काशीलिंग मंदिर

जेऊर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर

काशीविश्वेश्वराचे दर्शन घेण्याची अनेकांची इच्छा असली, तरी प्रत्येकालाच तिथे जाता येते असे नाही; मात्र ती इच्छा दक्षिण काशी अशी ओळख प्राप्त झालेल्या जेऊरच्या काशीलिंग मंदिरात जाऊन पूर्ण करता येऊ शकते. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील अनेक तीर्थस्थळांपैकी हे एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण तीर्थक्षेत्र मानले जाते. असे सांगण्यात येते की प्राचीन काळी या ठिकाणी भूगर्भातून पाणी (गंगाजल) वर आले. तेच पाणी येथील स्वयंभू शिवलिंगाभोवती आजही कायम असते. ते कधीच कमी किंवा जास्त होत नाही.
काशीलिंग हे जेऊरचे ग्रामदैवत आहे. हे मंदिर सुमारे चारशे वर्षे जुने असल्याचे सांगण्यात येते. या मंदिराची आख्यायिका अशी की प्राचीन काळी एक साधू महाराज नित्यनेमाने काशीयात्रा करून वाराणसीस्थीत काशीविश्वेश्वराचे दर्शन आणि गंगास्नान करीत असत. एकदा गंगा नदीत पवित्रस्नान करीत असताना त्यांच्या हातातील कडे नदीच्या पाण्यात हरविले. त्या साधू महाराजांनी पाण्यात कड्याचा शोध घेतला, परंतु ते त्यांना सापडले नाही. निराश होऊन साधू महाराज गंगा नदीच्या किनाऱ्यावर आले व तेथे साधना करू लागले. त्याचवेळी त्यांना दृष्टांत झाला की दक्षिणेकडे प्रवास केल्यावर तुला एका अद्भुत लिंगाचे दर्शन घडेल. त्या लिंगाभोवती पाण्याचे वलय असेल. त्या पाण्यात तुला तुझे हरवलेले कडे सापडेल. त्या लिंगाभोवती असलेले पाणी प्रत्यक्ष गंगेचेच आहे.
दृष्टांताप्रमाणे साधू महाराज काशीविश्वराचे दर्शन घेऊन दक्षिणेकडे प्रवासाला निघाले. काही दिवसांनी ते जेऊर गावात पोहोचले व येथील धनगरवाड्यातील एका झाडाखाली विश्रांती घेत असताना एका वेगळ्याच आवाजाने त्यांना जाग आली. त्या ठिकाणी त्यांना वाळू, शंख, शिंपले आणि दुधासारखे पाणी दिसून आले. त्यांना येथे एक अद्भुत शिवलिंगही दिसले. त्याभोवती असलेल्या पाण्यात हात फिरवून ते तीर्थप्राशन करू लागले. तेव्हा काशीत गंगेच्या पाण्यात हरवलेले कडे त्यांच्या हातात आले. त्या साधूने या शिवलिंगाबाबतची माहिती सर्वांना सांगितली. त्यानंतर हे तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला आले. दक्षिण काशी असा नावलौकिक त्याला प्राप्त झाला. नंतर त्याच साधू महाराजांनी काशिलिंगाचे मंदिर बांधले.
अक्कलकोट तालुक्यातील जेऊर गावाच्या वेशीवर काशीलिंगाचे हे जागृत स्थान आहे. प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर दोन उंच चौथऱ्यांवर दोन दीपमाळा आहेत. प्रांगणात एक ६० फूट खोलीची दगडी विहीर आहे. तिला पायऱ्या असल्याने खालपर्यंत उतरून जाता येते. असे सांगितले जाते की या विहिरीच्या आतही शिवपिंडी आहे. मंदिराच्या परिसरात एक अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळाचे झाड आहे. याशिवाय प्रांगणात मध्यभागी मंदिरासमोर एका चौथऱ्यावर दोन पाषाणी नंदीमूर्ती आहेत.
उंच अधिष्ठानावर असलेल्या या मंदिराची सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी संरचना आहे. प्रांगणातून पाच पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. या सभामंडपाच्या दर्शनी भागात सहा स्तंभ आहेत. त्यापैकी दोन स्तंभ भिंतीत आहेत. येथून मंदिराच्या अंतराळात प्रवेश होतो. अंतराळात काही प्राचीन पिंडी व मूर्ती आहेत. अंतराळाच्या पुढे प्रदक्षिणामार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. गर्भगृहात गोलाकार शिवपिंडीच्या मध्यभागी खळगा आहे व त्यामध्ये शिवलिंग आहे. या लिंगाभोवती कायम पाणी असते. असे सांगितले जाते की या स्वयंभू शिवलिंगाभोवती शंख, शिंपले, वाळू आणि पाणी असते. या पाण्यास विशिष्ट प्रकारचा उग्र गंध येतो. हे गंगाजल असल्याच्या श्रद्धेने भाविक त्याचे प्राशन करतात. या लिंगाभोवती असलेली पाण्याची पातळी उन्हाळा असो वा पावसाळा कधीही कमी जास्त होत नाही.
याबाबत एक अख्यायिका अशी की एका कुंभाराने शिवलिंगाभोवतीच्या पाण्याची खोली पाहण्याचा प्रयत्न केला. त्याला पाण्याची खोली तर समजलीच नाही, उलट तो कुंभार तेथेच मूर्ती होऊन बसला. त्यामुळे जेऊर गावात कुंभार समाजाची एकही व्यक्ती राहत नाही. या पिंडीच्या समोरील भिंतीवरील देवकोष्टकात काशीलिंगाचा सुंदर धातुचा मुखवटा आहे. असे सांगितले जाते की या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला एक चौरस फूट आकाराची छोटी खिडकी आहे. या खिडकीतून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच पाडव्याच्या दिवशी सूर्याची किरणे गर्भगृहापर्यंत येतात. मंदिरावर दाक्षिणात्य पद्धतीचे शिखर व त्यावर सुवर्ण कळस आहे. २००६ साली काशीपिठाचे जगद्गुरू चंद्रशेखर शिवाचार्य यांच्या हस्ते येथील सुवर्णकळसारोहण संपन्न झाले.
श्रावण संपल्यावर येणाऱ्या पहिल्या सोमवारी काशीलिंगाची गावातून वाजतगाजत पालखी निघते. कार्तिक शुध्द प्रतिपदा (दिवाळी पाडवा) ते कार्तिक शुध्द पंचमी (पांडव पंचमी) हे पाच दिवस येथे यात्रा भरते. या काळात पाच दिवस लहान रथाची (उचई) येथे मिरवणूक काढली जाते. कार्तिक शुद्ध पंचमी (पांडव पंचमी) या दिवशी रात्री काशीलिंगाची रथयात्रा पार पडते. या रथयात्रेत मानाच्या नंदीध्वज काठ्यांची मिरवणूक होते. यावेळी भरविण्यात येणाऱ्या जेऊर महोत्सवात विविध धार्मिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम होतात. श्रावण महिन्यात दर सोमवारी आणि अमावास्येलाही भाविकांची या मंदिरात गर्दी होते. श्रावणात भजन, किर्तन, प्रवचनांसारखे कार्यक्रम आणि पालखी सोहळाही आयोजित केला जातो.

उपयुक्त माहिती

  • अक्कलकोटपासून १२ किमी, तर सोलापूरपासून ३७ किमी अंतरावर
  • अक्कलकोट येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home