लातूर शहराच्या मध्यवर्ती भागात, जुने लातूर अशी ओळख असलेल्या परिसरात, कालिकादेवीचे मंदिर वसले आहे. लातूरमधील त्वष्टा कासार समाजाने या मंदिराची स्थापना केली असल्याचे सांगण्यात येते. मंदिरास पेशवेकाळापासूनचा इतिहास असल्याचे सांगितले जाते. स्थान माहात्म्यानुसार, दुर्जनांच्या नाशासाठी येथे देवी प्रकट झाली व तिने लातूरकरांच्या रक्षणासाठी येथे वास्तव्य करण्याचे मान्य केले. त्यानंतर शतकानुशतके या मंदिरातील देवीने लातूर शहराचा अनेक आपत्तींत सांभाळ केल्याची लातूरकरांची श्रद्धा आहे. त्यामुळेच या देवीला लातूरच्या ग्रामदेवतेचा मान देण्यात आला आहे.
कासार समाज स्वतःला विश्वकर्मा यांचे पुत्र त्वष्टा ऋषींचे वंशज मानतो. प्राचीन काळी जेव्हा हे कारागीर धातूकाम करायचे, तेव्हा उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी ते कालिकादेवीची आराधना करीत. लातूर शहरावर जेव्हा जेव्हा नैसर्गिक संकटे किंवा परकीय आक्रमणे आली, तेव्हा देवीने एका अदृश्य शक्तीच्या रूपाने शहराचे रक्षण केले, अशी त्यांची श्रद्धा आहे.
मुळात, कालिका ही संहाराचे प्रतीक असून ती मोक्ष देणारीही देवता आहे. ती भक्तांच्या मनातील अहंकार, अज्ञान आणि वाईट विचारांचा नाश करते. तिची उपासना केल्याने शत्रूवर विजय मिळतो आणि भीतीपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. त्यामुळे शेकडो वर्षांपासून हे मंदिर लातूरकरांच्या श्रद्धेचे आणि शक्तीचे केंद्र राहिले आहे.
पौराणिक आख्यायिकांनुसार, कालिका हे महाकालीदेवीचे स्वरूप आहे. ‘कालिका पुराणा’मध्ये महामायेच्या कुशीतून कालिका देवीचा जन्म झाला असे म्हटले आहे. कालिका या शब्दाचा उगम संस्कृतमधील ‘काल’ या शब्दापासून झाला आहे. देवी कालिका ही काळावर नियंत्रण मिळवणारी आणि मृत्यूचे भय घालवणारी देवता मानली जाते. देवी कालिका प्रकट होण्यामागे काही आख्यायिका सांगितल्या जातात. सर्वात प्रसिद्ध आख्यायिका रक्तबीज नावाच्या राक्षसाशी संबंधित आहे. ‘दुर्गा सप्तशती’च्या आठव्या अध्यायानुसार, रक्तबीज हा एक शक्तिशाली राक्षस होता. त्याला शंकराकडून असे वरदान प्राप्त झाले होते की त्याच्या रक्ताचा थेंब जमिनीवर पडला तर त्यातून त्याच्यासारखाच दुसरा रक्तबीज राक्षस निर्माण होईल. त्यामुळे तो अजेय बनला होता.
त्याच्या दुराचारापासून देवगणांची सुटका करण्यासाठी देवी दुर्गेने कालिका अवतार धारण केला. रक्तबीजाशी लढताना त्याच्या रक्ताचा थेंब जमिनीवर पडू नये म्हणून कालिकादेवीने विशाल रूप धारण केले. रक्तबीजाचे रक्त जमिनीवर पडण्यापूर्वीच तिने प्राशन केले. अशा प्रकारे तिने या महाभयंकर असुराचा नायनाट केला.
लातूरमधील कालिकादेवी मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. लातूर शहर जेव्हा व्यापाराचे केंद्र म्हणून विकसित होत होते, त्याकाळी या मंदिराची स्थापना करण्यात आली होती. या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार झाला आहे. तसेच त्याची रचनाही काही प्रमाणात बदलत गेली आहे. या मंदिरातील कालिका माता भक्तांच्या हाकेला धावून जाते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. कठीण काळात देवीने भक्तांना दृष्टांत देऊन संकटातून मार्ग दाखवल्याच्या अनेक कथा जुने लातूरकर श्रद्धेने सांगतात.
मुख्य शहरात असलेल्या या मंदिराला विस्तृत परिसर लाभला आहे. मंदिराच्या वास्तूसाठी आधुनिक बांधकाम साहित्याचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे दिसते.
प्रथमदर्शनी मंदिराची रचना, मध्यभागी अर्धगोलाकार पत्र्याचे छत आणि दोन्ही बाजूंना स्वतंत्र इमारती असल्यासारखी दिसते. मंदिर वास्तूला असलेल्या मुख्य प्रवेशद्वारातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात समोरच जमिनीवर कासवमूर्ती आहे. मध्यभागी असलेले पत्र्याचे अर्धगोलाकार छत आणि बाजूचे सिमेंटचे बांधकाम मिळून सभामंडप बनला असल्याने तो प्रशस्त आहे. त्याला भरपूर खिडक्या आहेत. मंदिराच्या सभामंडपात नैसर्गिक प्रकाश भरपूर येतो. सभामंडपात समोर स्टेनलेस स्टीलच्या ग्रील्सचा वापर करून अंतराळाची रचना करण्यात आली आहे. या ठिकाणी देवीचे मुख्य गर्भगृह आणि डाव्या-उजव्या बाजूला दोन उपगर्भगृहे आहेत. मुख्य गर्भगृहासमोर देवीचे वाहन असलेल्या सिंहाची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या द्वारचौकटीच्या ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात वज्रपीठावर चांदीच्या पत्र्याने सजवलेल्या आणि पितळेचा कळस असलेल्या मखरात देवी विराजमान आहे. देवीच्या मागच्या बाजूला चांदीची महिरप आहे. देवीची मूर्ती काळ्या पाषाणात घडवण्यात आली आहे. देवीला मुकुट, कुंडल आणि गळ्यातील अनेक अलंकारांनी शृंगारले आहे.
देवीच्या उजव्या बाजूला असलेल्या उपगर्भगृहात विश्वकर्म्याची मूर्ती स्थापित आहे.
काळ्या पाषाणात कोरलेली ही मूर्ती पंचमुखी व दशभुजाधारी आहे. देवीच्या डाव्या बाजूला महादेवाचे स्थान आहे. येथे गर्भगृहात शिवपिंडी स्थापित आहे. त्याच ठिकाणी शंकराचा नागफणाधारी मुखवटाही ठेवलेला आहे. देवीच्या गर्भगृहावर तिहेरी शिखर रचना आहे. मधले शिखर उंच असून शेजारची दोन्ही शिखरे काहीशी कमी उंचीची आहेत. शिखरावर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती आहेत व त्यावर सुंदर कोरीवकामही आहे.
मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात. त्यापैकी शारदीय नवरात्रोत्सव हा येथील मोठा उत्सव आहे. या नऊ दिवसांत देवीची विशेष पूजा केली जाते. मंदिरात घटस्थापना आणि होम-हवन होते. ललिता पंचमी आणि महाष्टमी या दिवशी विशेष पूजा व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. विजयादशमीला देवीची भव्य पालखी निघते.
लातूर शहर आणि परिसरातील हजारो नागरिक या मिरवणुकीत सहभागी होतात. मंदिर वास्तूत धार्मिक कार्यक्रमांबरोबरच अनेक सामाजिक उपक्रमही राबवले जातात. दररोज सकाळी ९ वाजता आणि रात्री ८.३० वाजता देवीची आरती होते. भक्तांना सकाळी ६ ते ११ आणि सायंकाळी ४ ते ९ वाजेपर्यंत देवीचे दर्शन घेता येते.