सातवाहन कालापासूनच्या इतिहासाचा ठसा उमटलेल्या जुन्नर तालुक्यात, मांडवी नदीच्या तीरावर, ओतूर गाव वसलेले आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा सांगणाऱ्या ओतूरमध्ये संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले कपर्दिकेश्वर मंदिर उभे आहे. मंदीरात स्वयंभू शिवलिंग असल्यामुळे हे जागृत स्थान मानले जाते.
मंदिरासंदर्भात अख्यायिका अशी, की पंधराव्या शतकात राघव चैतन्य स्वामींनी महर्षि व्यासांच्या दर्शनासाठी बारा वर्षे नदीकाठी अनुष्ठान केले होते. त्यावेळी काठावर शिवलिंग तयार करताना त्यांना एक कवडी सापडली. संस्कृतमध्ये तिला कपर्दिका म्हणतात. त्या कपर्दिकेत त्यांना एक तेजस्वी सुंदर स्वयंभू शिवपिंडी मिळाली. त्याचेच कपर्दिकेश्वर असे नामकरण झाले. राघव चैतन्य स्वामी यांनी त्याच स्थानावर या मंदिराची उभारणी केली. तेच हे आजचे कपार्दिकेश्वर महादेव मंदिर.
मंदिराभोवती भव्य अशी दगडी तटबंदी आहे. पुरातन वास्तुप्रमाणे त्याला कोनाडे आणि झरोके आहेत. प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजुस एक उंच दगडी दीपमाळ आहे. तटबंदीच्या आतील बाजुस वड, पिंपळ, बेल, गुलमोहर यासोबतच अनेक सुगंधीत फुलांची झाडे असल्यामुळे प्रवेशद्वारातून प्रवेश करताच प्रसन्न वाटते. दीपमाळेलगत बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृतींची स्थापना करण्यात आली आहे. मंदिराच्या बाहेरील आवारात अडीच फूट उंचीच्या दगडी चौकोनी चौथऱ्यावर, एक चौकोनी शिळा व त्यावर ही शिवलिंगे आहेत. ज्योतिर्लिंगांच्या दर्शनानंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच नंदीची काळ्या दगडातील सुबक मूर्ती आहे. मंदिरात प्रवेश करताच एक जुनी पितळी मोठी घंटा आहे. पायऱ्या उतरून गेल्यानंतर समोरच गाभारा दिसतो. तेथील काळ्या दगडातील शिवपिंडीवर सतत जलाभिषेक होत असतो.
श्रावणातील दर सोमवारी भरणारी येथील यात्रा संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध आहे. तांदळाच्या पिंडी आणि राज्यभरातून येथे असलेल्या आखाड्यात कुस्ती खेळायला येणारे मल्ल ही दोन येथील महत्त्वाची आकर्षणे. यात्रेच्या आदल्या दिवशी गावकऱ्यांकडून तांदूळ गोळा करून ते वाजत गाजत देवळात आणले जातात. मंदिरातील पुजारी लिंबाच्या साह्याने तांदळापासून पिंडी बनवतो. त्यावेळी त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते. पहिल्या सोमवारी एक, दुसऱ्याला दोन अशा प्रकारे या पिंडींची संख्या वाढत जाते. यात्रेच्या दिवशी महाभिषेक व आरती करून त्या दर्शनासाठी खुल्या केल्या जातात. पूत्रप्राप्तीसाठी येथे बोललेले नवस पूर्ण होतात, असा गावकऱ्यांचा विश्वास आहे. श्रावणी सोमवारी महाभिषेक करून हे नवस फेडले जातात.
यात्रेसाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक येथे येतात. ओतूर गावच्या रोहोकड वेशीपासून यात्रेची दुकाने मांडली जातात. वाटेत तुकाराम महाराजांचे तसेच गाडगे महाराजांचे मंदीर लागते. तुकाराम महाराजांचे मंदिर ऐतिहासिक असल्याचे सांगण्यात येते. कुस्तीपटूंसाठी तेथे खास आखाडा आहे. पुरातन कपर्दिकेश्वराच्या मंदिराच्या जिर्णोद्धारावेळी अनेक पुरातन शिल्प आढळली. ज्यामध्ये दगडी दर्शनकलश आणि वीरगळ यांचा समावेश आहे. ती शिल्पे चालुक्य वा शिलाहाराच्या कालखंडातील असावीत असा अंदाज आहे. भाविकांना सकाळी ५ ते सायंकाळी ७.३० पर्यंत कपर्दिकेश्वराचे दर्शन घेता येते. या मंदिरात सकाळी ७.३० व सायंकाळी ७ वाजता आरती होते. www.kapardikeshwar.in ही मंदिराची अधिकृत वेबसाईट आहे.