कसबा गणपती मंदिर

कसबा पेठ, शनिवार वाड्याजवळ, पुणे

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्याला ‘गणपतीचे शहर’ असे संबोधले जाते. मानाच्या पाच गणपतींसह दगडूशेठ, मंडई, बाबूगेनू असे नवसाला पावणारे गणपती येथे आहेत. याशिवाय गणपतीची अनेक प्राचीन मंदिरे आहेत. गणेशोत्सवाच्या काळात दर्शनासाठी विविध शहरांतून भाविक येथे येत असतात.

पुण्यातील मानाच्या पाच गणपतींपैकी ‘कसबा गणपती’ला प्रथम मान आहे. येथूनच मानाच्या गणपतींच्या दर्शनाला सुरुवात होते. (मानाच्या गणपतींमध्ये कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरी वाडा गणपती यांचा समावेश आहे.) शहराचे ग्रामदैवत म्हणून कसबा गणपतीची ओळख आहे. शहराच्या मध्यवस्तीत प्रसिद्ध शनिवार वाड्याजवळील कसबा पेठेत हे मंदिर आहे. येथूनच पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीलाही प्रारंभ होतो.

कसबा गणपती मंदिर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून प्रसिद्ध आहे. याच मंदिराच्या सानिध्यात शिवाजी महाराजांचे बालपण गेले. शहाजी राजांनी लालमहालाची उभारणी केल्यानंतर जिजाबाईंनी या मूर्तीची स्थापना करून दगडी गाभारा व सभामंडप बांधला होता. स्वप्नदृष्टांतानुसार जिजाबाईंना ही मूर्ती सापडली होती. शिवाजी महाराजांचे पुण्यात वास्तव्य असताना मोहिमेवर जाण्याआधी आवर्जून ते या गणेशाचे दर्शन घेत असत, म्हणूनच याला ‘जयती गणपती’ असेही संबोधले जाते. कसबा गणपतीचे सध्याचे मंदिर पेशवेकालीन आहे. या दुमजली वास्तूत मराठा शैलीतील वास्तुकला व स्थापत्यशैलीच्या खुणा दिसतात. बांधकामात अनेक ठिकाणी सागवानी लाकडाचा वापर झाला आहे. मंदिराच्या भिंती अष्टविनायकांच्या छायाचित्रांनी सुशोभित आहेत. गाभाऱ्यातील गणेशमूर्ती साडेतीन फूट उंचीची तांदळा स्वरूपाची आहे. (तांदळा म्हणजे हात-पाय व इतर अवयव नसणारी मुखवटावजा मूर्ती.) शहरात अशा प्रकारच्या मूर्तीचे हे एकमेव मंदिर आहे. या मूर्तीच्या डोळ्यात हिरे आणि नाभीमध्ये माणिक असल्याचे सांगितले जाते.

मंदिरात साजरा होणारा महत्त्वाचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १८९३ मध्ये सुरुवात झाली. चांदीच्या पालखीत गणेशमूर्ती ठेवून मिरवणुकीने प्रतिष्ठापनेसाठी आणली जाते. गणेश चतुर्थीला मूर्तीची स्थापना करून अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते. या गणपतीपासूनच पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो. पारंपरिक वेशभूषेत खांद्यावर पालखी घेऊन ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक निघते. शहरातील मानाच्या पाचही गणपतींपैकी सर्वांत आधी कसबा गणपती मूर्तीचे विसर्जन होते, त्यानंतरच इतर चार गणपती मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन होते. १२५ वर्षांहून अधिक काळापासून ही परंपरा सुरू आहे.

पुणे शहरात आजही घरात होणाऱ्या मंगलकार्याची पहिली पत्रिका कसबा गणपतीसमोर ठेवण्याची पद्धत आहे. लग्न विधी पार पडल्यानंतर नवदाम्पत्य येथे दर्शनासाठी आवर्जून येतात. मंदिर समितीतर्फे अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. यामध्ये नेत्रतपासणी, रक्तदान शिबिरे, महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चासत्र यांचा समावेश आहे. याशिवाय आर्थिकदृष्ट्या वंचित मुलांना शैक्षणिक योजनेअंतर्गत शालेय शुल्क, पाठ्यपुस्तके यासाठी आर्थिक मदत केली जाते. महिला सक्षमीकरणासाठीही समितीकडून अनेक उपक्रम योजिले जातात.

उपयुक्त माहिती:

  • मानाच्या पाच गणपतींपैकी अग्रस्थानी
  • मध्यवस्तीत असल्यामुळे येथे पोचण्यासाठी अनेक पर्याय
  • पुणे रेल्वेस्थानकापासून २.५ किमी अंतरावर
  • स्वारगेट बस स्थानकापासून ४.५ किमी अंतरावर
Back To Home