कानबाई मंदिर

बलसाने, ता. साक्री, जि. धुळे

भारतीय शिल्पकलेचा इतिहास सिंधू संस्कृतीच्या उगमापर्यंत पोहोचतो. मौर्यकालीन शिल्पकला पुढे तेराव्या शतकापर्यंत, यादव काळापर्यंत बहरत गेली. पुढे बहामनी सत्ताकाळापासून शिल्पकलेला उतरती कळा लागली शिल्पकलेचा समृध्द वारसा लाभलेली अनेक मंदिरे जंगलात किंवा भूगर्भात लुप्त झाली. काही मंदिरे दुर्लक्षित होऊन त्यांची अक्षरशः पडझड होऊ लागली. यापैकी जी मोजकी मंदिरे आज अस्तित्वात आहेत ती त्यांच्यासोबत जोडल्या गेलेल्या लोकश्रद्धेमुळे. असेच शिल्पकलेचा समृध्द वारसा लाभलेले प्राचीन आणि प्रसिद्ध कानबाई मंदिर साक्री तालुक्यातील बलसाने गावात स्थित आहे

हेमाडपंती स्थापत्य शैलीतील दगडी बांधकाम असलेल्या या मंदिर समुहापैकी एका मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुस्थितीत असलेल्या शीलालेखावरून हे मंदिर सन १२६४ साली बांधल्याचे स्पष्ट होते. शेवटचा यादव राजा दुसरा भोज याच्या काळातील हे बांधकाम असावे, असे सांगितले जाते. यादव हे अहिर वंशीय असल्याने त्यांची श्रीकृष्णावर विशेष श्रद्धा होती. त्यामूळेच त्यांनी राधेचे म्हणजेच कानबाई देवीचे मंदिर बांधले, असे म्हटले जाते. संपूर्ण खान्देशात कानबाई देवीचा उत्सव घरोघरी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कानबाई देवीमुळे या प्रदेशासकान देशनाव पडले पुढे त्याचा अपभ्रंश होऊन खान्देश झाले असावे, असेही सांगितले जाते. आहिर वंशाची बोलीआहीर वाणी पुढे ती अहिराणी भाषा म्हणून ओळखली जाऊ लागली. अशा प्रकारे कानबाई देवीचा खान्देशात प्राचीन काळापासून प्रभाव आहे

मंदिराच्या प्रांगणात सभोवताली तटबंदीचे अवशेष दिसत असले तरी सद्य स्थितीत मात्र येथे तटबंदी नाही. तटबंदी मुक्त विस्तीर्ण प्रांगणात जागोजागी विविध प्राचीन मूर्तीं, वीरगळ मंदिराचे अवशेष आढळतात. कानबाई मंदिरासमोर एका चौथऱ्यावर चौकोनी वीरगळ स्तंभ आहे त्याच्या चारही बाजूंनी उठाव शैलीतील शिल्पे कोरलेली आहेत. या वीरगळचे वैशिष्ट्य असे की यात शीर्षभागी दोन भागात युद्ध प्रसंग, त्याखाली स्वर्गरोहण सर्वांत खालच्या थरात स्वर्गसुख भोगणारा जीवात्मा चित्रीत आहे

मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर पायऱ्या आहेत. चौथऱ्यावर मुखमंडपाच्या प्रवेशद्वारासमोर उजव्या बाजूस गणेश, शिवपार्वती, दशावतार विष्णू, वनदेवी आदी देवतांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती शिवपिंडी आहेत. पडझड झालेल्या मंदिरातील या मूर्ती असाव्यात, असे सांगितले जाते. मुखमंडपाचे प्रवेशद्वार काहीसे अरूंद आहे. यातील बाह्य बाजूचे कलात्मक नक्षीकाम असलेले स्तंभ ढासळून गेले असावेत असे जाणवते. त्यामूळे द्वारावर दोन्ही बाजूस सपाट चौकोनी स्तंभ त्यावर तुळई दिसत आहे. मुखमंडपात डाव्या उजव्या बाजूस दोन द्वारपाल कक्ष आहेत. या कक्षांच्या मंडारकावर कमळ फुलांची नक्षी आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार स्तंभ पानाफुलांच्या नक्षीकामाने सुशोभित प्रत्येकी तीन द्वारशाखा आहेत. ललाटबिंबावर गणपती विराजमान आहे. ललाटपट्टीच्या वरील बाजूस विविध देवतांच्या शिल्पांकृती कोरलेल्या आहेत. दोन्ही कक्षात नक्षीदार वज्रपिठावर देवतांच्या काळ्या पाषाणातील मूर्तीं आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या मुखमंडपातील स्तंभ भिंतींवर विविध आकारातील नक्षी कोरलेल्या आहेत. मुखमंडपात हवा सूर्यप्रकाश येण्यासाठी गवाक्ष आहेत. मुखमंडपाच्या छतात आयताकृती नक्षीदार घुमट आहे

पुढे असलेल्या सभामंडपाच्या प्रवेशद्वाराला लागून काही मूर्ती ठेवलेल्या आहेत. प्रवेशद्वारास चार नक्षीदार द्वारशाखा, ललाटबिंबावर गणपती, त्यावरील ललाटपट्टीत मध्यभागी अर्धचक्र त्याच्या दोन्ही बाजूस पर्णलता आणि पुष्पलता नक्षी आहेत. मंडारकावर कमळ फुलांची नक्षी आहे. सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूच्या रांगेतील स्तंभ भिंतीत आहेत. स्तंभ पायाकडील बाजूस अधिक रूंद आहेत मध्यभागी विविध आकाराच्या नक्षी कोरलेल्या आहेत. शीर्षभागी कणी त्यावर चारही दिशांना हस्त आहेत. हस्तांवर असलेल्या यक्षशिल्पांनी आपल्या माथ्यावर तुळई तोलून धरल्या आहेत, असे भासते. भिंतीतील दहा स्तंभावरील कणीवर तिन्ही बाजूस हस्त समोरील बाजूच्या हस्तांवर यक्ष शिल्पे आहेत. या यक्षांच्या माथ्यावर असलेल्या सपाट पाटावर विविध देवतांच्या मूर्ती आहेत

सभामंडपात दोन्ही बाजूस असलेल्या प्रत्येकी पाच स्वतंत्र देवकक्षांमध्ये विविध देवतांच्या मूर्ती आहेत. प्रत्येक कक्षाच्या द्वारशाखांवर पानाफुलांच्या नक्षी ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. ललाटबिंबाच्या वर उत्तररांगेत विविध देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडपात भिंतीलगत गणेशाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. सभामंडपाच्या छतात नक्षीदार घुमट आहे. या घुमटाच्या विविध थरांत देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.

गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर नक्षीदार स्तंभ असलेली देवकोष्टके आहेत. देवकोष्टकांच्या वरील बाजूस विविध देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. डाव्या बाजूच्या देवकोष्टकावर वराह तर उजव्या बाजूच्या देवकोष्टकवर हिरण्यकश्यपूचा वध करणारा नरसिंह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशव्दारास पाच द्वारशाखा आहेत. त्यांवर खालील दोन्ही बाजूस प्रत्येकी पाच सुरसुंदरी, द्वारपाल वरील बाजूस पानाफुलांच्या नक्षी आहेत. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती उत्तररांगेवर विविध देवतांच्या मूर्ती सुरसुंदरी शिल्प आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर कानबाई रानबाई यांच्या एकाच पाषाणातील एकत्रित मूर्ती आहेत. अस्पष्ट असलेल्या या मूर्तींस शेंदूरलेपन केलेले आहे

मंदिराची बाह्य बाजू पूर्णपणे नक्षीकामाने व्यापलेली आहे छतावरील मूळ शिखर ढासळलेले आहे. सध्या दिसत असलेले घुमटाकार शिखर नव्याने बांधलेले असल्याचे सांगितले जाते. या मंदिराच्या बाजूला पार्वती देवीची मूर्ती असलेले लहान मंदिर आहे. त्याशेजारी रानबाई देवीचे खंडित अवस्थेतील मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ देवीची काळ्या पाषाणातील द्विभुज मूर्ती आहे. मूर्तीच्या डाव्या मांडीवर बाळ डोक्यातून वृक्ष शाखा निघाल्या आहेत. स्थानीक ग्रामस्थ या देवीस खोकली माता संबोधतात. देवीच्या मूर्तीच्या बाजूला पाषाणचक्र शिवपिंडी आहे. या मंदिरापासून जवळच चार नक्षीदार स्तंभांवर ऊभा वराह मंडप आहे. त्यात शेंदूर लावलेली वराह मूर्ती आहे. स्तंभाजवळ विविध देवतांच्या मूर्ती आहेत. येथून जवळच शिवपिंडी असलेले शिवमंदिर भवानी मंदिर आहे. शेजारी मठ म्हणून संबोधले जाणारे मोठे परंतू जीर्ण मंदिर आहे. येथील प्रवेशद्वारावरील ललाटबिंबाच्या वर शिलालेख आहे. या शिलालेखात येथील सर्व मंदिर वास्तू सन १२६४ साली बांधल्या असल्याची नोंद आहे

हे मंदिर सध्या पुरातत्व खात्याच्या अधिपत्याखाली येत असले तरी संपूर्ण खान्देशातील हजारो भाविक नित्य नेमाने देवीच्या दर्शनासाठी येतात. देवीची चक्रपुजा बांधून रोठ अर्पण केले जातात. देवीस पुरणपोळी वरण बट्टीचा नैवद्य दाखवितात. नागपंचमीच्या नंतर येणाऱ्या पहिल्या शनिवारी, रविवारी सोमवारी खान्देशातील घराघरात कानबाई रानबाईचा उत्सव साजरा केला जातो. घरोघरी देवीची स्थापना करून तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते.

उपयुक्त माहिती

  • साक्री येथून ३३ किमी, तर धुळे येथून ४८ किमी अंतरावर
  • साक्री धुळे येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home