केदारेश्वर मंदिर

प्रकाशा, ता. शहादा, जि. नंदुरबार

नंदुरबार या आदिवासी बहुल जिल्ह्यातील शहादा तालुक्यात गोमती तापी नदीच्या संगमावर वसलेले प्रकाशा हे प्राचीन प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. सन १९५० साली या ठिकाणी केलेल्या उत्खननात ताम्रपाषाणयुगीन अवशेष सापडले असल्याने या गावाचा इतिहास थेट ४५०० वर्षापर्यंत मागे जातो. दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी केदारेश्वर, संगमेश्वर, गौतमेश्वर, पुष्पदंतेश्वर आणि मनसापुरी देवी ही हेमाडपंती स्थापत्यशैलीतील मंदिरे विशेष प्रसिद्ध आहेत. येथे बारा वर्षातून एकदा सिंहस्थात भरणारी यात्राही प्रसिद्ध आहे

तापी महात्म्यमधील नवव्या अध्यायात प्रकाशासंदर्भात माहिती आहे ती अशीश्रीरुद्र उवाचं, प्रकाशकमिदं तीर्थ सर्वपापप्रणाशनम्। प्रकाशत्वं गता यत्र पयोष्यांतर्गता सरित॥ सर्व देवमिदं क्षेत्र दुर्लभं वत्स भूतले। अशेषं पाप दहनं विशेषाद्योत्तरायणे। याचाच अर्थ असामहादेवाने सांगितले की प्रकाशा हे तीर्थक्षेत्र सर्व पापांचे नाश करणारे आहे. लुप्त झालेली पयोष्णी नदी प्रकाशाला प्रकट झालेली आहे. हे वत्स, पृथ्वीवर असे क्षेत्र प्राप्त होणे हे खूपच दुर्लभ आहे. विशेषतः उत्तरायणात या क्षेत्री केलेल्या तापोस्नानाने सर्व पापांचा नाश होतो

या गावाला असलेल्या प्रकाशा या नावाबाबत अख्यायिका अशी की प्राचीन काळी पृथ्वीवर सहा महिने रात्र सहा महिने दिवस असे. तेव्हा महादेवाच्या कायम वास्तव्यासाठी १०८ शिवलिंगे असलेली मंदिरे एका रात्रीत बांधण्याचे काम प्रकाशा येथे सुरू करण्यात आले. मात्र १०७ शिवलिंगे स्थापन होईपर्यंत पहाटेचा प्रकाश पडला आणि या मंदिराचे काम अपूर्ण राहिले. त्यामुळे या गावाला प्रकाशा हे नाव या तीर्थास दक्षिण काशी म्हणून संबोधले जाऊ लागले. अशी मान्यता आहे की काशीची यात्रा करणाऱ्या भाविकांना प्रकाशा येथे दर्शन घेतल्याशिवाय तीर्थाटनाचे पुण्य मिळत नाही.

नदीतीराजवळ असलेल्या या मंदिराच्या तटभिंतीपर्यंत पक्का रस्ता आहे. मंदिरापासून काही अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा दोन चौकोनी स्तंभ, त्यावरील सज्जावर तीन मेघडंबरी आणि त्यात देवप्रतिमा असलेली स्वागत कमान आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर रस्त्याच्या दुतर्फा पूजा साहित्यांची अनेक दुकाने आहेत. मंदिराभोवती असलेल्या तटभिंतीतील प्रवेशद्वारातून प्रांगणात प्रवेश होतो. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस तटबंदीत चौकोनी स्तंभ त्यावरील तुळईवर छत असलेले कक्ष आहेत. या कक्षांचा वापर धर्मशाळा म्हणून केला जातो. कक्षातील सर्व स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत.

प्रांगणात मंदिरासमोर एका मोठ्या चौथऱ्यावर तीन थरांची गोलाकार प्राचीन दीपमाळ आहे. या चौथऱ्यावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस स्टेनलेस स्टीलचा सुरक्षा कठडा आहे. या दीपमाळेतून आत जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला स्तंभ वर कमान आहे. दीपमाळेच्या वर जाण्यासाठी गोलाकार जीना आहे. दीपमाळेच्या वर एकावेळी तीन ते चार माणसे बसू शकतील, अशी जागा आहे. या दीपमाळेवरून प्रकाशा आजूबाजूच्या अनेक गावांचे विहंगम दृश्य दिसते. दीपमाळेच्या बाह्य बाजूस दीप प्रज्वलनासाठी स्वतंत्र हस्त आहेत.

पेव्हर ब्लॉकची फरसबंदी असलेल्या प्रांगणातून दुमजली मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पायरी मार्गाच्या डाव्या बाजूला श्रीदत्तात्रेय मंदिर आहे. मंदिरात मागील भिंतीतील देवकोष्टकात दत्तात्रयांची मूर्ती आहे. येथून सुमारे १५ पायऱ्या चढून आल्यावर पायरीमार्गाच्या उजव्या बाजूला एका चौथऱ्यावर पाच शिवपिंडी त्यांच्यासमोर पाच नंदी आहेत. त्यापुढे उजवीकडे मारूतीचे लहानसे मंदिर आहे. या मंदिरात मारूतीची हात जोडलेली उभी मूर्ती आहे. येथून आणखी सुमारे १५ पायऱ्या चढून मंदिराच्या दर्शनमंडपात प्रवेश होतो. दर्शनमंडपात भाविकांना बसण्यासाठी आसनांची व्यवस्था आहे. पुढे मंदिराचा सभामंडप आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी पाच चौकोनी स्तंभांच्या आठ रांगा आहेत. स्तंभांना खाली स्तंभपाद, शीर्षभागी कणी त्यावर चंद्रकोर आकारातील हस्त आहेत. सर्व स्तंभ अर्धचंद्राकार कमानीने एकमेकांना जोडलेले आहेत. सभामंडपातील काही स्तंभदंडावर उठाव शैलीतील विविध शिल्पे कोरलेली आहेत

येथे केदारेश्वर काशी विश्वेश्वर अशी दोन जोडमंदिरे असल्याने दोन्ही मंदिराचे सभामंडप एकत्र जोडलेले आहेत. या सभामंडपांच्या डाव्या बाजूला बंदिस्त कक्ष आहे त्यात वातायने आहेत. या बंदिस्त कक्षात वज्रपिठावरील मखरात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. सभामंडपात केदारेश्वर मंदिराच्या गर्भगृहासमोर एक काशी विश्वेश्वर मंदिराच्या गर्भगृहासमोर एक अशा दोन नंदी मूर्ती आहेत. केदारेश्वर मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या तिन्ही द्वारशाखांवर कमळ फुलांची नक्षी ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा त्यावर कमळ फुलांची पितळी नक्षी आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीतील देवकोष्टकात तापी नदीची देवी रूपातील मूर्ती आहे. गर्भगृहात मध्यभागी जमिनीवर शिवपिंडी आहे. या पिंडीच्या शाळुंकेतील लिंगपाषाण जमिनीत खाली आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पाच फणी पितळी नाग शिवपिंडीवर जलधारा धरलेले चांदीचे अभिषेकपात्र आहे

केदारेश्वर गर्भगृहाला लागून उजव्या बाजूला काशी विश्वेश्वराचे गर्भगृह आहे. येथील प्रवेशद्वाराच्या तिन्ही द्वारशाखांवर पानफुलांच्या नक्षी ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वारावरील नक्षीदार तोरणाला दोन्ही बाजूस दगडी झुंबर आहेत. तोरणाच्या वरील बाजूस मध्यभागी शिवपिंडी दोन्ही बाजूस शिवपिंडीची पुजा करणारे दोन गजराज, असे उठावशैलीत शिल्प आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दीपकोष्टके आहेत. उजव्या बाजूला गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीतील देवकोष्टकात गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहाचे गोलाकार वितान पानफुलांच्या नक्षीने सुशोभित आहे. गर्भगृहातील मागील भिंतीतील देवकोष्टकात काशी विश्वेश्वर महादेवाचा पितळी मुखवटा आहे

दोन्ही मंदिरांच्या गर्भगृहाच्या छतावर घुमटाकार शिखर त्यावर कळस आहेत. दोन्ही मुख्य शिखरांच्या चारही बाजूंनी प्रत्येकी चार षटकोनी लघूशिखरे त्यावर कळस आहेत. मंदिरासमोर काही अंतरावर तापी नदीच्या तीरावर प्रशस्त घाट आहे. तेथून नदीपात्रात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. येथे विविध शांती श्राद्ध विधी होतात

या मंदिरात बारा वर्षातून एकदा तीन दिवसांचा सिंहस्थ जत्रोत्सव साजरा केला जातो. यावेळी देशभरातून हजारो भाविक तीर्थस्नान देवाच्या दर्शनासाठी येतात. काशी यात्रा करणारे भाविक आपल्या तीर्थाटनाची सांगता करण्यासाठी प्रकाशा येथे येत असतात. श्राद्ध विविध जनन शांती विधी करण्यासाठी भाविकांची येथे कायम गर्दी असते. श्रावणी सोमवार महाशिवरात्रीस विशेष उत्सव साजरे केले जातात

उपयुक्त माहिती

  • शहादा येथून १५ किमी, तर नंदूरबारपासून २१ किमी अंतरावर
  • शहादा, नंदूरबार येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
Back To Home