‘मातृगया तीर्थ’ म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यातील कपिलधारा तीर्थामध्ये स्नान केल्यास मनुष्य मातृऋणातून मुक्त होतो, अशी श्रद्धा आहे. त्यामुळेच ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व लाभलेल्या या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी दररोज शेकडो भाविक येतात. नाशिक-मुंबई महामार्गावर घोटीजवळून कावनईला जाण्यासाठी मार्ग आहे. पेशवेकाळापर्यंत नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे हे मूळ स्थान होते.
निसर्गसमृद्ध कावनईमध्ये प्रवेश करताना गजानन महाराजांची तपोभूमी असलेले साधना केंद्र लागते. असे सांगितले जाते की, समर्थ रामदास स्वामींच्या आदेशानुसार गजानन महाराजांनी येथील पंपासरोवर परिसरात १२ वर्षें तपश्चर्या केली होती आणि त्यानंतर ते शेगावला गेले होते. येथून जवळच कपिलधारा तीर्थ आहे. कपिलधारा तीर्थावर निर्मळ पाण्याचा एक अक्षय झरा आहे. या झऱ्याचे पाणी गोमुखातून कुंडात येते, म्हणून याला ‘कपिलधारा’ असे नाव पडल्याचा उल्लेख ‘कपिलोपनिषदा’त आहे. ‘कपिलधारा’ येथे पाण्याची दोन कुंडे असून, मुख्य कुंडातून दुसऱ्या कुंडात पाणी येते. दोन्ही कुंडे दगडी बांधकामातील आहेत. या दोन्ही कुंडांमध्ये ३६५ दिवस सतत गोमुखातून पाणी वाहत असते. मुख्य कुंडात गुप्त झरा असल्याचे बोलले जाते. इतिहास अभ्यासक असे सांगतात की, ब्रिटिश अंमल सुरू होण्यापूर्वी कावनई हे तालुक्याचे ठिकाण होते. मात्र, ब्रिटिशांनी इगतपुरीला तालुक्याचे ठिकाण बनविले आणि १८८५ मध्ये कावनईहून सर्व सरकारी दस्तऐवज इगतपुरीत आणला गेला.
असे सांगण्यात येते की, ‘कपिलधारा’ हे तीर्थक्षेत्र फार प्राचीन आहे. नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याचे हे मूळ स्थान असून, पेशव्यांनी दिलेला ताम्रपट येथे उपलब्ध आहे. सत्ययुगापासून येथे कुंभमेळा सुरू होता. १७५५ मध्ये पहिल्या स्नानावरून शैव आणि वैष्णव पंथीयांमध्ये वाद झाला व तो विकोपाला गेला. त्यामुळे माधवराव पेशव्यांच्या काळात या कुंभमेळ्याचे दोन भाग करण्यात आले. त्यापैकी शंकराचे उपासक असलेल्या शैवपंथींना त्र्यंबकेश्वर येथे पाठवण्यात आले, तर प्रभू रामाचे उपासक असणाऱ्यांना रामकुंडावर पाठवण्यात आले. आजही येथे
सत्ययुगामध्ये शंकरांच्या २४ अवतारांपैकी एक असलेल्या कपिलमुनींनी वयाच्या पाचव्या वर्षीच आपल्या मातेला ‘कपिलधारा तीर्था’वर सांख्यशास्त्राचा उपदेश करून मोक्ष दिला. त्यामुळे हे ‘मातृगया तीर्थ’ म्हणूनही ओळखले जाते. ‘कपिलधारा’ तीर्थाच्या दक्षिणेला राक्षसांचे गुरू शुक्राचार्यांचा आश्रम होता. त्यांनी दण्डकारण्याला शापित केल्याने तिथे वाळवंट झाले होते. श्रीराम वनवासात असताना येथे आले असता, त्यांच्या पदस्पर्शामुळे हा प्रदेश पुन्हा हिरवागार झाला.
अशी आख्यायिका आहे की याच ठिकाणी संत ज्ञानेश्वरादी भावंडांनी एका ब्राह्मणाच्या मृत्युमुखी पडलेल्या मुलाला पाणी शिंपडून जिवंत केले. असेही सांगितले जाते की, राम आणि शंकर यांची या ठिकाणीच भेट झाली. याशिवाय समर्थ रामदासांनीही छत्रपती शिवाजी महाराजांना येथे उपदेश केला होता.
हनुमानाबद्दलही एक आख्यायिका अशी की राम-रावण युद्धादरम्यान रावणपुत्र मेघनाद याने लक्ष्मणावर शक्तिप्रहार केला, तेव्हा तो मुर्छित पडला होता. त्याला शुद्धीवर आणण्यासाठी हनुमान संजीवनी आणण्यास निघाला होता. त्यावेळी या तीर्थावरून जात असताना कात्यनेमी या राक्षसाने त्याला अडवले. त्यामुळे हनुमानाने त्याचा वध केला. त्यामुळेच या गावाचे नाव कावनई असे पडले.
मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यास सर्वप्रथम कपिलधारा तीर्थ कुंड पाहायला मिळते. या तीर्थाच्या बाजूलाच रामाच्या भक्तीत तल्लीन असलेल्या हनुमंताची मूर्ती आहे. पायऱ्या चढून वर गेल्यास रामाचे मुख्य मंदिर दिसते. या मंदिराकडे जाताना मुख्य कुंड लागते. या कुंडाच्या उजव्या बाजूला महादेवाचे आणि डाव्या बाजूला रामाचे मंदिर आहे. महादेव मंदिरासमोर नंदीमंडप आहे, तर गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग आहे. राम मंदिरात प्रवेश करताना प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूला हत्तींची मोठी शिल्पे आहेत. सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. गर्भगृहात राम-सीता-लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या कळसावरील कोरीव काम वैशिष्ट्यपूर्ण असून, त्यामध्ये हनुमान आणि महादेव यांची शिल्पे कोरलेली आहेत.
जगप्रसिद्ध चिनी प्रवासी ह्युवान शाँग दीड हजार वर्षांपूर्वी कावनई येथील सांख्यशास्त्राच्या विद्यापीठाला भेट देण्यासाठी आला असता, त्याने थाळीसारखी एक घंटा भेट म्हणून दिली होती. ती येथील राम मंदिरात ठेवण्यात आली आहे.