कांबरेश्वर मंदिर

कांबरे बुद्रुक, ता. भोर, जि. पुणे

ऐतिहासिक आणि शिवकालीन वारसा लाभलेल्या भोर तालुक्यातील भाटघर धरणात कांबरेश्वर हे शंकराला समर्पित असलेले प्राचीन मंदिर आहे. १९२८ मध्ये इंग्रजांनी धरणाचे काम केल्यानंतर मंदिर पाण्याखाली गेले होते. वर्षातील दहा महिने धरणाच्या पाण्याखाली असलेले हे मंदिर पाणी कमी झाल्यावर दिसू लागते. मे व जून महिन्यात भाविकांना या मंदिरात जाऊन दर्शन घेता येते.

हे मंदिर पांडवकालीन असून त्याचे मूळ नाव ‘कर्महरेश्वर’ असल्याचे सांगितले जाते, परंतु कांबरे गावच्या हद्दीत असल्यामुळे ते ‘कांबरेश्वर’ असे रूढ झाले आहे. पुण्याहून खेड शिवापूर मार्गे भाटघर धरण, जोगवडे, कांबरे बुद्रुक या गावांत येता येते. हे अंतर ३१ किलोमीटर आहे. गावापासून मंदिरापर्यंत चालत जाण्यास दहा मिनिटे लागतात.

धरणाच्या पात्रात मधोमध हे मंदिर आहे. दगडी बांधकाम असलेले हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराचे शिखर विटांचे बांधलेले दिसते. सतत पाण्याखाली असल्यामुळे यातील विटा काही ठिकाणी दिसत असल्या तरी वर्षानुवर्षे पाण्याचा मारा सहन करूनही मंदिर भक्कमपणे आपल्या स्थानावर उभे आहे.

नंदीमंडप, सभागृह व गाभारा अशी सर्वसाधारण रचना या मंदिराचीही आहे. सततच्या पाण्याच्या माऱ्यामुळे नंदी मंडपाचा केवळ चौथराच आता उरलेला दिसतो. चौथऱ्याच्या शेजारीच दोन नंदी दिसतात. धरणात जाण्यापूर्वी हे मंदिर उंच जोत्यावर होते, परंतु वर्षानुवर्षे जमा होणाऱ्या गाळामुळे चौथरा व पायऱ्या गाडल्या गेल्या आहेत, असे ग्रामस्थांकडून सांगितले जाते.

सभा मंडपाच्या प्रवेशद्वारावर गणेश प्रतिमा कोरलेली आहे. गाभाऱ्यात कांबरेश्वराची स्वयंभू शिवपिंडी आहे. मात्र, सभामंडप व गाभाऱ्यात कायमच पाणी असल्यामुळे ती पाहता येत नाही. शिवपिंडीच्या समोर पार्वतीची मूर्ती आहे. धरणातील पाण्याचा साठा कमी झाल्यानंतर येथील ग्रामस्थांकडून मंदिराची संपूर्ण साफसफाई केली जाते. या काळात ग्रामस्थांकडून येथे पूजा-अर्चा केली जाते.

वर्षातील केवळ दोनच महिने कांबरेश्वराचे दर्शन घेता येत असल्याने अनेक भाविकांची मे व जून महिन्यात येथे ये-जा असते. ‘हर हर महादेव’च्या गजरात कांबरेश्वराचा आशीर्वाद घेऊन येथील शेतकरी शेतीच्या कामांना सुरुवात करतात.

उपयुक्त माहिती

  •  भोरपासून ३२ किमी अंतरावर
  • भोरपासून एसटी, तसेच रिक्षाने या गावात जाता येते
  • जूनमध्ये जास्त पाऊस असेल तर दर्शन होत नाही
  • खासगी वाहने कांबरे गावापर्यंत येऊ शकतात
  • निवास व न्याहरीची येथे सुविधा नाही
Back To Home