कामसिद्ध मंदिर

रोझोदा, ता. रावेर, जि. जळगाव

पुराणांमध्ये वर्णन केलेली स्त्रीपुरुषांच्या हृदयातील प्रेमाची अधिष्ठात्री देवता म्हणजे कामदेव. मन्मथ, आत्मभू, अनंग, मार, मनसिज, कंदर्प, स्मर, पुष्पधन्वा, पंचशर, रतिपती, मीनकेतन, दर्पक, मदन या नावांनीही कामदेव ओळखला जातो. मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या या देवतेची मंदिरे मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहेत. यात आसाममधील कामरूप जिल्ह्यातआसामचे खजुराहोम्हणून ओळखले जाणारे मदन कामदेवाच्या प्रसिद्ध मंदिराचा समावेश आहे. महाराष्ट्रातील रोझोदा येथेही कामदेवास समर्पित असलेले असेच एक प्रसिद्ध मंदिर आहे.

कामदेवाचा जन्म प्रथम ब्रह्मदेवाच्या काळजापासून झाला, अशी पौराणिक आख्यायिका आहे. शिवपुराणाच्याश्री रुद्र संहितेच्या दुसऱ्या तिसऱ्या अध्यायात कामदेवाच्या जन्माची ही कथा सांगितलेली आहे. त्यात ब्रह्मा असे सांगतात कीमाझ्या मनापासून एक मनोहर रूप असलेला पुरूष जन्मास आला. तो अत्यंत सुंदर अद्‌भूत स्वरुपाचा होता. त्याचे केस काळे होते. दात मोत्यांसारखे शुभ्र चमकदार होते. त्याच्या श्वासांतून सुगंध येत होता. त्याच्या अंगावरील लवही सुगंधी होती. त्याची चाल मदमस्त हत्तीसारखी होती.’ ब्रह्मदेवाने त्यास मन्मथ, काम, मदन आणि कंदर्प अशी नावे दिली. तुझ्याकडील पाच बाणांनी स्त्रिया आणि पुरूषांना मोहीत कर, असे त्याला सांगितले.

रक्तकमल, नीलकमल, आम्रमंजरी, अशोकपुष्प मोगरा ही पाच पुष्पे त्याचे पाच बाण आहेत. शिवपुराणानुसार कामदेवाने आपल्या पाच बाणांना हर्षण, रोचन, मोहन, शोषण आणि मारण अशी नावे दिली. काही ठिकाणी यांचा उल्लेख संमोहन, उन्मादन, शोषण, तापन स्तंभन असाही येतो. पुष्पबाण असलेल्या कामदेवाचे धनुष्य इक्षुदंडाचे म्हणजे ऊसाचे असल्याचाही उल्लेख आढळतो. औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ लेण्यांतील कैलास मंदिरावर एके ठिकाणी कामदेवाचे त्याची पत्नी रती हिच्यासह असलेले शिल्प कोरलेले आहे. त्यात कामदेवाच्या हातात इक्षुदंडाचे धनुष्य दिसते. या बाणांच्या साह्याने तो तरुणतरुणींची हृदये विद्ध करतो, अशी कथा आहे. अन्य पौराणिक कथेनुसार श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा पुत्र प्रद्युम्न हाही कामदेवच असल्याचे मानले जाते. काही कथांनुसार त्याला पंख आहेत त्याचे वाहन शुक (पोपट) आहे.

भारतात कामदेवाची मंदिरे संख्येने कमी आहेत. कामेश्वर, कामनाथ नावाने काही मंदिरे अनेक ठिकाणी आढळतात. मात्र ती शंकरास समर्पित असतात. रावेर तालुक्यातील रोझोदा येथील कामसिद्धाचे मंदिर मात्र कामदेवास समर्पित आहे. या मंदिराची आख्यायिका अशी की फार वर्षांपूर्वी या भागातील एका शेतात नांगरणी चालली असता, एके ठिकाणी नांगरास अडथळा आला. तेथून रक्ताचे तुषार उडू लागले. त्यामुळे लोक भयभीत झाले. काही वेळाने रक्त येण्याचे थांबल्यावर ग्रामस्थांनी तेथे खोदकाम केले. त्यात एक पाषाणासम मूर्ती आढळली. ही कामसिद्धाची मूर्ती होती. ग्रामस्थांनी मंदिर उभारून त्यात या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. स्थानिक लोकधारणेनुसार, ही शंकूच्या आकाराची मूर्ती कणाकणाने वाढत असते. वाढता वाढता ती घुमटापर्यंत पोहोचेपर्यंत आपोआप भंग पावते.

या मंदिराच्या स्थापनेचा नेमका इतिहास अज्ञात आहे. सध्याच्या मंदिरात १९२३ हे स्थापनेचे साल लिहिले असले, तरी येथे त्याही आधीपासून मंदिर होते, असे सांगितले जाते. हे मंदिर गावाच्या बाहेरच्या भागात मोठ्या परिसरात वसलेले आहे. मंदिर परिसरास मोठे प्रवेशद्वार आहे. मंदिर प्रांगणात सर्वत्र पेव्हरब्लॉकची फरसबंदी आहे. पुढे पत्र्याची मोठी गजपृष्ठाकार शेड असलेला मंडप आहे. या सभामंडपात गुळगुळीत फरशी बसवलेली आहे. सभामंडपाच्या डाव्या बाजूस दुर्गामातेचे वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने बांधलेले मंदिर आहे. मंदिराच्या गर्भगृहात उंच वज्रपिठावर दुर्गामातेची संगमरवरी मूर्ती आहे. या मूर्तीलगत देवीची चांदीची मूर्तीही आहे. या मंदिराशेजारी एका चौथऱ्यावर गणेशाची मूर्ती विराजमान आहे.

येथून पुढे सभामंडपाच्या अगदी शेवटच्या टोकाला उंच चौथऱ्यावर कामसिद्धाचे मंदिर स्थित आहे. या मंदिराच्या समोरच्या भागात होमकुंड आहे. तेथून पुढे सहा पायऱ्या चढून या चौथऱ्यावर प्रवेश होतो. या पायऱ्यांच्या उजवीकडे सिद्धकामेश्वर महादेवाचे, तसेच शितलामातेचे, तर डावीकडे भैरवनाथाचे स्थान आहे. पायऱ्यांनजीक दोन्ही बाजूंना दोन दीपस्तंभ आहेत. चौथऱ्यास कमानाकृती प्रवेशद्वार आहे. येथून काही पावलांवर कामसिद्धाचे छोटेसे मंदिर आहे. या मंदिरास घुमटाकार शिखर आहे. आत कामसिद्धाची त्रिशंकूच्या आकाराची शेंदूरचर्चित पाषाण मूर्ती आहे. या मूर्तीला वरच्या बाजूला चार डोळे बसविण्यात आले आहेत. या देवतेस पूर्वी कामदेव असेच संबोधले जाई. कालांतराने या जागृत देवस्थानाची भाविकांना प्रचिती येत गेली, भाविकांचे काम सिद्धिस जाऊ लागले, त्यामुळे या देवतेस कामसिद्ध असे संबोधले जाऊ लागले

या मंदिरात माघ पौर्णिमेला देवाचा उत्सव साजरा केला जातो. या वेळी देवकाठीचा ध्वज बदलण्यात येऊन भगताच्या घरात रात्रभर ती ठेवली जाते. दुसऱ्या दिवशी दुपारी वाजता देवकाठी वाजत गाजत गावातून मिरवली जाते. यास ध्वजमिरवणूक असे म्हणतात. हाताच्या पंजावर किंवा दातात धरून देवकाठी खेळवली जाते. गावकरी भाविक मोठ्या संख्येने या य़ात्रेला हजेरी लावतात

यात्रेच्या दिवशी महाप्रसादाचा कार्य़क्रम असतो. ज्या भगताच्या अंगात स्वारी येते, ते पुढच्या वर्षीच्या पावसाचे पीकपाण्याचे भाकित वर्तवतात. ज्यांना मूलबाळ होत नाही, त्यांच्यासाठी या मंदिरात एक कार्यक्रम होतो. होणाऱ्या कार्यक्रमात मूल होणाऱ्या महिलेला ओटी करून पाठमोरी बसविले जाते. भगत लिंब फेकतात. ते तिच्या ओटीत पडले तर तिला मूल होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिरात श्रावणात महारुद्राभिषेक यांसारखे धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. या देवस्थानाला राज्य सरकारकडूनवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे. मंदिराच्या आवारात भक्तनिवास आहे. मंदिराच्या भव्य अशा सभामंडपात लग्नसोहळे आयोजित केले जातात.

उपयुक्त माहिती

  • रावेरहून २० किमी, तर जळगावहून ५२ किमी अंतरावर
  • रावेर, जळगाव येथून एसटीची सोय
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : विजय महाजन, मो. ७५८८००८३७९
Back To Home