‘नवसाला पावणारी देवी’ अशी ओळख असणारे कामाक्षी माता मंदिर एक जागृत देवस्थान मानले जाते. इगतपुरी तालुक्यातील कावनई किल्ल्याच्या पायथ्याशी कपिलधारा तीर्थाजवळ हे मंदिर आहे. या मंदिराचे महात्म्य पौराणिक काळापासून असल्याचे सांगितले जाते. कामाक्षी मातेची कांचीपुरा, गुवाहाटी, कावनई व करंजगाव (शेगाव) ही चार शक्तिपीठे मानली जातात. त्यापैकी तिसऱ्या क्रमांकाचे शक्तिपीठ म्हणून या मंदिराचे स्थान आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की रावणाकडून सीतेचे हरण झाल्यानंतर श्रीराम सीतेच्या शोधासाठी जात असताना टाकेद येथे जटायू पक्षी जखमी झालेला आढळला. जटायूला मोक्ष दिल्यानंतर श्रीराम दंडकारण्यात सीतेचा शोध घेण्यासाठी गेले. त्याच वेळेस कैलास पर्वतावर महादेवांकडून ‘श्रीराम… श्रीराम…’ हा जप सुरू होता. यावेळी पार्वती महादेवांस रागावून म्हणाली, जो राम आपल्या पत्नीचा सांभाळ करू शकत नाही, त्या रामाचे ध्यान तुम्ही का करत आहात? यावेळी शंकराने उत्तर दिले की, तुझा विचार चुकीचा आहे. तू रामाची परीक्षा घेऊ शकतेस. त्या वेळी या दंडकारण्यात पार्वती एका सुंदर स्त्रीचे रूप घेऊन श्रीरामाला मोहित करण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा श्रीरामाने पार्वतीला ओळखून दंडवत घातले. त्यामुळे श्रीरामांची भक्ती महादेव का करतात, हे पार्वतीला कळून चुकले. त्यानंतर पार्वतीने प्रसन्न होऊन रामास सीतेच्या शोधासाठी पुढचा मार्ग दाखवला. त्यावेळी भक्तांसाठी कामाक्षी देवीच्या रूपात इथेच रहावे, अशी विनंती श्रीरामाने पार्वतीकडे केली. तेव्हापासून पार्वती या ठिकाणी कामाक्षी मातेच्या रूपाने राहिली. हेच ठिकाण कामाक्षी मातेचे मंदिर म्हणून ओळखले जाते.
रामाची कामइच्छा पाहण्यासाठी आलेली ही कामाक्षी माता, असा उल्लेख ‘वाल्मिकी रामायणा’त आढळतो.
नाशिक महामार्गावरून घोटी-इगतपुरीच्या दिशेने जाताना खंबाळे गावाजवळ उजव्या हाताला कावनई फाटा आहे. त्या रस्त्यावरून जाताना कावनई गड दिसतो. त्या गडाच्या खालीच कावनई गावात निसर्गसमृद्ध परिसरात कामाक्षी मातेचे मंदिर आहे. मंदिराची रचना सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. सभामंडपात देवीचे वाहन असलेल्या सिंहाची मूर्ती आहे. गर्भगृहात कामाक्षी मातेची पाषाणातील मूर्ती आहे. काहीशी उग्र भासणारी ही मूर्ती दगडात कोरलेली आहे. देवीच्या एका हातात तलवार असून दुसऱ्या हातात त्रिशूळ आहे. इतर दोन हातांतही गदा आणि खंजिरसारखी शस्त्रे आहेत. या शक्तिपीठात केलेले नवस पूर्ण होतात, असा भाविकांचा विश्वास असल्याने अनेक भाविक येथे नवस करण्यासाठी तर अनेक जण नवसपूर्तीनंतर तो फेडण्यासाठी येत असतात.
युद्धात विजयश्री मिळाल्यावर नानासाहेब पेशव्यांनी नवसपूर्तीसाठी कामाक्षी देवीला सोने आणि चांदीचे अलंकार अर्पण केले होते, असा उल्लेख पेशव्यांच्या बखरीमध्ये आहे. मंदिराकडे आजही हे अलंकार उपलब्ध असून ते नवरात्रोत्सवात आणि चैत्र पौर्णिमेला देवीच्या मूर्तीवर चढवले जातात. या नवीन मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांनी इ.स. १७५० ते इ.स. १७६५ या कालखंडात केला असल्याचे सांगितले जाते.
नवरात्रोत्सव आणि चैत्र पौर्णिमेला येथे देवीचा उत्सव साजरा केला जातो. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात. श्रीराम, शंकर, पार्वती, कपिलमुनी, हनुमान, शुक्राचार्य, छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास, गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कावनई हे सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ स्थान आहे. यापूर्वी कुंभमेळा येथे भरत होता. श्री संत गजानन महाराज यांनी या परिसरात तपश्चर्या केली, असे मानले जाते.