कमला भवानी मंदिर

देवीचा माळ, ता. करमळा, जि. सोलापूर

फलटण येथील नाईक निंबाळकर हे तुळजाभवानीचे निस्सिम भक्त होते. त्यांनी तुळजापूर येथील मंदिराचा जिर्णोद्धार करून अनेक सुधारणा केल्या होत्या. यवनांच्या चाकरीत असतानाही त्यांनी देव व धर्मावरील आपली श्रद्धा ढळू दिली नाही. त्यांनी आपल्याकडे असलेल्या ९६ खेड्यांच्या जहागिरीत अनेक मंदिरांचा जिर्णोध्दार केला व अनेक नवी मंदिरे उभारली. आपले श्रद्धास्थान असलेल्या तुळजा भवानीचे प्रतिरूप म्हणून करमाळा तालुक्यातील देवीचा माळ येथे कमला भवानी देवीचे मंदिर त्यांनी उभारले. सुमारे तीनशे वर्षे प्राचीन असलेल्या या मंदिरातील देवी जागृत व नवसाला पावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हेमाडपंती स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम असलेले हे मंदिर धार्मिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे मानले जाते. असे सांगितले जाते की जहागिरदार रावरंभा निंबाळकर यांनी सन १७२७ साली या मंदिराचे बांधकाम सुरू केले व पुढे सन १७४५ साली त्यांचे पुत्र जानोजी राजे निंबाळकर यांनी ते पूर्ण केले. जहागीरदार बाबाजी नाईक – निंबाळकर यांचे नातू रावरंभा निंबाळकर यांना निजामाकडून फलटणची जहागीरदारी मिळाली होती. भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत निंबाळकर घराण्याच्या ताब्यात असलेल्या या जहागिरीत उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील नळदुर्ग, भूम, तुळजापूर हा भाग तर
सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, करमाळा, शेंद्री, रोपळे, दहीगाव तसेच परभणी व अहिल्यानगर जिल्ह्यातील काही गावे, २२ हजारांची मनसब, पालखी आणि मशालीचा मान मिळाला होता. रावरंभा हे अनेक वर्षे तुळजापुरात राहिल्याने त्यांची तुळजाभवानीवर श्रद्धा जडली होती. त्यांनी तुळजापूरच्या मंदिराचा जिर्णोद्धार केला. त्यानंतर रावरंभा निंबाळकर यांनी करमाळ्याचे कमला भवानी मंदिर बांधले. १७४० ते ४३ सालच्या दरम्यान जानोजी निंबाळकर रघुजी भोसल्यांसोबत दक्षिणेत चित्रनपल्लीच्या स्वारीवर गेले असता त्यांना तेथील शैलीत बांधलेल्या मंदिरांचे सौंदर्य खूपच भावले. त्यामुळे जानोजीरावांनी त्याप्रमाणे या मंदिराच्या प्रवेशद्वारांवर गोपुरे बांधून घेतली.
असे सांगितले जाते की ९६ कुळी मराठा रावरंभा निंबाळकर यांच्या जहागिरीत ९६ खेडी होती. त्यामुळे हे मंदिर बांधताना त्यांनी ९६ अंकाला विशेष महत्त्व दिले. मंदिरात एकूण ९६ स्तंभ आहेत. मंदिराभोवती ९६ ओवऱ्या आहेत. मंदिरात एकूण ९६ शिल्पे व बारवेत ९६ पायऱ्या आहेत. त्यामुळेच हे मंदिर ९६ कुळी मंदिर नावाने प्रसिद्ध आहे. हे मंदिर सुमारे ८० एकर क्षेत्रावर विस्तारलेले आहे. मंदिरास भक्कम तटबंदी आहे. तटबंदीत पूर्व, दक्षिण व उत्तर दिशेला महाद्वारे आहेत. महाद्वारास अजस्त्र लाकडी झडपा व आतील दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष आहेत. तिन्ही प्रवेशद्वारांच्या छतावर उंच गोपुरे आहेत. गोपुराच्या खालील थरात लहान कक्ष आणि शीर्षभागी आडव्या रचनेच्या शिखरावर आडव्या रांगेत पंचधातूचे पाच कळस आहेत. गोपुरात आतील बाजूला शिखराकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत.
मंदिराच्या प्रांगणात आणखी दोन दुमजली प्रवेशद्वारे आहेत. दुमजली प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाने आहेत. मंदिराच्या प्रांगणात येण्यासाठी एकूण पाच प्रवेशद्वारे आहेत. मुख्यप्रवेशद्वारापासून काहीसे पुढे प्रांगणात डावीकडे एक व उजवीकडे दोन अशा तीन दीपमाळा आहेत. दगडी बांधणीच्या सहा थरांच्या व सुमारे ८० फूट उंच अष्टकोनी दीपमाळेत वर जाण्यासाठी दीपमाळांच्या आतून पायऱ्या आहेत. दीपमाळाची रचना ही मिनार पद्धतीची आहे. मंदिराच्या प्रांगणात तटबंदीला लागून चारही बाजूंनी ९६ ओवऱ्या आहेत. बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना राहण्यासाठी या ओवऱ्यांचा वापर भक्तनिवास म्हणून केला जातो. मंदिराच्या प्रांगणात मध्यभागी यज्ञकुंड, तुलसी वृंदावन व निंबाळकर घराण्यातील कर्तबगार दिवंगत पुरुषांच्या समाध्या आहेत.
मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. मुखमंडपाच्या छतावर दुमजली मेघडंबरी आणि त्यात खाली व वर भवानी देवीच्या मूर्ती आहेत. मुखमंडपापेक्षा उंचावर असल्यामुळे सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर तीन पायऱ्या आहेत. अर्धखुल्या सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी कक्षासनांची रचना आहे. सभामंडपातील सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. स्तंभदंडात ते चौकोन, षट्कोन, वर्तुळ अशा विविध भौमितिक आकारांत आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी कणी, हस्त व हस्तांवर तुळई आहेत. सभामंडपाच्या छताचा मध्यभाग घुमटाकार आहे.
सभामंडपाच्या पुढे असलेल्या अंतराळात सिंहशिल्प आहे. सिंहशिल्पाच्या पुढे जमिनीवरील दगडी फरशीत झोपलेल्या अवस्थेतील स्रीचे शिल्प कोरलेले आहे. अंतराळात डाव्या बाजूला एक कक्ष आहे. यातील वज्रपिठावर देवीची पितळी मूर्ती व पितळी अश्वशिल्प आहे. पुढे मुख्यगर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. रजतपटल आच्छादित द्वारशाखांवर विविध प्रकारच्या नक्षी आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर कमलाभवानी देवीची सुमारे पाच फूट उंच गंडकी शिळेत घडवलेली अष्टभुजा महिषासुरमर्दिनी रूपातील मूर्ती आहे. देवीच्या हातात विविध आयुधे आहेत.
मुख्य गर्भगृहाच्या डाव्या व उजव्या बाजूला आणखी दोन गर्भगृहे आहेत. त्यापैकी उजवीकडील गर्भगृहात शिवपिंडी व डावीकडील गर्भगृहात वज्रपिठावर गरुडारुढ श्रीविष्णू व लक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. याच गर्भगृहात सप्तअश्वरथारुढ सूर्यदेवाची काळ्या पाषाणातील प्रतिमा आहे. मंदिराच्या छतावर चोहोबाजूंनी सुरक्षा कठडा आहे. मुख्यगर्भगृहाच्या छतावर सहा थरांचे द्रविडी शैलीतील चौकोनी शिखर आहे. शिखरावर अनेक देवी देवता, यक्ष, योगिनी, पशूपक्षी यांची शिल्पे व इस्लामिक पद्धतीच्या नक्षी आहेत. मंदिरापासून जवळच ऐतिहासिक बारव आहे. त्यात उतरण्यासाठी ९६ पायऱ्या आहेत. त्यामुळे ही विहीर ९६ पायऱ्यांची विहीर या नावाने प्रसिद्ध आहे. याच विहीरीत ‘सैराट’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते.
मंदिरात कार्तिक पौर्णिमा ते चतुर्थी असा पाच दिवसांचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी देवीचा छबीना काढला जातो. ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळीत देवी पालखीत बसून ग्रामप्रदक्षिणेला निघते. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. जत्रोत्सवानिमित्त पाच दिवस सलग भजन, कीर्तन, महाप्रसाद, जागरण, गोंधळ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शारदीय नवरात्रोत्सव हा येथील दुसरा महत्वाचा वार्षिक उत्सव आहे. यावेळी दहा दिवसांत लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. देवीला साडी चोळी अर्पण करून, खणानारळाने ओटी भरून विविध सौभाग्य अलंकार अर्पण केले जातात. या मंदिरात मंगळवार, शुक्रवार, अष्टमी, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. दररोज सकाळी ६.३० वाजल्यापासून रात्री ११.३० पर्यंत या मंदिरात भाविक दर्शनासाठी येऊ शकतात.

उपयुक्त माहिती

  • करमाळा बस स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • सोलापूर येथून १२३ किमी अंतरावर
  • सोलापूर जिल्ह्यातील अनेक शहरांतून करमाळ्यासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९४०४७०८९२४
Back To Home