
काळभैरव म्हणजे भगवान शंकराचे उग्र आणि भीषण रूप. हिंदू धर्मात अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या काशीचा कोतवाल म्हणून काळभैरव ओळखला जातो. हे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक घराण्यांचे आराध्यदैवत आहे. अंकोली या शांत आणि निसर्गरम्य गावातील काळभैरवाचे स्थान अत्यंत जागृत मानले जाते. राज्याच्या विविध भागांतून भाविक येथे दर्शनासाठी येतात. विशेषतः नवविवाहित जोडपी कुळधर्म कुळाचार म्हणून येथील काळभैरवाचे दर्शन घेऊन वैवाहिक जीवनाची सुरूवात करतात. या काळभैरवास केलेला नवस फलद्रूप होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
काळभैरव हा तांत्रिक देवता व शैव आगमांनी वर्णन केलेल्या अष्टभैरवांपैकी एक मानला जातो. कोशकारांनुसार भैरव याचा अर्थ भीषण असा आहे. त्याचा एक अर्थ भयापासून रक्षण करणारा असाही असल्याचे सांगण्यात येते. पापभक्षण, आमर्दक, काळराज ही काळभैरवाची अन्य नावे आहेत. काळभैरवाविषयी पौराणिक कथा अशी की शंकराच्या क्रोधातून मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीस काळभैरवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाने केलेल्या अपमानाने संतापलेल्या शंकराच्या क्रोधाग्नीतून काळ्या रंगाचा भैरव जन्मला व त्याने ब्रह्माचे शिवनिंदा करणारे मस्तक तोडले. मात्र त्याच्या हातून हे ब्रह्महत्येचे पाप झाले. सर्व तीर्थांना जाऊनही त्याचे पापक्षालन झाले नाही. अखेरीस काशी येथे त्याला पापमुक्ती मिळाली आणि त्याने ब्रह्माचे मस्तक तेथे ठेवले. कालभैरवाने ब्रह्माचे मस्तक जेथे ठेवले त्या स्थानास कपालमोचनतीर्थ म्हणतात.
कालिकापुराणातील कथेनुसार, पार्वतीच्या शापाने महाकाल हा गण भैरवाच्या रूपाने जन्मला. त्याचा जन्म रात्रीच्या चौथ्या प्रहरी झाला. काळभैरवाबद्दल आणखी एक आख्यायिका अशी की भैरवाने जन्मतः सर्व देवांचे दमन केले. त्यामुळे शंकराने त्यास दमनक वृक्ष (दवणा, आर्टेमिसिआ निलॅगिरिका)
होण्याचा शाप दिला. शिवाने असा उःशापही दिला की या वृक्षाची पूजा केल्याखेरीज देवांच्या पूजेचे फळ मिळणार नाही. काळभैरव हा भक्तांना संकटातून वाचवतो आणि नवसाला पावतो, अशी श्रद्धा आहे. काळभैरवाचे येथील मंदिराच्या उभारणीचा ठोस इतिहास अनुपलब्ध आहे. परंतु येथे असलेली देवाची पालखी ही सातशे वर्षांपूर्वीची आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे हे देवस्थान त्यापूर्वीचे असू शकते. इस १९७१ मध्ये सागवानी लाकडांचा वापर करून ग्रामस्थांनी मंदिराच्या प्रशस्त मंडपाचा जीर्णोद्धार केला होता.
अंकोली हे गाव मोहोळ–मंगळवेढा मार्गावर आहे. आवारभिंतीमधील महाद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. दगडी फरसबंदी असलेल्या प्रांगणाच्या चारही बाजूंनी ओवऱ्या आहेत. त्यांचा उपयोग भाविकांना निवारा, स्वयंपाक करणे तसेच धार्मिक कामांसाठी होतो. प्रवेशद्वाराजवळ असलेल्या डावीकडील एका ओवरीमध्ये गोरक्षनाथांची धुनी व त्याशेजारी त्यांची मूर्ती आहे. प्रांगणात एक चौकोनी विहीर व दोन दीपमाळा आहेत. या विहिरीतील
पाण्याचे महत्त्व हे काशीच्या गंगेइतके आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मोठा मंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. येथील मंडप हा नंतरच्या काळात मंदिरासमोर बांधल्याचे जाणवते. मंडपातील एका देवळीत घोड्यावर आसनस्थ असलेल्या भैरवनाथ आणि जोगेश्वरी देवी यांच्या मूर्ती आहेत. मंडपात अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती व त्यापुढे कासव मूर्ती आहे. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना चौथरे आहेत. या प्रवेशद्वारावर द्वारपालांची चित्रे आहेत. ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती व त्यावरील भागात काही उठावशिल्पे आहेत. सभामंडपात चार दगडी स्तंभ आहेत. मुख्य गर्भगृहाशिवाय सभामंडपाला लागून डाव्या व उजव्या बाजूला दोन उपगर्भगृहे आहेत.
मुख्य गर्भगृहात काळभैरव नाथाचे स्वयंभू लिंग आहे. त्यावर चांदीचा सुंदर मुखवटा आहे. केवळ सकाळच्या पुजेच्या वेळीच या मुखवट्याखालील काळभैरवाच्या लिंगाचे दर्शन घेता येते. या गर्भगृहात केवळ काळभैरवाचेच स्थान आहे. त्याबाबत अख्यायिका अशी की एकदा काळभैरव व जोगेश्वरी देवी यांच्यात वाद झाला. त्यामुळे जोगेश्वरी देवी रुसून येथून साधारणतः दीड किमी अंतरावर, गावाच्या पूर्व दिशेला आडरानात, ओसाड जागेवर गेली व तेथेच थांबली. आजही तेथे जोगेश्वरी देवीचे मंदिर आहे.
गर्भगृहात मागील भिंतीच्या उजवीकडील कोपऱ्यात जोगेश्वरी मातेची पंचधातूची एक उभी मूर्ती आहे, परंतु ही केवळ उत्सवमूर्ती आहे. उत्सवाच्या काळात वा पालखीच्या वेळी या मूर्तीचा वापर केला जातो. मंदिराच्या बाह्य भिंतीवर काही कामशिल्पे कोरलेली आहेत. या मंदिराच्या शिखरावरील खालच्या थरावर गाय, हत्ती व सिंह यांसारखी शिल्पे कोरलेली आहेत. त्यावरील स्तरांमध्ये असलेल्या देवकोष्टकांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या अग्रभागी आमलक व कळस आहे.
हनुमान जयंतीनंतर येणाऱ्या अष्टमीपासून येथे तीन दिवसांची मोठी यात्रा असते. या यात्रेचे वैशिष्ट्य असे की ही यात्रा सलग तीन रात्री व तीन दिवस (७२ तास) असते. या तीन दिवसांच्या काळात एकदाही मंदिराचे दरवाजे बंद केले जात नाहीत. या यात्रेदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्रिपुरारी पौर्णिमेला येथे पाच हजार दिव्यांची आरास केली जाते.