यायिका अशी की बाणाईच्या सौंदर्याला भुलून खंडोबाने चंदनपुरीत ८० वर्षांच्या वृद्ध धनगराचे रूप घेतले आणि बाणाईच्या घरी, धनगरवाड्यावर मेंढपाळ म्हणून १२ वर्षें चाकरी केली. एके दिवशी याच मेंढपाळाने (खंडोबाने) बाणाईकडील नऊ लाख मेंढ्या नदीवरील खडकावर आपटून मारल्या. हे पाहताच बाणाई तडक आई-वडिलांकडे गेली. त्यानंतर बाणाईच्या वडिलांनी खंडोबाला विचारले, ‘तू असे का केलेस?’ त्या वेळी खंडोबाने सांगितले, ‘मी या सगळ्या मेंढ्या जिवंत करून देतो, पण माझे बाणाईसोबत लग्न लावून द्या.’ यावर ‘मेंढ्या पुन्हा जिंवत करून दाखवल्या तरच मी माझी मुलगी तुला देईन’’ असे बाणाईच्या वडिलांनी सांगितले. त्यानंतर खंडोबाने सर्व मेंढ्यांवर भंडारा टाकला असता त्या जिवंत झाल्या. त्यानंतर स्वत: नारदमुनींनी मंगलाष्टके म्हटली. अंतरपाट म्हणून घोंघडे लावण्यात आले, तर अक्षता म्हणून मेढींच्या लेंड्या देवावर टाकण्यात आल्या. या विवाह सोहळ्यासाठी ३३ कोटी देव आले होते. या वेळी मोत्यांचा पाऊस पडला. त्यानंतर खंडेराव बाणाईला जेजुरीला घेऊन गेले.
मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी हे ठिकाण नाशिक-मालेगाव मार्गापासून जवळच आहे. मंदिराबाहेर खंडोबाची दिवटी, प्रसाद, पूजा साहित्याची दुकाने आहेत. खंडेराव मंदिराचे प्रवेशद्वार गडासारखे दिसते. मंदिरास दगडी कोट असून पूर्व व पश्चिम बाजूने दरवाजे आहेत. मंदिराचे पूर्वद्वार प्रमुख आहे. या दरवाजाबाहेर दोन दीपमाळा आहेत. मंदिरासमोरच नंदीमंडप आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराची रचना सभामंडप व गर्भगृह अशी आहे. सभामंडपात प्रवेश करण्यासाठीच्या प्रवेशद्वारावर गणेशपट्टी आहे. मंदिराचे सभागृह घुमटाकार असून तेथे अनेक देवी-देवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात.पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.
मंदिराचे गर्भगृह लहान असून एका वेळी एक ते दोन भाविक आतमध्ये जाऊ शकतात. गर्भगृहात खंडोबा, म्हाळसा, बाणाई यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. या मूर्ती अलीकडे बसविल्याचे सांगतात. पूर्वीच्या मूर्ती काळ्या पाषाणाच्या होत्या. त्या भग्न झाल्याने या नवीन मूर्ती बसविण्यात आल्या. या मूर्तींसमोर शिवलिंग आहे. मंदिरातून बाहेर आल्यानंतर खंडोबाचे वाहन असलेल्या घोड्याचे दर्शन घेता येते. मंदिराबाहेर आग्या वेताळाचे लहान मंदिर आहे.
चैत्र शुद्ध पौर्णिमेला (‘चैत्र शुद्ध पौर्णिमा’ या दिवशीच्या पूजेचे महत्त्व- पूर्वपापांपासून मुक्ती आणि सर्व मनोकामना पूर्ण अशी श्रद्धा) येथे यात्रा भरते. या वेळी भाविक ‘येळकोट, येळकोट जय मल्हार’चा गजर करत खंडाबाचे दर्शन घेतात. येथे भंडारा उधळून नवस फेडला जातो. खंडोबाला बेल आणि दवणा ठेवल्या जातात; भरीत आणि रोड्ग्याचा नैवेद्य दाखवला जातो. कच्च्या पातीचा कांदा खंडोबाला अतिशय आवडत असल्याची समजूत आहे.
चंदनपुरी गावाच्या पश्चिमेस, एका उंचवट्यावर बाणाईचे छोटेसे मंदिर आहे. पौष पौर्णिमेस येथे यात्रा भरते (पौष पौर्णिमा- पौष हा सूर्याचा महिना आहे, तर पौर्णिमा ही चंद्राची तिथी आहे. त्यामुळे या एकाच दिवशी दोघांचीही पूजा शक्य होते. या पूजेने मनातील इच्छा पूर्ण होतात आणि भविष्यातील संकटांचे निवारण होते, असे मानले जात असल्याने हा दिवस पवित्र मानला जातो). नवीन लग्न झालेली जोडपी या ठिकाणी जागरण आणि गोंधळ घालून देवीची पूजा करतात. लग्न, मुंज अशा प्रसंगी परंपरेनुसार मंदिरात जागरण घालण्याची प्रथा आहे.
गिरणा नदीच्या पात्रात खंडोबा महाराजांच्या वास्तव्याच्या खुणा असल्याचे सांगितले जाते. चंदनपुरीतील खंडोबाच्या मंदिरापासून पायी दोन ते तीन मिनिटांच्या अंतरावर, उत्तरेस एक खुंटा आहे. तेथे एक शिवलिंगही आहे. खंडोबा महाराज या खुंट्याला आपला घोडा बांधत असत, अशी समजूत आहे. त्यामुळे आजही नदीतल्या खडकांत दिसणारे ठसे म्हणजे जिवंत स्वरूपातील खंडोबाच्या घोड्याच्या टापा (पायांचे ठसे) असल्याची श्रद्धा आहे.
खंडोबाच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांना सुलभ रीतीने दर्शन घेता यावे म्हणून दर्शन मंडप बांधण्यात आला आहे. प्रत्येक रविवारी येथे खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. खंडोबाची आरती सकाळी ७ वाजता आणि संध्याकाळी ७.३० वाजता होते.