बारामती तालुक्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या लोणी-भापकर या गावात काळभैरवनाथाचे प्रसिद्ध मंदिर आहे. पेशव्यांचे सरदार सोनाजी गुरखोजी भापकर यांना हे गाव इनाम मिळाले होते. श्री काळभैरवनाथ या गावाचे ग्रामदैवत. या देवाची यात्रा तालुक्यात विशेष प्रसिद्ध आहे. या यात्रेच्यावेळी पंचक्रोशीतील अनेक भाविक दंडवत घालत मंदिरात दर्शनासाठी येतात.
काळभैरवनाथाचे मंदिर बाराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. मंदिराची रचना पाहिल्यावर त्याचे प्राचीनत्व लक्षात येते. भव्य तटबंदी असलेल्या या मंदिराच्या आवारात दोन भव्य दीपमाळा व रेखीव पुष्करणी आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच उजव्या बाजूला उंच मनोऱ्यावर एक भलीमोठी घंटा लटकवलेली दिसते. पोर्तुगीजांचा पराभव करून मराठ्यांनी ती घंटा हस्तगत केली आणि मंदिराला अर्पण केली, असे सांगण्यात येते. हे मंदिर संपूर्ण दगडी बांधकामाचे आणि हेमाडपंथी आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या वर नगारखाना आहे. त्यामध्ये मराठेशाहीतील चित्रकला पाहता येते. गाभाऱ्यातील काळभैरवनाथ-जोगेश्वरीची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. सभामंडप, मुखमंडप व गर्भगृह, अशी मंदिराची रचना आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर प्राचीन कालखंडातील शिल्पे कोरलेली आहेत. तसेच येथील खांबांवरही कलाकुसर आहे. गाभाऱ्यातील काळभैरवनाथ व जोगेश्वरीच्या मूर्तीची सरदार भापकर यांनीच प्रतिष्ठापना केली होती, अशा नोंदी आहेत.
सभामंडपाच्या भिंतींवर पेशवे काळातील चित्रे, प्राण्यांची शिकार करतानाची शिल्पे, तसेच वादक, नर्तक, पहारेकरी आदीही साकारण्यात आले आहेत. या मंदिरात असलेल्या ताम्रपटावर मंदिराच्या बांधकामासंदर्भात उल्लेख होता; परंतु त्यातील अक्षरे पुसट झाल्यामुळे त्यावरून काही बोध होत नाही. मंदिराच्या कळसावरही विविध देवी-देवतांची शिल्पे रंगवलेली आहेत. मुख्य कळसाच्या चार बाजूंना चार मिनार आहेत.
चैत्र वद्य अष्टमीला येथे पाच दिवसांची यात्रा असते. पहिल्या दिवशी देवाला हळद लावण्याचा कार्यक्रम असतो. दुसऱ्या दिवशी काळभैरवनाथ व जोगेश्वरी देवी यांचा विवाह सोहळा असतो. या विवाह सोहळ्यासाठी ढोल-ताशांच्या गजरात आणि सनई,तुतारीच्या निनादात पंचक्रोशीतून भैरवनाथाच्या काठ्या मंदिर परिसरात दाखल होतात. या काठ्यांना नारळ-तोरणांच्या माळा घालण्यात येतात. यावेळी देवांना पोशाख करण्याची पद्धत आहे. चौथ्या दिवशीचा छबिना उत्सव हा वैशिष्ट्यूर्ण असतो. पाचव्या दिवशी कुस्त्यांचे सामने असतात. त्यानंतर पालखी झाल्यावर यात्रेचा समारोप होतो. या यात्रा कालावधीत साधारणतः २५ ते ३० हजार नागरिक दर्शनासाठी मंदिरात येतात. याशिवाय नाथ जन्माष्टमी हा कार्यक्रम येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्या निमित्ताने सात दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्यात ज्ञानेश्वरी पारायण, भजन व कीर्तनासारखे कार्यक्रम होतात. सातव्या दिवशी संपूर्ण गावाला महाप्रसादाचे वाटप करण्यात येते.
खासगी मालकीच्या असलेल्या या मंदिराची मालकी सध्या रवींद्र भापकर यांच्याकडे आहे. अनेक पिढ्यांपासून भापकर घराण्याकडेच ही मालकी आहे. मंदिरापासून जवळच भापकर यांचा अर्ध्या एकरवर असणारा प्राचीन वाडा इतिहासाची साक्ष देतो. दररोज सकाळी ६ वाजता काळभैरवनाथाची आरती होते. साधारणतः सकाळी ५ ते सायंकाळी ८ पर्यंत या मंदिरात जाऊन भाविकांना दर्शन घेता येते.