कपिलेश्वर मंदिर

कंडारी, ता. भुसावळ, जि. जळगाव

प्राचीन काळी कर्दमनगरी वा करदनी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कंडारी या गावामध्ये कपिलेश्वर महादेवाचे मंदिर स्थित आहे. असे सांगितले जाते की येथील महादेवाचे स्थान अतिप्राचीन आहे. स्वतः कपिलमुनी या स्थानी महादेवाच्या दर्शनासाठी येत असत त्यांच्या नावावरून या महादेवास कपिलेश्वर असे संबोधन प्राप्त झाले. खान्देशात तापी नदी पश्चिमवाहिनी असली, तरी मंदिरासमोर नदीचा प्रवाह उत्तरेकडून दक्षिणेस वाहतो. भाविकांची अशी श्रद्धा आहे की विशिष्ट पुण्यकाळात तापीमाता या धारेच्या मार्गाने महादेवाच्या सेवेसाठी येथे येत असते.

कपिलम्हणजेअग्‍नीसारखा लाल तेजस्वी वर्ण असलेला. ‌भगवद्‌गीतेच्या दहाव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने आपणसर्व सिद्धांमधील कपिल मुनी तो मीचअसे म्हटले आहे. हिंदू धर्मशास्त्रातील सांख्य दर्शनाचे ते मूळ प्रणेते होत. जडकारणवादी म्हणून वेदविरोधी असे हे दर्शन रचणाऱ्या कपिल मुनींचा सर्वप्रथम उल्लेख श्वेताश्वतर उपनिषदात (५⋅२) आलेला आहे. विविध ज्ञानाच्या योगाने ईश्वर कपिल ऋषीचे पोषण करतो, असे तेथे म्हटले आहे. भागवत पुराणात विष्णूचे २४ अवतार सांगितले आहेत. कर्दम ऋषींपासून देवहूतीच्या पोटी जन्मलेले कपिल महामुनी विष्णूचा अवतार असल्याचे त्यात म्हटले आहे. कपिल मुनींनी देवहुतीला सांख्यदर्शनाचा उपदेश केला होता. कंडारी येथील मंदिराच्या आख्यायिकेनुसार, या मंदिरात त्यांनी आपल्या मातेला हा उपदेश केला होता.

तापी नदीच्या काठावर स्थित असलेल्या या मंदिराच्या प्रांगणात महंत बालयोगी पुरणदासजी उदासीन महाराज यांचा आश्रमही आहे. मंदिर मार्गावर हा उल्लेख असलेली वेस उभारण्यात आलेली आहे. येथून पुढे काही अंतरावर पायऱ्या चढून मंदिर प्रांगणात प्रवेश होतो. येथील सध्याचे कपिलेश्वराचे मंदिर हे बाराव्या शतकात उभारण्यात आल्याचे सांगण्यात येते. हेमाडपंती शैलीतील या मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करण्यात आला. त्यात मंदिराच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर संगमरवरी टाइल्सचा वापर करण्यात आला आहे. यामुळे मंदिराचे प्राचीन रूप पालटले आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे

मंदिराच्या सभामंडपाचे प्रवेशद्वार दगडी आहे. येथून आत प्रवेश करताच मंदिराचे प्राचीनत्व लक्षात येते. आत काही बिननक्षीकामाचे दगडी स्तंभ आहेत. खाली चौकोनी, मधला भाग गोलाकार, त्यावर चौकोनाकार आणि त्यावर वरच्या तुळईला आधारासाठीचे तरंगहस्त अशा प्रकारचे हे स्तंभ आहेत. सभामंडपात उंच चौथऱ्यावर नंदीची सुबक पाषाणमूर्ती आहे. त्यापुढे संगमरवरी कूर्मशिल्प आहे. सभामंडपास आतूनही संगमरवरी टाइल्स लावलेल्या आहेत. अंतराळातील देवकोष्टकांत गणेश आणि हनुमानाची मूर्ती आहे. या मंदिराचा वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे गर्भगृहाचे दगडी प्रवेशद्वार. ते कोरीव नक्षीकामाने सुशोभित केलेले आहे. येथे द्वारचौकटीवर भौमितिक नक्षी कोरलेली आहे. अर्धगोलाकार द्वारस्तंभ, त्याखाली दोन्ही बाजूंस द्वारपाल द्वारसेविकांची शिल्पेही येथे आहेत. द्वारचौकटीच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती आहे. त्यावरील उत्तरांग भागात मध्यभागी शंकराची तर त्याच्या दोन्ही बाजूंस देवींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.

गर्भगृह छोटेसे आहे. आत काळ्या पाषाणातील शिवपिंडी आहे. असे सांगितले जाते की या शिवपिंडीच्या खाली कपिलमुनींनी स्थापन केलेली वाळूची शिवपिंडी आहे. धातूपासून घडविलेली नागदेवता या शिवपिंडीला वेटोळे घालून बसली आहे. त्यावर कलशातून जलाभिषेक होताना दिसतो. मागच्या भिंतीला एका कोनाड्यात पार्वतीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या छताकडील भागावर त्रिकोणी आणि गोलाकार अशा आकाराची रचना केलेली दिसते. मंदिराचा कळस हा घुमटाकार बाजूला चार छोटे चौकोनी मिनार आहेत

मंदिराच्या प्रांगणात महादेव हनुमान यांची लहान मंदिरे आहेत. येथे दुसरे एक मंदिर शिवदासन महाराजांचे आहे. मंदिराच्या छोट्या गर्भगृहात शिवदासन महाराजांची संगमरवरी सुबक मूर्ती आहे. येथे जवळच विष्णू आणि लक्ष्मीचीही मूर्ती आहे. येथील एका मंदिरात पुरणदास महाराजांचे समाधीस्थान आहे. तेथे महाराजांची बैठी मूर्ती आहे. एका बाजूला कालीमातेचीही मूर्ती आहे. मंदिरात ठिकठिकाणी देवीदेवतांची चित्रे दिसतात. यात सुलक्षणी माता आणि श्रीचंद्रजी महाराज यांची चित्रे उल्लेखनीय आहेत. बाबा श्रीचंद्र वा भगवान श्रीचंद हे साधुंच्या उदासी संप्रदायाचे संस्थापक होते. शिख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांचे ते पुत्र होत. सुलक्षणी हे त्यांच्या मातेचे नाव. डिसेंबर १४९४ ते १३ जानेवारी १६२९ असे सुमारे १३४ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य त्यांना लाभले होते. त्यांनी सूर्य, विष्णु, शिव, गणेश शक्ती या देवतांच्या पूजनास प्रोत्साहन दिले. भगवान शंकराच्या अवतारस्वरूपात त्यांना पूजले जाते. त्यांच्या जीवनचरित्रातील तीन मोठ्या जुन्या तसबिरी या मंदिरात पाहावयास मिळतात

या मंदिरात मकरसंक्रातीच्या दिवशी मोठी यात्रा भरते. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात भाविकांची गर्दी होते. या मंदिरात कालसर्पयोग, त्रिपिंडी आणि गृहशांती असे विधी केले जातात. मंदिरापासून जवळच तापी नदीपात्रात पाणी साठ्यामुळे रांजणखळगे तयार झाले आहेत. ते पाहण्यासाठी पर्यटक अभ्यासक येथे येतात.

उपयुक्त माहिती

  • भुसावळपासून १२ किमी, तर जळगावपासून ३० किमी अंतरावर
  • भुसावळ येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
Back To Home