काळाराम मंदिर पंचवटी

नाशिक, जि. नाशिक


नाशिकमधील श्री क्षेत्र पंचवटी म्हणजे साक्षात प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थळ! पाच वटवृक्षांच्या विस्तारातून निर्माण झालेला हा परिसर असल्याने त्यास ‘पंचवटी’ असे नाव पडले. याच ठिकाणी श्रीरामचंद्रांनी सुमारे दोन वर्षे वास्तव्य केले असल्याचे रामायणाच्या अभ्यासकांचे मत आहे. असे म्हणतात की, ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी पर्णकुटी बांधून निवास केला होता, त्या ठिकाणी पुढे एक विशाल मंदिर उभारण्यात आले. तेच हे काळाराम मंदिर!

मंदिराच्या नावाबद्दल आख्यायिका अशी की वनवास पर्वात सीता आणि लक्ष्मण यांसह प्रभू श्रीराम येथे राहत असताना रावणाची बहीण शूर्पणखा येथे आली. त्या वेळी लक्ष्मणाने तिचे नाक आणि कान कापले. त्यानंतर १४ हजार राक्षस राम-लक्ष्मणांवर हल्ला करण्यासाठी आले. त्या सर्वांचा रामाने वध केला. या युद्धात रामाने विराट व कालस्वरूप रूप धारण केले. ‘कालस्वरूप’ म्हणून ‘श्री काळाराम’ असे नाव प्रसिद्ध झाले. काळ्या पाषाणातील या मंदिराच्या बांधकामाचा इतिहासही मोठा आहे. पूर्वी येथे लाकडी मंदिर होते. १३ व्या शतकात श्री चक्रधरस्वामी या मंदिरात दर्शनासाठी आल्याचा उल्लेख लीळाचरित्रात आहे. तसेच संत एकनाथ महाराजही (१५९९) मंदिरात श्रीरामाच्या दर्शनाला आले होते. समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात श्रीरामाची उपासना केली होती. संत श्री गजानन महाराज यांना या मंदिरातच श्री रामप्रभूंचा साक्षात्कार झाल्याचे भाविक सांगतात. या जुन्या, लाकडी मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांच्या काळात झाला.

बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांच्या पत्नी गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी इ.स. १७७८-१७९०दरम्यान मंदिराचा जीर्णोद्धर केला. या मंदिराचे बांधकाम नागर शैलीतील असून त्याकरिता पूर्णतः काळ्या पाषाणाचा वापर करण्यात आला आहे. नाशिकपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘रामशेज’ नावाच्या डोंगरावरून हे पाषाण आणण्यात आले. या डोंगरावर श्रीराम रात्री निद्रा घेण्यासाठी जात असत, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

दोन हजार कारागिरांनी, वास्तुशिल्पींनी तब्बल १२ वर्षे राबून या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. त्याकरिता त्या काळात २३ लाख रुपये खर्च आला. हे मंदिर २४५ फूट लांब आणि १४५ फूट रुंद असून त्याची कळसापर्यंतची उंची ६९ फूट आहे. त्र्यंबकेश्वरच्या आद्य ज्योतिर्लिंग मंदिराच्या रचनेप्रमाणेच काळाराम मंदिराचीही रचना आहे. मंदिराच्या शिखरावर सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे.

चारही बाजूंनी चार तटांनी वेढलेल्या या मंदिराच्या पूर्व दिशेला कमानी द्वार आहे. तेथून आत गेल्यानंतर पुढे मंदिराचे आवार असून, ते कमानी आणि खांबांनी सुशोभित करण्यात आले आहे. तेथून गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तींचे दर्शन होते. संपूर्ण काळ्या पाषाणातील या मूर्ती दोन फूट उंचीच्या आहेत. या मूर्ती वनवासात असलेल्या देवतांच्या असल्याने वल्कले परिधान केलेल्या रूपात दिसतात.

अशी आख्यायिका आहे की, मंदिराच्या ठिकाणी पूर्वी काही नागपंथीय साधू राहत असत. त्यांना गोदावरीच्या पात्रात राम-लक्ष्मण-सीता यांच्या स्वयंभू मूर्ती ठरावीक अंतराने सापडल्या. राममूर्ती सापडली ते रामकुंड, लक्ष्मणाची मूर्ती सापडली ते लक्ष्मणकुंड; सीतेची मूर्ती सापडली ते सीताकुंड म्हणून ओळखले जाते.

येथे गुढीपाडवा ते द्वादशीपर्यंत श्रीराम जन्मोत्सव उत्साहाने आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा होतो. पाडव्याच्या दिवशी सकाळी ९ ते १० मंगल आरती होते. वंशपरंपरागत पूजाधिकारी पुजारी परिवाराचे मानकरी बुवा, सालकरी बुवा यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत् पूजा होते. देवांना मंगलस्नान घालून भरजरी पोशाख चढविण्यात येतो, तसेच अलंकृत केले जाते; मूर्तींना पुष्पशृंगार केला जातो.


चैत्र शुद्ध एकादशीस श्रीरामाची रथायात्रा काढण्यात येते. येथे नृसिंह जयंती, गणेशोत्सव, श्रीकृष्ण जयंती असे सगळेच सण उत्साहात साजरे होतात. दीपावलीत गोवत्स द्वादशीपासून (वसुबारस) कार्तिकी पौर्णिमेपर्यंत मंदिरावर रोषणाई करण्यात येते. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे सर्व देवांना अभ्यंगस्नान घातले जाते.

या मंदिरात पूर्वी दलितांना प्रवेश दिला जात नसे. २ मार्च १९३० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली येथे मंदिर-प्रवेश सत्याग्रह करण्यात आला. ‘काळाराम मंदिर-प्रवेश सत्याग्रह’ म्हणून या घटनेची इतिसात नोंद आहे. गोदावरी नदीच्या घाटापासून हे मंदिर जवळच आहे.

उपयुक्त माहिती:

  •  नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील मंदिर
  • एसटी तसेच महापालिका परिवहन बसची सुविधा
  •  राज्यातील अनेक भागांतून एसटी, रेल्वे सेवा
  • खासगी वाहनाने मंदिरापर्यंत जाता येते.
  • परिसरात निवास व खानपानाचे अनेक पर्याय
Back To Home