हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. यापैकी सृष्टीचे पालनकर्ते असलेल्या भगवान विष्णूचे केशव हे एक लोकप्रिय रूप आहे. ‘सुंदर केस असलेला देव’ अशी मान्यता असलेल्या या केशवराजाचे एक अत्यंत प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर लातूर शहरातील राम गल्ली येथे वसलेले आहे. भाविकांच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक व्याधी दूर करणारा हा एक जागृत देव असल्याची भाविकांची नितांत श्रद्धा आहे. या मंदिराच्या गर्भगृहातील केशवराजाची मूर्ती हजार वर्षांहून अधिक प्राचीन असल्याचे मानले जाते.
मराठवाड्यातील वैष्णव परंपरेची साक्ष देणाऱ्या या मंदिराची उभारणी बाराव्या शतकात म्हणजेच यादव काळात झाली होती. तत्कालीन हेमाडपंती स्थापत्यशैलीचा प्रभाव असलेल्या या वास्तूचे १९९३ च्या विनाशकारी किल्लारी भूकंपाने मोठे नुकसान झाले होते. मात्र, स्थानिकांनी आणि भक्तांनी एकत्र येत लोकवर्गणीतून या मंदिराचा जीर्णोद्धार केला. विशेष म्हणजे, हे नूतनीकरण करताना जुन्या मंदिराचे दगड व साहित्य वापरून मूळ वास्तूचे ऐतिहासिक सौंदर्य जपण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला.
या मंदिरासंदर्भात आख्यायिका अशी की बाराव्या शतकात या भागात घनदाट जंगल असताना, येथे गुरे चारणाऱ्या एका मेंढपाळाला जमिनीतून एका मूर्तीचे टोक बाहेर आलेले दिसले.
/उत्सुकतेने केलेल्या खोदकामात तिथे विष्णूच्या दहा अवतारांचे कोरीव काम असलेली एक सुबक मूर्ती सापडली. पुढे याच ठिकाणी पूजा-अर्चा सुरू झाली आणि वैष्णवपंथीय यादव राजांच्या आश्रयाने येथे मंदिर उभे राहिले. हेच मंदिर आज लातूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहे.
लातूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या राम गल्ली परिसरात हे मंदिर आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हनुमानाचे लहान मंदिर आहे. या मंदिराच्या मागील बाजूस सिद्धराज महर्षी गृत्समद ऋषींचे समाधी मंदिर आहे. वैदिक काळातील एक प्रमुख ऋषी म्हणून त्यांची ओळख आहे. ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडळातील अनेक सूक्तांचे द्रष्टेपण त्यांच्याकडे असल्याचे मानले जाते. ते अंगिरस वंशातील शुनहोत्र आंगिरस यांचे पुत्र होते; पण ते भृगु वंशात म्हणजेच भार्गव वंशात दत्तक घेतले गेले. त्यामुळे ते शौनक भृगु यांचे पुत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या गृत्समद या नावाचा अर्थ ‘समाधीमध्ये आनंदित’ असा सांगितला जातो.
मुख्य मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या अर्धखुल्या स्वरूपाच्या मंडपात प्रवेश होतो. या मंडपाच्या डावीकडे ओवऱ्या व उजवीकडे सभागृहासारखी रचना आहे. मंडपात मध्यभागी चौथऱ्यावर गरुड मूर्ती आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या खुल्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना कक्षासनासारखे दगडी चौथरे आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी चार दगडी स्तंभ आहेत. पूर्वी या खांबांच्या मध्यभागी रंगशिळा असावी, अशी येथील रचना भासते. सभामंडपाच्या भिंतींमध्ये असलेल्या देवकोष्टकांत शिवशंकर, गणपती, ब्रह्मदेव आणि हनुमानाच्या मूर्ती आहेत. याशिवाय येथे काही प्राचीन मूर्तीही आहेत. गर्भगृहाच्या उजव्या बाजूच्या देवकोष्टकात द्वारपालांची शिल्पे आहेत.
गर्भगृहात वज्रपीठावर चांदीच्या प्रभावळीत विष्णूची काळ्या पाषाणात घडवलेली मूर्ती स्थापित आहे. सुमारे चार फूट उंचीच्या या मूर्तीभोवती असलेल्या प्रभावळीत मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की अशा दहा अवतारांचे चित्रण आहे. चतुर्भुज विष्णूमूर्तीच्या चार हातांत शंख, चक्र, गदा आणि कमळ आहेत. मूर्तीच्या सान्निध्यात लक्ष्मी, बृहस्पती आणि नारद मुनींच्या प्रतिमा आहेत.
मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाच्या बाजूला सभागृहासारखी रचना आहे. मंदिरातील उत्सवांच्या वेळी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या दगडी भिंतीवर लहान लहान मूर्ती आहेत. मंदिराच्या परिसरात निजानंद सरस्वती महाराजांची समाधी, रामचंद्र महाराज पारनेरकर यांचे जीवनकलामंदिर आणि सप्तमातृकांचे शिल्पही पाहायला मिळते.
लातूरच्या या ग्रामदैवताच्या दर्शनासाठी दर मंगळवारी, शुक्रवारी आणि एकादशीला भक्तांची गर्दी असते. विशेषतः कार्तिकी एकादशीनंतर येणाऱ्या वैकुंठ चतुर्दशीला इथे दीपोत्सव होतो आणि हरिहराच्या (विष्णू आणि शिव) भेटीचा सोहळा रंगतो. दिवाळी, तुळशी विवाह यांसारखे सण इथे मोठ्या उत्साहात साजरे होतात. मोठ्या उत्सवांनंतर देवाचा शिणवटा दूर करण्यासाठी प्रक्षालपूजा म्हणजेच महाभिषेक करून महाप्रसाद वाटला जातो. भाविकांसाठी हे मंदिर सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत दर्शनासाठी खुले असते.