जुन्या आग्रा रोडवर, मुंबई नाका परिसरात असलेले प्राचीन कालिका देवी मंदिर हे नाशिकच्या वैभवातील मानाचे पान समजले जाते. नाशिककरांचे ग्रामदैवत असलेले हे जगदंबेचे स्थान सुरुवातीला शहराबाहेरील दाट वनराईत स्थित होते, परंतु आता ते भर वस्तीत, शहरात आले आहे. हे स्थान अत्यंत जागृत असून ‘नवसाला पावणारी देवी’ म्हणून कालिका देवीची संपूर्ण जिल्ह्यात ख्याती आहे.
मुख्य रस्त्याला लागूनच असलेल्या नक्षीदार प्रवेशद्वारातून आत गेल्यावर प्रशस्त व सुंदर कालिका मंदिर पाहायला मिळते. मंदिरासमोर दीपस्तंभ असून मंदिर-प्रांगणात उद्यानही विकसित करण्यात आले आहे. मंदिराचा पहिला जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी १७०५च्या सुमारास केला होता.
त्यांनी बांधलेले दगडी मंदिर १० फूट लांब व १० फूट रुंद होते. मंदिराची उंची १५ फूट इतकी होती. त्या वेळी त्यांनी मंदिरासमोर बारव (पायऱ्या असलेली विहीर) बांधली असल्याची नोंद आहे. दुसरा जीर्णोद्धार १९७४ साली करण्यात आल्याने या मंदिराच्या रचनेला नवे, अर्वाचीन रूप प्राप्त झाले.
पूर्वाभिमुख असलेले हे मंदिर सभामंडप व गाभारा यांनी युक्त आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. सभामंडपात दर्शनासाठी रांगेची व्यवस्था करून भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यात येते. येथेच सिंहाची भलीमोठी पितळी मूर्ती आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात चांदीच्या मखरामध्ये डावीकडे वीणा घेतलेली महासरस्वती, मध्यभागी कालिका देवी व उजवीकडे महालक्ष्मी अशा क्रमाने मूर्ती स्थित आहेत. कालिका देवीची मूर्ती तीन फूट उंचीची असून ती एकाच पाषाणातून घडविण्यात आली आहे. लक्ष्मी आणि सरस्वती यांच्या मूर्ती काहीशा लहान आहेत. वैशिष्ट्य म्हणजे, येथे कालिका देवीची कुमारिकेच्या रूपातील मूर्ती आहे. या देवीच्या डोक्यावर नऊ फण्यांचा नाग व पायाखाली तीन राक्षसांची मुंडकी असून त्यांवर कालिका माता उभी आहे. तिच्या उजव्या हातांत त्रिशूल व तलवार, तर डाव्या हातांमध्ये डमरू व कमंडलू आहेत. मंदिराचा कळसही देखणा असून त्याची उंची ३० फूट आहे.
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दसरा, म्हणजेच नवरात्रात येथे देवीची मोठी यात्रा भरते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून, म्हणजेच लोकमान्य टिळकांच्या स्वराज्याच्या चळवळीपासून नवरात्रोत्सवात येथे यात्रा भरू लागली. ही यात्रा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या दिवसांत कालिका मातेला रोज मध्यरात्री दोन ते पहाटे चार या वेळेत गुलाबपाणी, पंचामृत, शुद्ध पाणी यांनी अभिषेक करून साजशृंगार केला जातो. कारण नवरात्रोत्सवात दररोज सकाळी चार वाजल्यापासून येथे भाविकांची गर्दी होते. त्यांना रांगेत ताटकळत राहायला लागू नये, याकरिता मध्यरात्री दोन ते चार या वेळेत पूजा करून घेऊन मग भाविकांसाठी दर्शन सुरू केले जाते.
नवरात्रात रोज सकाळी ६ वाजता व सायंकाळी ७ वाजता शहरातील मान्यवरांच्या हस्ते देवीची पूजा व आरती या दोन्ही गोष्टी केल्या जातात. रांगेत उभे राहणे शक्य नसलेल्या भाविकांसाठी विश्वस्त मंडळातर्फे देवीच्या मुखदर्शनाची खास व्यवस्था करण्यात येते. त्याच वेळी भक्तांना घरबसल्या देवीचे दर्शन व्हावे, यासाठी स्थानिक केबल वाहिन्यांवरून यात्रेचे थेट प्रक्षेपणही करण्यात येते. यात्रा काळात येथे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेची योग्य काळजी घेण्यात येत असून मंदिर समितीतर्फे त्यांचा विमाही उतरवला जातो, जेणेकरून मंदिराच्या प्रांगणात अनपेक्षित घटना घडल्यास योग्य ती कार्यवाही त्वरित करण्यास मदत होऊ शकेल.
राज्य शासनाच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत कालिका माता मंदिर-परिसरात सुसज्ज भक्तनिवास उभारण्यात आले आहेत. या भक्तनिवासांत अल्प दरात निवासाची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय येथे येणाऱ्या भाविकांसाठी सकाळी ११ ते दुपारी ३ व सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत, अल्प दरात महाप्रसादाची सुविधा उपलब्ध आहे.