कण्वऋषी आश्रम
सिद्धेश्वर मंदिर

कानळदा, ता. जळगाव, जि. जळगाव

जळगाव तालुक्यातील गिरणा नदीच्या तिरावर कानळदा या गावी कण्वऋषींचा आश्रम आहे. या आश्रमाच्या परिसरात पुरातन सिद्धेश्वर मंदिर आहे. गिरणा नदीच्या काठावर असलेला हा आश्रम निसर्गसमृद्ध वातावरणात आहे. कण्व ऋषी हे वैदिक काळातले एक प्रसिद्ध ऋषी होते. असे सांगितले जाते की चार वेदांपैकी ऋग्वेद या वेदग्रंथांतील बराचसा भाग कण्व ऋषी आणि त्यांच्या वंशजांनी लिहिलेला आहे. हे ऋषी कर्णेश या नावानेही ओळखले जात. येथील सिद्धेश्वर मंदिर व कण्वऋषींचा आश्रम त्रेतायुगातील असल्याची मान्यता आहे.
पौराणिक अख्यायिकेनुसार, विश्वामित्र हे तपस्वी ऋषी होते. परंतु ऋषी होण्याआधी ते एक राजा होते. त्यांना वसिष्ठ ऋषिंकडून कामधेनु गाय हवी होती. तिच्या प्राप्तीसाठी त्यांनी वसिष्ठ ऋषींशी युद्ध केले होते. त्या युद्धात विश्वामित्र हरले. पराजय सहन न झाल्यामुळे ते तपश्चर्येसाठी बसले. याच काळात मेनका या स्वर्गसुंदरीने त्यांची तपस्या भंग केली. विश्वामित्र आणि मेनका यांची मुलगी शकुंतला हिचा सांभाळ कण्वऋषिंनी केला. हस्तिनापूरचा राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा गांधर्वविवाह याच आश्रमात झाला होता. शकुंतलापुत्र भरत याचे बालपणही या आश्रमात गेले. पुढे या भरत राजामुळे देशाला भारत हे नाव प्राप्त झाले.
असे सांगितले जाते की मुंबईत राहणारे योगीराज स्वामी चंद्रकिरण महाराज यांना १३ एप्रिल १९६८ रोजी ब्रह्ममुहूर्तावर एक स्वप्नदृष्टांत झाला व त्यांना त्यात या स्थानाबद्दल समजले. दृष्टांतानुसार पुढील ११ दिवसांत स्वामींनी हे ठिकाण शोधून काढले. येथे राहून काही वर्षांतच या सर्व परिसराचा त्यांनी कायापालट केला. तेव्हापासून परिसरात विस्मृतीत गेलेले हे स्थान अनेक भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.
कानळदा गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी गिरणा नदीच्या तिरावर कण्वऋषी आश्रम व सिद्धेश्वर मंदिर आहेत. आश्रमाचा हा परिसर प्रशस्त आहे. या परिसराला सभोवती तटभिंत आहे. या तटभिंतीमधील मोठ्या प्रवेशद्वारातून आश्रमाच्या परिसरात प्रवेश होतो. या संपूर्ण परिसरात गर्द झाडी आहे व उद्यान विकसित करण्यात आलेले आहे. यातून फरसबंदी असलेल्या वाटेवरून कण्वऋषींच्या आश्रमापर्यंत येता येते. आश्रमाच्या आवारात एक मोठा दगडी बुरूज आहे. या बुरूजाच्या समोर प्राचीन सिद्धेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या सभामंडपात दहा दगडी खांब आहेत. सभामंडपात गर्भगृहाच्या समोर अखंड पाषाणात कोरलेली प्राचीन नंदीमूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील द्वारशाखांवर नक्षीकाम आहे. मंदिराच्या सर्व भिंती दगडी आहेत. गर्भगृहात मध्यभागी सिद्धेश्वराची पिंडी आहे. जमिनीपासून काहीशी उंचावर असलेली ही पिंडी अखंड पाषाणातील आहे. पंचधातूच्या नागदेवतेने यास वेटोळे घातलेले आहे. ही शिवपिंडी त्रेतायुगातील असल्याचे सांगितले जाते. या मंदिराचा शिखर घुमटाकार आहे व त्याच्या शिरोभागी आमलक व कळस आहे. सिद्धेश्वर मंदिराच्या शेजारी एक प्राचीन वडाचे झाड आहे. अशी मान्यता आहे की श्रीराम, लक्ष्मण व सीता वनवासात असताना काहीकाळ झाडाखाली थांबले होते.
सिद्धेश्वर मंदिराच्या समोरील बाजूस डोंगरकड्याला लागून एक मोठा उंचवटा आहे. काही पाय़ऱ्या चढून त्या बुरूजसदृश्य उंचवट्यावर असलेल्या प्रांगणात प्रवेश होतो. येथून कण्वऋषी जेथे तपश्चर्या करत त्या गुंफेत जाण्याचा मार्गे आहे. या मार्गावरून काही पायऱ्या उतरून खाली आल्यावर एका गुंफेत प्रवेश होतो. या गुंफेत दोन गोलाकार शिळा आणि काही चौकोनी शिळा एकावर एक रचलेल्या आहेत. या गुंफेच्या दोन्ही बाजूला दोन भुयारी मार्ग आहेत. तेथून बाहेर आल्यावर चंद्रकिरण महाराज यांचे आणि त्यांचे शिष्य सत्यानंद महाराज यांचे समाधीस्थळ आहे.
मंदिरापासून जवळच एक यज्ञशाळा आहे. सिमेंट-काँक्रीटने बांधलेली सुंदर अशी ही वास्तू आहे. याशिवाय येथे श्रीकृष्णाचे मंदिर आहे. त्यात हातात बासरी घेतलेली श्रीकृष्णाची प्रसन्नमुद्रेतील सुबक मूर्ती आहे. श्रीकृष्ण मूर्तीच्या डावीकडे वेदमाता गायत्रीदेवी हिची मूर्ती आहे. कृष्णमूर्तीच्या समोर एक छोटी संगमरवरी शिवपिंडी आणि नंदी आहे. या मंदिरापासून काही पायऱ्या चढून वर आल्यावर भगवती मातेचे मंदिर आहे. मंदिराच्या गर्भगृहात भगवती मातेची सिंहासनावर विराजमान असलेली संगमरवरी मूर्ती आहे. अष्टभुजाधारी मूर्तीच्या हातांत शस्त्र, फुल, शंख अशा वस्तू आहेत. तिच्या डोक्यावर मुकूट, अंगावर दागिने आणि गुजराती पद्धतीने नेसवलेली साडी आहे. याच परिसरात श्री चंद्रकिरण महाराज यांचे पादुकास्थान आहे. तिथे भगवी वस्त्रे परिधान केलेली त्यांची मूर्ती आहे.
या मंदिरात श्रावण महिन्यात दररोज सकाळी सात ते रात्री सात या वेळेत ‘ओम नमः शिवाय’चा जप सुरू असतो. यावेळी ग्रामस्थांसोबत अनेक भाविक उपस्थित असतात. दररोज सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत भाविक येथे दर्शनासाठी येऊ शकतात.

उपयुक्त माहिती

  • जळगावपासून १४ किमी अंतरावर
  • जळगाव येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Back To Home