भारतात आठव्या ते बाराव्या शतकाच्या काळात उदयास आलेल्या ‘नाथ’ नामक भारतीय शैव संप्रदायात चौऱ्याऐंशी सिद्ध मानले जातात. कानिफनाथ हे या सिद्धांपैकी एक आहेत. त्यांना प्रबुद्ध नारायणाचा अवतार मानले जाते. कण्हपा, कृष्णपा, कानिपा, कान्हु, सिद्ध कृष्णपाद आदी विविध नावांनी ते ओळखले जातात. कान्होबा हेही त्यांचे एक नाव आहे. बंजारा समाजाचे कुलदैवत असलेल्या या कान्होबा महाराज उर्फ कानिफनाथांचे मंदिर सावरगाव येथे एका उंच टेकडीवर वसले आहे. येथील कानिफनाथांचे स्थान किमान ८०० वर्षे प्राचीन असल्याचे सांगितले जाते.
कानिफनाथ हे नाथपंथाबरोबरच कापालिक, वैष्णव, जैन, बौद्ध, महानुभाव, एवढेच नव्हे, तर सूफी संप्रदायातही आदरणीय ठरले आहेत. तिबेटी ग्रंथ परंपरेनुसार कानिफनाथ हे मूळचे कर्नाटकचे होते. काही अभ्यासकांच्या मते कानिफनाथ हे ‘बौद्ध कापालिक’ होते. बंगाली चर्यापद म्हणजे बौद्धांतील वज्रयान परंपरेतील रहस्यमयी काव्य-गीतांचा संग्रह होय. त्यात कानिफनाथांचा उल्लेख ‘कापालिक’ असा आहे. या चर्यापदांवरून त्यांचा कार्यकाळ दहाव्या-अकराव्या शतकातील असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
‘नवनाथ भक्तिसार’ या मराठी ग्रंथात त्यांना जालंधरनाथांचे शिष्य असल्याचे म्हटले आहे. लीळाचरित्रातील ‘गोविंदचंदा उपदेसें जळांधरि अवज्ञा कथन’ या लीळेमध्ये (उत्तरार्ध, ५०७) त्यांचा उल्लेख ‘कान्ह’ या नावाने करण्यात आला आहे व त्यात जालंधरनाथ (जालिंदरनाथ) हे त्यांचे गुरू असल्याचे म्हटले आहे.
धुंडीसूत मालू या कवीच्या ‘श्री नवनाथ भक्तिसार’ या ग्रंथामध्ये कानिफनाथांची जन्म आख्यायिका सांगितलेली आहे. ती अशी की सरस्वती ही ब्रह्मदेवाची कन्या. ती १२ वर्षांची झाली, तेव्हा तिचे सौंदर्य पाहून ब्रह्मदेवाच्या मनात कामवासना जागृत झाली. त्यावेळी ब्रह्मदेवाच्या वीर्याचा एक थेंब महीतलावर निजलेल्या एका गजराजाच्या कानात पडला व कालांतराने त्या कानातून एका तेज:पुंज बालकाचा जन्म झाला. तेच कानिफनाथ होत. हिमालयातील बद्रीनाथ येथे त्यांनी जालंधरनाथांसमवेत १२ वर्षे वास्तव्य केले. तेथे त्यांनी चाळीस कोटी वीस लाख श्लोक रचल्याचे नवनाथ भक्तिसारात म्हटले आहे. यानंतर कानिफनाथांनी देशभ्रमण केले. या भ्रमणकाळात त्यांना ७०० शिष्य लाभले. ते स्त्रीदेशात जाऊन मच्छिंद्रांना भेटल्याचे, तसेच त्यांनी गौडबंगालात (बंगाल प्रांत) व कटक प्रांतात वास्तव्य केल्याचे उल्लेखही या ग्रंथात आहेत.
तेथून फिरत फिरत ते महाराष्ट्रात आले. येथे गर्भगिरी पर्वतानजीक मढी या गावी त्यांनी वास्तव्य केले. येथेच त्यांची समाधी आहे. एका आख्यायिकेनुसार, कानिफनाथांचा मढीत मुक्काम असताना एकदा ते यवतमाळमधील पुसद येथील माहूरगडावर रेणुकामातेच्या दर्शनासाठी आले होते. तेथून दत्त शिखरावर असताना त्यांना पुन्हा मढी गावात जाण्याची आज्ञा झाली. त्यानुसार ते मढीकडे परतत असताना काही काळ सावरगावमधील या गडावर थांबले व येथे त्यांनी साधना केली. कालांतराने या ठिकाणी त्यांचे शिल्प घडवून मंदिर बांधण्यात आले. कानिफनाथांचे हे मंदिर मूळचे हेमाडपंती शैलीत बांधलेले होते, असे मानले जाते. वेळोवेळी त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि त्यातून त्यास सध्याचे स्वरूप प्राप्त झाले.
आजूबाजूला दाट झाडी असलेल्या एका उंच टेकडीवर विस्तीर्ण जागेत हे मंदिर वसले आहे. मंदिरासमोर मोठा ओटा आहे. तेथून १६ पायऱ्या चढून मंदिर प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणास उंच तटबंदी आहे. तटबंदीत दगडी प्रवेशद्वार आहे. त्याच्या दोन्ही बाजूंस दोन मोठे बुरुज बांधलेले आहेत. यामुळे एखाद्या किल्ल्यासारखी या मंदिराची बाह्यरचना दिसते व कानिफगड म्हणूनही हे स्थान ओळखले जाते.
मंदिराच्या प्रांगणात येताच समोरच मंदिराची वास्तू दिसते. मंदिराच्या आधुनिक पद्धतीने बांधलेल्या सभामंडपासमोर भक्तांच्या सोयीसाठी पत्र्याची शेड उभारलेली आहे. या शेडमध्ये एका उंच दगडी चौथऱ्यावर कान्होबा महाराजांच्या धातूत घडवलेल्या पादुका विराजमान आहेत. सभामंडपाच्या उजवीकडे संगमरवरी फरशा लावलेल्या चौथऱ्यावर एक रुंद दीपमाळ उभी आहे. सभामंडपास समोरून तीन कमानदार प्रवेशद्वारे आहेत. दगडी खांब असलेल्या या सभामंडपात स्टीलचे पाईप लावून दर्शनरांग तयार करण्यात आली आहे. गर्भगृहामध्ये कानिफनाथांचे अधिष्ठान आहे. सावरगाव येथे आले असताना त्यांनी ज्या जागेवर साधना केली, तीच ही जागा, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या अधिष्ठानाजवळच कानिफनाथांची रंगीत शिल्पमूर्ती आहे. ही मूर्ती दगडात उठावशिल्प पद्धतीने कोरलेली आहे. गर्भगृहावर वैशिष्ट्यपूर्ण असे शिखर आहे. या शिखराचे खालचे तीन स्तर चौकोनाकार आहेत. त्यावर गोलाकार स्तर आणि त्यावर कळस आहे. या सर्व स्तरांवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे.
फाल्गुन शुद्ध द्वादशी या दिवशी येथे कानिफनाथांची मोठी जत्रा भरते. या उत्सवास सुमारे १५० वर्षांची परंपरा असल्याचे सांगण्यात येते. जत्रेच्या दिवशी सकाळी येथे किरणोत्सव होतो. असे सांगितले जाते की या मुहूर्तावर सकाळी ६.३८ ते ६.४८ या दहा मिनिटांच्या कालावधीत सूर्याची किरणे कानिफनाथांच्या अधिष्ठानावर पडतात. तसेच मंदिराच्या दीपमाळेवरही सूर्यगोल विसावतो. हे दृश्य पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. यात्रेत बंजारा समाजाप्रमाणेच विविध समाजांतील लोक मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. पंचक्रोशीतील गावांतून येथे देवांच्या काठ्या मिरवणुकीने येतात. त्यांची येथे विधिवत पूजा केली जाते. याचप्रमाणे येथे भागवत सप्ताह, अखंड हरिनाम, प्रवचन, भजन-कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम असतात. सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी महापूजा व होमविधी केला जातो. त्यानंतर काल्याचे कीर्तन होते. या दिवशी येथे सकाळी महाप्रसादाचेही आयोजन केले जाते.