खल्लार बालाजी मंदिर

खल्लार, ता. भातकुली, जि. अमरावती

अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात चंद्रभागा नदीच्या खोऱ्यात खल्लार हे गाव वसले आहे. या गावाच्या केंद्रस्थानी असलेले बालाजी मंदिर वऱ्हाड प्रांतातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. स्थानिक भाविकांमध्ये या देवस्थानाची ओळख विदर्भाचे ‘प्रति-तिरुपती’ अशी आहे. भातकुली परिसराची ऐतिहासिक पाळेमुळे प्राचीन विदर्भाच्या परंपरेशी जोडलेली आहेत. महाभारतातील कथेनुसार श्रीकृष्णाकडून पराभूत झाल्यानंतर विदर्भराज भीष्मकाचा पुत्र आणि रुक्मिणीचा ज्येष्ठ बंधू रुक्मी याने ‘भोजकट’ नावाची नवी नगरी वसवली. प्राचीन भोजकटाची ओळख आजच्या भातकुलीशी केली जाते. वाकाटक राजा प्रवरसेन द्वितीयाच्या अठराव्या राज्यवर्षातील ‘चामक ताम्रपटात’ चर्मांक नावाचे गाव भोजकट-राज्यात असल्याचा उल्लेख येतो. हा ताम्रपट प्रवरपूर येथून निर्गमित करण्यात आला होता. अमरावती जिल्ह्याच्या जुन्या ‘गॅझेटिअर’मध्ये या ताम्रपटाचा आणि भोजकटाच्या ओळखीचा संदर्भ आढळतो.

वैष्णव परंपरेत बालाजी किंवा व्यंकटेश हे भगवान विष्णूचे कलियुगातील रूप मानले जाते. ‘व्यंकटाचल माहात्म्य’ आणि विविध पुराणांमध्ये याच्या आख्यायिका आढळतात. महर्षी भृगू यांनी त्रिदेवांची परीक्षा घेताना वैकुंठात भगवान विष्णूंच्या वक्षस्थळावर पादाघात केला. विष्णूंनी क्रोध न करता ऋषींचा आदर केला. या घटनेमुळे दुखावलेल्या देवी महालक्ष्मीने वैकुंठ सोडले. तिच्या शोधात पृथ्वीवर आलेले भगवान विष्णू वेंकटाद्री-शेषाचल पर्वतावर श्रीनिवासरूपात वास करू लागले. खल्लार येथील मंदिराच्या स्थापनेबाबत एक मौखिक परंपरा सांगितली जाते. पेशवेकाळाच्या सुमारास गावात बालाजीचा एक भाविक राहत होता. गरिबी आणि शारीरिक दुर्बलतेमुळे त्याला तिरुमलाची यात्रा करणे शक्य होत नव्हते. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवाने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला. देवाने गावातील एका पुरातन विहिरीतून मूर्ती बाहेर काढण्याची आज्ञा केली. त्यानुसार ग्रामस्थांनी शोध घेतला असता त्या विहिरीत काळ्या पाषाणातील मूर्ती सापडली. तिरुपतीला जाणे शक्य नसणाऱ्या भाविकांना गावातच देवदर्शनाचा लाभ व्हावा या भावनेतून ग्रामस्थांनी त्या मूर्तीची विधिपूर्वक प्रतिष्ठापना केली.

या मंदिराची स्थापना अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात इ.स. १७७० ते १७९० या काळात झाली असावी. हा नेमका कालखंड निश्चित करणारा दिनांकित शिलालेख किंवा अन्य अभिलेख आढळत नाही. त्या काळात वऱ्हाडावर निजामाचे नाममात्र सार्वभौमत्व होते. नागपूरकर भोसल्यांचा महसुली आणि लष्करी प्रभाव मोठा होता. या व्यापक मराठा सांस्कृतिक प्रभावाच्या काळात वऱ्हाडातील अनेक गावांमध्ये देवस्थानांची उभारणी आणि विस्तार झाला. मंदिराच्या वास्तुरचनेत त्या काळातील मराठा स्थापत्यपरंपरेचा प्रभाव जाणवतो. गावातील मुख्य चौकात असलेल्या या मंदिराभोवती तटबंदी आहे. प्रांगणात प्रवेश करण्यासाठी मुख्य महाद्वार आहे. प्रांगणात एक जुना औदुंबर वृक्ष आहे. तटबंदीच्या एका बाजूला मारुतीचे स्वतंत्र पूर्वाभिमुख देवालय आहे. मंदिराच्या दर्शनी भागात भक्कम दगडी चौथरा बांधलेला आहे. या चौथऱ्यावर उंच पितळी ध्वजस्तंभ उभारलेला आहे. या स्तंभावर धर्मध्वज फडकतो. ध्वजस्तंभासमोरील छोट्या देवळीत भगवान विष्णूंचे वाहन असलेल्या गरुडाची हात जोडलेल्या स्थितीतील मूर्ती आहे.

मंदिराच्या वास्तुरचनेत काष्ठशिल्प आणि पारंपरिक पाषाणरचनेचा संगम दिसतो. मंदिराचा सभामंडप सागवानी नक्षीदार खांबांवर आधारलेला आहे. या स्तंभांवर आधारलेल्या महिरपी लाकडी कमानी, स्तंभांवरील कणी, भारवाहक हस्त तसेच छताच्या आडव्या-उभ्या लाकडी तुळया मूळ स्वरूपात जतन केलेल्या दिसतात. तिरुमलातील दान-हुंडीच्या प्रथेची आठवण करून देणारी लाकूड आणि धातूपासून तयार केलेली मोठी हुंडी सभामंडपात टांगलेली आहे. सभामंडपाच्या भिंतींवर दशावतारातील विविध प्रसंग आणि पौराणिक चित्रे रेखाटलेली आहेत. मंडपातून पुढे आल्यावर अंतराळाचा भाग लागतो. त्याच्या डाव्या बाजूला बालाजीची एक लहान उत्सवमूर्ती आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार लाकडी आणि दगडी कोरीव कामाने सजवलेले आहे. उंबरठ्यापाशी अर्धगोलाकार चंद्रशिळा कोरलेली आहे. द्वारशाखेवर नक्षीदार स्तंभशाखांची कलाकुसर आणि ललाटबिंबावर गणेशाची प्रतिमा आहे. गर्भगृहातील दोन्ही बाजूंच्या भिंतींवरील देवकोष्टकांमध्ये देवी पद्मावती, गणपती आणि अंबाबाई यांच्या मूर्ती आहेत.

गर्भगृहाच्या मुख्य भिंतीलगत आडव्या रांगेत तीन स्वतंत्र लाकडी मखरे उभारलेली आहेत. मधल्या मुख्य मखरात श्री व्यंकटेश बालाजीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती आहे. मूर्तीच्या वरच्या दोन हातांत शंख आणि चक्र आहेत. मूर्तीचा खालचा उजवा हात वरद मुद्रेत आणि डावा हात कट्यवलंबित मुद्रेत आहे. डाव्या बाजूच्या मखरात भगवान नृसिंहांची मूर्ती आहे. उजव्या बाजूच्या मखरात कोदंडधारी प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या छतावर चौकोनी आकाराचे बहुमजली शिखर आहे. त्याच्या चारही बाजूंना देवकोष्टके आणि त्यांवर उपशिखरे आहेत. शिखराच्या चारही कोपऱ्यांवर बैठ्या सिंहांची शिल्पे आहेत.

मंदिराच्या प्रचलित वेळापत्रकानुसार दररोज सकाळी ६ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येते. सकाळी ७ वाजता मंगल महाआरती आणि दुपारी १२ वाजता महानैवेद्य दाखवला जातो. सायंकाळी ७ वाजता संध्या आरती आणि रात्री ९ वाजता शयन आरती होते. नित्यपूजेत देवाला तुळशीपत्र, तुळशीच्या मंजिऱ्या आणि चंदनाची उटी अर्पण करण्याची पद्धत आहे. भाविक नवसपूर्तीसाठी येथे येऊन नारळ आणि तुळशीच्या माळा अर्पण करतात. खल्लार येथे वर्षभरातील अनेक उत्सव साजरे होतात. आश्विन महिन्यात तिरुमलाच्या उत्सवपरंपरेशी साधर्म्य असलेला नऊ दिवसांचा नवरात्र-ब्रह्मोत्सव साजरा केला जातो. त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला वार्षिक रथोत्सव भरतो. या दिवशी देवाची उत्सवमूर्ती लाकडी-पितळी रथात आरूढ करून खल्लार गावातून पारंपरिक मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत स्थानिक वारकरी, टाळकरी, भजनी मंडळे आणि लेझीम पथके सहभागी होतात. त्रिपुरारी पौर्णिमा, वैकुंठ एकादशी तसेच आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अमरावती, अचलपूर, भातकुली, दर्यापूर आणि मूर्तिजापूर परिसरांतून पायी दिंड्या मंदिरात दाखल होतात. उत्सवकाळात मंदिरात अखंड हरिकीर्तन, काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाचे वाटप केले जाते.

उपयुक्त माहिती

  • टाकळी रेल्वे स्थानकापासून ६ किमी अंतरावर
  • अमरावती शहरापासून २१ किमी अंतरावर
  • भातकुली (१४ किमी) येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासासाठी श्री क्षेत्र बालाजी संस्थानचे भक्तनिवास उपलब्ध
  • संपर्क : चेतन चव्हाण ९०४९३८७१२४, विजय अनासाने ९८२३२४९८६५
Back To Home