कपिलेश्वर महादेव मंदिर

पिंजर, ता. बार्शी टाकळी, जि. अकोला

ऋग्वेदातील रुद्र देवता म्हणजेच आजच्या काळात पूजला जाणारा शिव होय. ऋग्वेदात, यजुर्वेदाच्या वाजसनेयी संहितेत, अथर्ववेदात, ऐतरेय ब्राह्मण व शांखायन ब्राह्मण या वाङ्मयात रुद्रासाठी ‘शिव’ हे विशेषण वापरलेले आढळते. भारतात ज्या दैवतांची मोठ्या प्रमाणावर पूजाअर्चा होते, त्यात शिव किंवा शंकराचे नाव अग्रभागी आहे. शिवप्रतिके, शिवलिंग आणि मूर्ती या तीन स्वरुपांत शंकराचे पूजन केले जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने शिवलिंग स्वरूपातील शंकराची पूजा केली जाते. त्यातील एक प्राचीन मंदिर पिंजर येथे स्थित आहे. येथे कपिलेश्वर महादेव या नावाने त्याची आराधना केली जाते.
पिंजर हे एक ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आहे. अकोल्यापासून ४० किमी अंतरावर, कमी उंचीच्या खडकाळ टेकड्यांमध्ये वसलेल्या या गावाभोवती पूर्वी भक्कम तटबंदी होती. येथे एक किल्लाही होता. या तटबंदीचे तसेच किल्ल्याचे अवशेष आजही पाहायला मिळतात. ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर’च्या ‘अकोला डिस्ट्रिक्ट – व्हॉल्यूम १’ (१९१०) मधील नोंदीनुसार, अठराव्या शतकात पिंजर हे परगण्याचे मुख्यालय होते. त्या वेळी येथे सुमारे दोन हजार घरे होती. येथील कपिलेश्वर महादेवाचे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील मंदिर, तसेच त्या नजीक असलेली प्राचीन पायविहीर पिंजरच्या तत्कालिन सुबत्तेची ग्वाही देत आहे. हे मंदिर यादवकालीन असल्याचे सांगण्यात येते. मात्र गॅझेटियरमधील नोंदीनुसार, त्याचा अठराव्या शतकाच्या मध्यावर मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार करण्यात आला.
नागपूरचे सरसेनासाहेब सुभा रघुजीराजे भोसले (द्वितिय) यांचे वडिल मुधोजी राजे यांनी १७७२मध्ये पिंजरवर मोठा करभार लादला. त्यामुळे पिंजरची आर्थिक स्थिती ढासळत गेली. परिणामी येथील लोकसंख्या कमी होत गेली. गॅझेटियरमधील उल्लेखानुसार १८६७ मध्ये येथे ७०० तर १९०१ मध्ये ६१२ घरे उरली होती. यावरून या आधीच्या काळात कपिलेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असावा, असा जाणकारांचा अंदाज आहे. या मंदिराच्या प्रांगणात असलेल्या नंदीमंडपाच्या ओट्यावर १७-१८ ओळींचा संस्कृत भाषेतील एक प्राचीन शिलालेख आहे. मंदिराच्या इतिहासावर या साधनातून प्रकाश पडू शकला असता, परंतु त्यावरील अक्षरे पुसट झाल्याने तो अवाचनीय झाला आहे. त्यावर असलेली ‘कीर्ती’ व ‘प्रशस्ती’ ही दोनच अक्षरे संशोधकांना ओळखता आली आहेत.
पिंजर गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कपिलेश्वर महादेवाच्या मंदिराभोवती आवारभिंत आहे. आवारभिंतीत असलेल्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात प्रवेशद्वाराच्या उजवीकडे चौथऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा आहे. मंदिरासमोर उजवीकडे प्राचीन दगडी दीपमाळ आहे. नंदीमंडप, मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या हेमाडपंती मंदिराची संरचना आहे. उंच चौथऱ्यावर असलेल्या नंदीमंडपात चार स्तंभांच्या मध्ये अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. नंदीसमोर शिवपिंडी आहे. नंदीमंडपाच्या ओट्याच्या पायथ्याशी एक प्राचीन शिलालेख व ओट्याला लागून एक मोठा त्रिशुळ आहे.
मुखमंडपाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात मेघडंबरी आहे. मुखमंडपाच्या उजवीकडे मोठ्या आकाराचा त्रिशूळ आहे. या मुखमंडपात दोन्ही बाजूने कक्षासने आहेत. सभामंडपातील देवकोष्टकांमध्ये गणपती, श्रीदत्त, राधा-कृष्ण आदी देव-देवतांच्या मूर्ती आहेत. मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या खालच्या भागात कीर्तिमुख कोरलेले आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात दोन्ही बाजूंना गजराजांची शिल्पे आहेत. गर्भगृहात मोठ्या शाळुंकेमध्ये शिवलिंग आहे. वरच्या भागात असलेल्या पंचधातूच्या गलंतिकेतून पिंडीवर अभिषेक होत असतो. गर्भगृहातील एका देवळीत शिवमुखवटा आहे व त्यावर नागाने छत्र धरले आहे.
या मंदिरापासून काही अंतरावरच ‘चौबारी विहीर’ या नावाने प्रसिद्ध असलेली पायविहीर आहे. हेमांडपंती स्थापत्य शैलीत बांधलेली भव्य पायविहीर चौरसाच्या आकारात आहे. तिच्या चारही बाजूंनी अनेक पायऱ्या आहेत. त्या आजही चांगल्या स्थितीत आहेत. येथील काही देवकोष्टकांमध्ये देव-देवतांच्या मूर्ती आहेत. या विहिरीत बाराही महिने पाणी असते.
मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आठ दिवस चालणाऱ्या या उत्सवादरम्यान अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. श्रावण महिन्यात येथे शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. या महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी येथे कावड यात्रा येते. या यात्रेच्या आदल्या दिवशी भाविक कलशांमधून काटेपूर्णा नदीतील पवित्र जल कावडींमध्ये भरतात. ढोल-ताशांच्या गजरात निघणाऱ्या या कावड यात्रेत अनेक देखावेही असतात. गावातील गुलालशेख महाराज संस्थान, शिवशंभो मंडळासह अनेक मंडळांतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या या यात्रेत शेकडो नागरिक तसेच अघोरी विद्याधारी सहभागी होतात. यात्रेदरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो. ही यात्रा मंदिरात आल्यावर कावडींमधील जलाने शिवलिंगावर अभिषेक करण्यात येतो. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते.

उपयुक्त माहिती:

  • बार्शी टाकळी येथून २३ किमी अंतरावर
  • बार्शीटाकळी व अकोला येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा नाही
Back To Home