
शिवपुजनाची प्राचीन परंपरा असलेल्या धुळे जिल्ह्यामध्ये अनेक प्राचीन शिव मंदिरे आहेत. सूर्यपुत्री तापी आणि पांझरा या नद्यांच्या पवित्र संगमावर वसलेल्या मुडावद–नीम गावामधील कपिलेश्वर महादेव मंदिर हे त्यांपैकीच एक होय. सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या मंदिराविषयी अशी पौराणिक आख्यायिका आहे, की हे ठिकाण म्हणजे कपिल मुनींची तपोभूमी आहे व त्यांनीच येथील शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. येथे तीन शिवपिंडी आहेत. त्यांची मनोभावे पूजा केल्यास इच्छित फलप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
‘तापी माहात्म्य’ या ग्रंथातील कपिलेश्वर प्रभावनाम अध्यायात (क्र. ४१) या स्थानाचा उल्लेख आहे. त्यानुसार या ठिकाणी पाताळगुंफेमध्ये कपिलेशाचा वास आहे. येथे कपिलमुनींनी शिवआराधना केली होती. शंकराची मनोभावे पूजा करून सिद्धी प्राप्त केल्यानंतर या गुंफेच्या दर्शनाचे सौभाग्य प्राप्त होते, असे त्यात म्हटले आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की येथे तापी, पांझरा
आणि गुप्त गंगा असा त्रिवेणी संगम आहे. याबाबत आख्यायिका अशी की कपिलमुनी काशी येथे गंगास्नानासाठी नित्य जात असत. एकदा ते तापी व पांझरा नदीच्या पवित्र संगामावर ध्यानस्थ बसले होते. त्यामुळे ते काशी येथे वेळेत पोहोचले नाहीत. तेव्हा काशीतील गंगा मुनींच्या भेटीसाठी येथे प्रकट झाली. ही गंगा शिवलिंगाला स्पर्श करून नंतर गुप्त झाली.
हे मंदिर देशातील संगमस्थळी असलेल्या १०८ शिवलिंग मंदिरांपैकी एक आहे, असे सांगितले जाते. या मंदिर परिसरात तापी नदीच्या तीरावरील घाटाचे बांधकाम वा त्याचा जीर्णोद्धार सन १७६६ मध्ये करण्यात आला. या घाटावरील दीपमाळेच्या खालील चौथऱ्यावरील शिलालेखात तसा उल्लेख आहे. ‘श्री कपिलेस्वर च्यरणि निरंतर नारो दादा जि नेवाळकर सके १६८८ व्यय नाम सवछरे’ (अर्थ – श्री कपिलेश्वर महादेवाच्या चरणी निरंतर तत्पर असलेले नारोदादाजी नेवाळकर यांनी शालिवाहन शकाच्या १६८८व्या वर्षी व्ययनाम संवत्सरात म्हणजेच सन १७६६व्या वर्षी तापी तीरावरील घाटाचे काम पूर्ण केले किंवा त्याचा जीर्णोद्धार केला.) यावरून येथे या पूर्वीही कपिलेश्वराचे
मंदिर होते, असे स्पष्ट होते.
या मंदिरातील नंदी मंडपाच्या दर्शनी भागावर असलेल्या आडव्या तुळईवरील गणेशपट्टीत एक शिलालेख कोरलेला आहे. शुद्ध देवनागरी लिपीतील या शिलालेखावरून असे समजते की सात वर्षे चाललेले पहिले मराठा–इंग्रज युद्ध संपून पेशवे आणि इंग्रज गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांच्यात १७८२मध्ये ‘सालबाईचा तह’ झाला. या सात वर्षांच्या युद्धाची मोठी झळ खान्देशाला बसली होती. परंतु ते युद्ध संपल्यानंतर पुढच्याच वर्षी या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले. शिलालेखानुसार, सुभानुनाम संवत्सर पौष द्वितिया शालीवाहन शके १७०५मध्ये म्हणजे सोमवार, ता. २० जानेवारी १७८३ रोजी ते सुरू झाले व क्रोधि संवत्सर पौष द्वितिया शके १७०६ म्हणजे शुक्रवार, ता. ९ जानेवारी १७८४ रोजी पूर्ण झाले. हे काम १६ महिने चालले, असाही स्पष्ट उल्लेख या शिलालेखावर आहे.
तापी नदीच्या पैलतीरावरील थाळनेर हा परगणा सन १७५० मध्ये होळकरांना पेशव्यांकडून सरंजाम म्हणून मिळाला होता. मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात
आला त्या काळात इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर येथून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या राज्य करीत होत्या. लोकहितदक्ष अहिल्याबाई या उत्तम शासक म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांनी उभारलेली मंदिरे व घाट यामुळेही त्या ख्यातकीर्त आहेत. या मंदिराच्याही जीर्णोद्धारात त्यांचा सहभाग असल्याचे सांगण्यात येते.
मराठा स्थापत्यशैलीत बांधण्यात आलेल्या या मंदिरासमोर प्रांगणात चार पायऱ्या असलेला चौथरा व त्यावर घडीव काळ्या पाषाणात बांधलेली गोलाकार दीपमाळ आहे. दीपामाळेत आत जाण्यासाठी द्वार व तेथून वर जाण्यासाठी वर्तुळाकार जीना आहे. दीपमाळेची ही रचना दुर्मिळ व अनोखी आहे. दीपमाळेत वरच्या बाजूस हस्त आहेत. बाजूने तापी नदीच्या घाटावर जाण्यासाठी सुमारे ५० दगडी पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस सुरक्षा कठडे व खाली दोन्ही बाजूस दगडी बुरूज आहेत.
मंदिरासमोर संगमरवरी पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. त्याशेजारी २४ फूट उंचीचा त्रिशूल व डमरू आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीतील पूर्वाभिमुख
मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करण्यासाठी पूर्व, दक्षिण व उत्तर दिशेला असलेल्या प्रवेशद्वारांस मुखमंडप आहेत. मुखमंडपास दोन्ही बाजूस कठडा व त्यावर स्तंभ आहेत. कठड्याला वरच्या बाजूस पुष्पलता नक्षी आहे. नक्षीदार स्तंभांचा पाया व खालील निम्मा भाग चोकोनी व वरील भाग अष्टकोनी आहे. त्यावर कमळ फुलांची नक्षी असलेल्या वर्तुळाकार कणी व कणीवर कमळ व पर्ण नक्षी कोरलेले हस्त आहेत. हस्तांवर तुळई व त्यावर छत आहे. पूर्वेकडील मुखमंडपाच्या स्तंभांवरील तुळईवर उपरोक्त शिलालेख आहे.
सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी प्रदक्षिणा मार्ग सोडून कक्षासने आहेत. सभामंडपात मध्यभागी गर्भगृहाच्या द्वारासमोर दोन स्तंभ आहेत. मुखमंडप व सभामंडपास एकूण १६ स्तंभ आहेत. सभामंडपात गर्भगृहाकडील भिंतीवर दोन्ही बाजूस नक्षीदार स्तंभ असलेली देवकोष्टके आहेत व त्याच्या शीर्षभागी गजलक्ष्मीचे शिल्प आहे. डावीकडील देवकोष्टकात अलिकडील काळातील दानाचा शिलालेख आहे. सभागृहाच्या छतात मध्यभागी घुमट आहे.
पुढे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास पर्णलता व पुष्पलता नक्षी असलेल्या तीन द्वारशाखा आहेत. ललाटबिंबावर गणपती व ललाटपट्टीवर पुष्पलता कोरलेली आहे. मंडारकावर कमळ फुलांची नक्षी आहे. गर्भगृहातील जमीन सभामंडपापेक्षा खोलगट असल्याने आत उतरण्यासाठी पायरी आहे. गर्भगृहात तीन शिवपिंडी व बाजूला त्रिशूल–डमरू आहेत. जमिनीसलग असलेली काळ्या पाषाणातील शिवपिंडी कपिल मुनींनी स्थापित केलेली आहे. त्याशेजारी संगमरवरी शाळुंका असलेल्या दोन पिंडी नंतरच्या काळातील असल्याचे सांगितले जाते. गर्भगृहातील देवकोष्टकात पार्वतीची मूर्ती व भिंतीलगत गणपती आहे. बंदिस्त गर्भगृहाच्या भिंतींत दीपहस्त व गवाक्ष आहेत.
मंदिराच्या छताला उताराचा सज्जा व कठडा आहे. कठड्यावर बाह्य बाजूस भौमितिक आकृत्या व पुष्पलता नक्षी आहेत. तिन्ही मुखमंडप व सभामंडपाच्या छतावर घुमटाकार शिखरे व त्यावरील आमलकांवर कळस आहेत. उत्तर व दक्षिण दिशेच्या शिखरांत कमळ फुलांची प्रतिकृती साकारलेली आहे. तिन्ही मुखमंडपावरील कठड्याला दर्शनी भागावर प्रत्येकी दोन आमलक व त्यावर कळस आहेत.
गर्भगृहाच्या बाह्य बाजूस भिंतीतील गवाक्षांना स्तंभ व शिखरे आहेत. छतावरील मुख्य शिखर चौकोनी व त्यात चारही दिशांना हस्तांवर तोललेली देवकोष्टके मूर्तींसह आहेत. या देवकोष्टकांना स्वतंत्र शिखरे व त्यावर दर्शनी बाजूस सुरसुंदरी आहेत. प्रत्येक देवकोष्टकाच्या दोन्ही बाजूस ध्यानस्थ बसलेल्या ऋषीमुनींचे शिल्प आहेत. मुख्य शिखरालगत प्रत्येक भिंतीच्या कोनावर लघु शिखरे व त्यांवर आमलक आणि कळस आहेत. मुख्य शिखरात चारही कोनांत प्रत्येकी पाच मंगलकलशांची उतरंड साकारलेली आहे. शिखराच्या शीर्षभागी चारही दिशांना मुखशिल्पे आहेत. शिखरावर जाण्यासाठी पूर्व दिशेस खालपासून वरपर्यंत सहा चौकोनी हस्तांची रचना आहे. शिखराच्या वरील थरात आमलक व कळस आहे.
मंदिराच्या बाजूला वेद पाठशाळेची इमारत आहे. प्रांगणात आशापुरा देवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या अर्धखुल्या सभामंडपात सिंह व गर्भगृहात देवीची मूर्ती आहे. महादेव मंदिराच्या समोरील मारूती मंदिरात मारूतीची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. दुसऱ्या बाजूला श्रीराम, लक्ष्मण व जानकी मंदिर आहे. मागच्या बाजूला शनी देवाचे छतविरहित मंदिर आहे.
मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा व महाशिवरात्री हे दोन मुख्य वार्षिक उत्सव साजरे केले जातात. त्रिपुरारी पौर्णिमेस मंदिर व दीपमाळेवर तेलाच्या दिव्यांची रोषणाई केली जाते. दोन्ही उत्सवांच्या वेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी येतात. देवास बेलफुल अर्पण करून दूध व संगमाच्या पवित्र पाण्याने जलाभिषेक केला जातो. उत्सवाच्या वेळी लघुरूद्र, महाअभिषेक, भजन, कीर्तन, संगीत, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सन २००५ साली या मंदिर परिसरात अखिल भारतीय संत संमेलन भरले होते.