प्राचीन काळी ‘ऋषिक’ नावाच्या प्रदेशात मोडणारे धुलिकापट्टन म्हणजेच आजचे धुळे गाव होय. जिल्ह्यात धनगर समाजाची संख्या लक्षणीय आहे. धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या धुळोबा देवाच्या नावावरून जिल्ह्याला धुळे नाव पडले असावे, असेही सांगितले जाते. धुळोबा हे शंकराचे रूप आहे. शैव व शाक्त पंथीय उपासना पद्धती एकमेकांस पूरक आहेत. त्यामुळेच शंकर–पार्वती एकत्र पुजले जातात. पार्वतीच्या अनेक रुपांपैकी एक रूप कालिका देवीचे आहे. या कालिका मातेचे धुळे तालुक्यातील असलेल्या शिरुड गावातील प्राचिन आणि जागृत देवस्थान प्रसिद्ध आहे. ही देवी या परिसरातील ५३ कुळांची कुलदेवी मानली जाते.
पौराणिक कथांनुसार, कालिका हे महाकालीदेवीचे स्वरूप आहे. ‘कालिका पुराणा’मध्ये महामायेच्या कुशीतून कालिका देवीचा जन्म झाला असे म्हटले आहे. महाभारतातील उल्लेखानुसार, कालिका ही दक्षप्रजापतीची कन्या व कश्यप ऋषींची पत्नी होय. ‘देवी माहात्म्या’त असे म्हटले आहे की मूळ प्रकृती आदिमाया भगवती महालक्ष्मीने तमोगुणांपासून महाकाली आणि सत्त्वगुणांपासून महासरस्वती ही दोन रूपे निर्माण केली. यानंतर महालक्ष्मीने महाकाली व महासरस्वती यांना आपापल्या गुणांचा योग्य अशा स्त्री–पुरुषांचा एकेक जोडा उत्पन्न करण्यास सांगितले. त्यातून पुढे विश्वाची व सृष्टीची निर्मिती झाली. अशा प्रकारे महाकाली ही जशी संहारिणी आहे, तशीच ती पोषिणीही आहे, असे मानले जाते.
शिरुड येथील कालिका मातेचे मंदिर बाराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. मंदिराची हेमाडपंती स्थापत्यशैली, नक्षीदार दगडी बांधकाम पाहून त्याची खात्री पटते. या मंदिराबाबतची एक आख्यायिका अशी की मंदिराच्या प्रांगणात असलेल्या विहिरीतून पूर्वी सोन्याची भांडी मिळत असत. येथे आलेले भाविक स्वयंपाक बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या भांड्यांची यादी लिहून या विहिरीत टाकत असत. त्या यादीप्रमाणे विहिरीच्या पाण्यातून सोन्याची भांडी वर येत असत. भाविक आपला स्वयंपाक करून झाल्यानंतर ती भांडी पुन्हा विहिरीत सोडत असत. एकदा एका भविकाच्या मनात लोभ निर्माण झाला व त्याने भांडी परत विहिरीत न टाकता तो ती घरी घेवून गेला. तेव्हापासून विहिरीतून भांडी येणे बंद झाले. अशाच प्रकारची आख्यायिका महाराष्ट्रातील तीन ठिकाणच्या मंदिरांबाबत सांगितली जाते. विशेष म्हणजे ही तिन्ही मंदिरे देवीची आहेत. यांतील एक मंदिर वाळणकोंडी (ता. महाड, जि. रायगड) येथील वरदायिनी मातेचे, तर दुसरे भाटवडे (ता. वाळवा, जि. सांगली) येथील चिलाई देवीचे आहे. वाळणकोंडी येथील तलावातून, तर भाटवडे येथील मंदिराच्या आवारातील विहिरीतून भाविकांना अशा प्रकारे भांडी मिळत असत. तिसरे मंदिर धामापूर (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील भगवती देवीचे आहे. येथील तलावातून दागिने मिळत, अशी आख्यायिका सांगण्यात येते.
बोरी आणि मणदूर नदीच्या संगमावर वसलेल्या या गावातील कालिका माता मंदिराची पहिली स्वागत कमान गावापासून सुमारे एक किलोमिटर अंतरावर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या गोलाकार स्तंभांवर सज्जा, त्यावर दोन्ही बाजूस व्याघ्र शिल्पे व मध्यभागी चंद्रकोरी कमानीवर कालिका देवीचे उठाव शिल्प आहे. दुसरी स्वागत कमान मंदिराच्या पहिल्या दगडी तटबंदीत आहे. येथून पुढे मंदिराची सुमारे बारा फूट उंचीची दुसरी आवारभिंत आहे. या भिंतीत असलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस नक्षीदार स्तंभ व द्वारशाखा आहेत. येथून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस तटबंदीला लागून चौथरे आहेत. या चौथऱ्यांवर तटबंदीच्या भिंतीस लागून स्तंभ व त्यावर हस्त आहेत. कधीकाळी येथे छत असलेली धर्मशाळा असावी, असे सांगितले जाते. सध्या या चौथऱ्यांवर धार्मिक विधी केले जातात. प्रांगणात मंदिरासमोर यज्ञकुंड आहे. पुढे चौथरा व त्यावर व्याघ्रमूर्ती आहे.
मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. तीन पायऱ्या व दोन स्तंभ असलेल्या मुखमंडपातून सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या बाह्य भिंतीस लागून काही पुरातन मूर्ती आहेत. सभामंडपात प्रत्येकी पाच नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. प्रवेशद्वारासमोरील एका स्तंभावर गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. स्तंभ पायाजवळ चौकोनी, वर षट्कोनी, अष्टकोनी व गोलाकार आहेत. शीर्षभागी कमळ फुलाची प्रतिकृती असलेल्या कणी व त्यावर नक्षीदार हस्त आहेत. हस्तांवर तुळई व त्यावर छत आहे. प्रत्येक तुळईवर कमळ फुलांची नक्षी आहे. सभामंडपात डाव्या बाजूला देवकोष्टकात गणपतीची शेंदूरचर्चित मूर्तीं आहे, तर उजवीकडील देवकोष्टकात देवीमुख आहे. सभामंडपातील छतात परिघाकडे अष्टकोनी व मध्यभागी वर्तुळाकार घुमट साकारलेले आहे. या घुमटात मध्यभागी सहा देह व एक मुख असलेले शिल्प कोरलेले आहे. या शिल्पाचे वैशिष्ट्य असे की एकच मुख या सहा शरिरांना जोडलेले आहे. हे षडरिपुचे प्रतिक आहे. एका मनास काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर असे सहा विकार बाधक ठरतात, असे या शिल्पातून सूचित केलेले आहे.
पुढे मंदिराच्या गर्भगृहाचे प्रवेशव्दार आहे. द्वारशाखांवर खालील बाजूस द्वारपाल व वर पानाफुलांची नक्षी आहे. ललाटबिंबावर गणेश विराजमान आहे. ललाटपट्टीवर पर्णलता नक्षी कोरलेली आहे. गर्भगृहात कालिका देवीच्या दोन मूर्ती आहेत. एक स्वयंभू पाषाणातील तांदळा स्वरूपातील व दुसरी काळ्या पाषाणातील कोरीव मूर्तीं आहे. काळ्या पाषाणातील चार फूट उंचीची ही मूर्ती नदीत सापडली होती, असे सांगितले जाते. या मंदिरावर शिखर अथवा कळस नाही. मंदिराच्या मागील बाजूस देवकोष्टकात स्थानिक देवतेची मूर्ती आहे. येथेच काही अंतरावर सुमारे साठ फूट खोली असलेली कुबेर विहीर आहे. याच विहिरीतून भांडी मिळत असत, अशी आख्यायिका सांगितली जाते.
दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, या विहिरीतून पारोळा गावापर्यंत भुयारी मार्ग आहे. या मार्गाने झाशीची राणी लक्ष्मीबाई या पारोळ्यातून येथे देवीच्या दर्शनासाठी येत असत. लक्ष्मीबाईंचे वडिल मोरोपंत तांबे हे मूळचे पारोळ्याचे असले, तरी ते पुढे काशीस गेले. काशी येथील अस्सीघाटावरील एका वाड्यामध्ये लक्ष्मीबाई उर्फ मनकर्णिका यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण ब्रह्मावर्तात गेले व विवाहानंतर त्या झाशी येथे गेल्या. पारोळ्यात त्यांचे वास्तव्य नसल्याने भुयारी मार्गाने त्या सुमारे ३५ किमी अंतरावरील कालिका मातेच्या मंदिरात येत असत ही केवळ दंतकथा असल्याचे सांगण्यात येते. या मंदिराच्या प्रांगणात एक शिवमंदीर आहे. त्यात नंदी व शिवपिंड आहे. मंदिरात नवरात्री, दसरा, दिवाळी आदी वार्षिक उत्सव साजरे केले जातात. फेब्रुवारी महिन्यात वार्षिक जत्रोत्सव साजरा केला जातो. ५३ कुळांची कुलदेवता असल्याने मंदिरात कुलाचारासाठी येणाऱ्या भाविकांची कायम वर्दळ असते. येथे देवीस गोड नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे.