कपालेश्वर मंदिर

पंचवटी नाशिक, जि. नाशिक


नाशिकमध्ये महादेवाची अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यांत कपालेश्वर हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिरासमोर नंदी नाही, हे येथील वैशिष्ट्य. महाकालेश्वराचे रूप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कपालेश्वराच्या दर्शनाने बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचे पुण्य लाभते, असे मानले जाते.

या मंदिरात नंदी नाही याविषयी आख्यायिका अशी की एकदा इंद्रसभा भरली होती. सभेस सर्व देव उपस्थित होते. त्यावेळेस ब्रह्मदेव आणि महादेव यांच्यात वाद झाला. त्यावेळी संतापलेल्या महादेवांनी ब्रह्मदेवांचे पाचपैकी एक शिर उडवले. त्यामुळे महादेवाला ब्रह्महत्येचे पातक लागले. नारदाच्या सांगण्यानुसार या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी महादेव नाशिकजवळील सोमेश्वर येथे आले. तेव्हा एका ब्राह्मणाच्या घरासमोर बांधलेल्या गाय आणि वासरू (नंदी) यांच्यातील संवाद महादेवांनी ऐकला त्यांच्या संवादात नंदी म्हणाला की ‘मी नाकात वेसण घालणार नाही. उद्या तो ब्राह्मण मला वेसण घालायला आल्यावर मी त्याला मारणार’. त्यावर त्याच्या आईने (गायीने) त्यास म्हटले, ‘तू हे जर केलेस तर तुला ब्रह्महत्येचे पातक लागेल’. त्यावर तो नंदी म्हणाला, ‘मला त्यावरचा उपाय माहीत आहे.’ दुसऱ्या दिवशी ब्राह्मण नंदीस वेसण घालायला आला असता, नंदीच्या हल्ल्यात त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला आणि नंदीचे शरीर काळे पडले. आता पुढे काय होतेय हे उत्सुकतेने पाहत महादेव त्या नंदीच्या मागे जाऊ लागले. त्यानंतर त्या नंदीने गोदावरीच्या पात्रात (रामकुंडात) स्नान केले. त्याबरोबर त्याचा मूळ शुभ्र रंग त्याला परत मिळाला. ते पाहून शंकरानेही त्या त्रिवेणी संगमात स्नान केले. त्याबरोबर ब्रह्महत्येच्या पातकातून महादेवांची सुटका झाली. त्याच गोदावरी काठावर एक टेकडी होती. त्या टेकडीच्या कपारात महादेव जाऊन बसले असता नंदीही तेथे आला. त्यावर महादेव म्हणाले, ‘तुझ्यामुळे माझी ब्रह्महत्येतून सुटका झाली, त्यामुळे यापुढे तू माझ्यासमोर बसू नकोस. तू मला गुरुसमान आहेस.’ त्यामुळे या मंदिरात नंदी नाही. मात्र, हा नंदी रामकुंडात विसावला आहे असेही मानले जाते.

मंदिराच्या कळसाजवळ ‘श्री गणेशाय नम: श्री कपालेश्वर’ असा देवनागरीतील शिलालेख आहे. त्यावरील अक्षरांवरून तो प्राचीन वाटतो. इ. स. ११०० मध्ये तत्कालीन गवळी राजाने पाच हजार रुपये खर्च करून या मंदिराचा जीर्णोद्धार केला. यानंतर इ.स. १७३८ मध्ये कोळीराजाने या मंदिरात अधिक सुधारणा करीत बांधकाम केले. याच कोळीराजाने कपालेश्वर मंदिराच्या व्यवस्थेसाठी व पूजा विधीसाठी शैव-गुरवांची नेमणूक केल्याचा उल्लेख काही संशोधनपर पुस्तकांत आहे. इ.स. १७६३ मध्ये मंदिरातील पायऱ्या कृष्णाजी पाटील-पवार या भाविकाने बांधून दिल्या, तर मंदिराचा मूळ सभामंडप जगजीवनराव पवार या भाविकाने इ.स. १७६३ मध्येच बांधून दिल्याचा उल्लेखही काही दस्ताऐवजांत आढळतो. पेशव्यांच्या राजवटीत या वास्तूच्या जीर्णोद्धारासाठी मोठी मदत झाल्याचेही सांगण्यात येते.

गोदावरी नदीच्या काठी आणि रामकुंडाच्या समोरच लहानशा टेकडीवर हे मंदिर आहे. स्थापत्यकलेचे एक उत्तम उदाहरण म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते. महादेव आणि नंदी यांचे नाते अतुट, पण या ठिकाणी महादेवाने नंदीला गुरू मानल्याने तो मंदिरासमोर दिसत नाही. ही धार्मिक बाब येथील अनोखे वैशिष्ट्य म्हणून गणली जाते. आवारात विष्णू आणि हनुमान यांच्या मंदिरांसह तांब्याच्या आवरणातील महादेवाची सुबक पिंडही आहे.

मुख्य मंदिराचे प्रवेशद्वार लाकडी असून त्यावर नक्षीकाम आहे. मंदिराचे सभामंडप आणि गाभारा असे दोन भाग आहेत. सभामंडप प्रशस्त असून गाभारा चांदीने मढवलेला आहे. त्यावर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर महादेवाची प्रतिमा आहे, तर गाभाऱ्यातील शिवलिंगावर चांदीचा मुखवटा आहे. बाजूलाच चांदीचे शेषनाग आहेत.

मंदिरात श्रावणातल्या सोमवारी व शनिवारी महादेवाची पालखी काढली जाते. मुख्य उत्सव असलेल्या महाशिवरात्रीला भाविकांची येथे अलोट गर्दी असते. त्यामुळे परिसराला जत्रेचे स्वरूप येते. अनेक भाविक या दिवशी त्यांची मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून नवस करतात. नवस फेडण्यासाठी आलेल्या भाविकांचीही येथे गर्दी असते.

देव दिवाळीनिमित्त देवस्थान ट्रस्टतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यापैकी ‘हरिहर भेट’ सोहळा प्रसिद्ध आहे. या दिवशी भगवान विष्णू व महादेवाचे पूजन, नवग्रह स्थापना करण्यात येते. महाविष्णू याग करण्यात येतो. मंदिर परिसरात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात येते. कपालेश्वर मंदिर आणि मंदिराच्या समोर गोदावरी नदीच्या पलीकडे असलेल्या सुंदर नारायण मंदिरामधून अनुक्रमे शंकर आणि विष्णू यांचे मुखवटे गोदावरी नदीवर आणले जातात. त्यावेळी या दोन देवांची भेट घडविली जाते. त्यानंतर गोदावरीत स्नान केले जाते. यावेळी शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण आलेले असते.

कपालेश्वर मंदिरात पहाटे ५ ते रात्री ११ दरम्यान भाविकांना दर्शन घेता येते. पहाटे ५ वाजता मंदिर उघडल्यानंतर पूजा-अभिषेकानंतर आरती होते. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता पुन्हा आरती होते.

उपयुक्त माहिती:

  • नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील मंदिर
  • एसटी तसेच महापालिका परिवहन बसची सुविधा
  • राज्यातील अनेक भागांतून एसटी, रेल्वे सेवा
  • खासगी वाहनाने मंदिरापर्यंत जाता येते
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home