माहुरच्या रेणुका मातेचे रूप असलेल्या कालंकादेवीचे प्राचीन मंदिर अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी येथे वसले आहे. प्राचीन काळी तेकल्ली वा टंकावती नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बार्शी टाकळी येथील हे हेमांडपंती स्थापत्यशैलीचे मंदिर बाराव्या शतकात, यादव राजवंशाच्या राजवटीदरम्यान उभारण्यात आले. प्राचीन भारतीय स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या वास्तूवर आकर्षक नक्षीकाम असून येथे अनेक शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. बार्शी टाकळीची मातृग्रामदेवता असलेल्या कालंकामातेच्या दर्शनासाठी जिल्ह्याच्या विविध भागांतील भाविकही मोठ्या संख्येने येतात.
काळ्या बेल्साट पाषाणात घडवलेले हे मंदिर ११७७ मध्ये उभारण्यात आल्याचा अंदाज येथील भिंतीवरील शिलालेखावरून बांधता येतो. संस्कृत व नागरी लिपित कोरलेल्या या शिलालेखाचा बराच भाग आता नष्ट झाला आहे. या शिलालेखावर ‘गुरुवार वैशाख शुक्ल ७, दुर्मुख संवत्सर शके १०९८ (७ एप्रिल ११७७)’ अशी मिती व वर्ष कोरलेले आहे. या शिलालेखानुसार, या नगरीचे प्राचीन नाव ‘तेकल्ली’ असे होते. त्याचाच अपभ्रंश पुढे ‘टाकळी’ असा झाला.
देवगिरीच्या यादवांचा मांडलिक राजा हेमाद्रीदेव याच्या राजधानीचे हे शहर होते. हेमाद्रीदेवाच्या राजवंशाच्या मूळपुरुषाचे नाव दंतुराज असे होते. हेमाद्रीदेव याने राजधानी टेक्कलीवर आक्रमण करणारा कलचुरी राजा मालुगी याचा पुत्र व खान्देशचा राजा राजल याचा पराभव केला.
हेमाद्रीदेव याने आपल्या सत्कृत्याने तेक्कली या आपल्या राजधानीस काशीचे पावित्र्य प्राप्त करून दिल्याचा उल्लेख या शिलालेखात आहे. या लेखात पुढे वंशपरंपरेने मंत्रीपद भोगणाऱ्या भिल्लम या वालभ्य गोत्रीय मंत्र्याची वंशावळही कोरण्यात आली आहे. या घराण्यातील गामियाय (गामयाज) याने टेक्कली येथे विष्णूमंदिर उभारले, तसेच लोककल्याणासाठी परिसरात विहिरी व तळे बांधल्याचा उल्लेखही त्यात आहे. ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर’च्या ‘अकोला डिस्ट्रिक्ट व्हॉल्यूम ए’ (१९१०)मध्ये, कालंकादेवीच्या या मंदिराचा उल्लेख भवानी मंदिर असा करण्यात आलेला आहे. ‘अकोला डिस्ट्रिक्ट गॅझेटियर’च्या १९७७च्या सुधारित आवृत्तीत असे म्हटले आहे, की ‘हे (म्हणजे विष्णूचे) मंदिर आता भवानी मंदिर म्हणून ओळखले जाते. मात्र त्यात कोणत्याही देव-देवतेची मूर्ती नाही. हे मंदिर मूळचे विष्णूमंदिर असावे.’ या मंदिरात कालंका देवीची प्रतिष्ठापना कशी झाली, याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. मात्र, दानवांबरोबर झालेल्या युद्धानंतर रेणुकामातेने विश्रांतीसाठी या ठिकाणाची निवड केली. तेव्हापासून ही देवी येथे स्थायिक झाली. ही देवी कालांतराने कालंकादेवी म्हणून प्रसिद्ध झाली, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे.
मंदिरातील देवीचे तोंड मागच्या दिशेला आहे. याच्या स्पष्टीकरणासाठी अशी कथा सांगण्यात येते की येथील मुघल सैनिक देवीची पूजा-अर्चा करून देत नसत. तरीही एके दिवशी ग्रामस्थांनी मोठ्या धाडसाने देवीला नैवद्य दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुघल सैनिकांनी नैवद्याच्या ताटात मांसाचे तुकडे टाकले. हे ताट देवीसमोर आल्यावर तिने तोंड मागे केले. त्यामुळे आजही देवीचे तोंड मागील दिशेला असल्याचे सांगण्यात येते. पूर्वी या परिसराची जहागिरी काझी नावाच्या सरदाराकडे होती. त्याच्या अखत्यारीत या मंदिराची देखभाल होत असे.
त्याचे वंशज या परिसरातील मोडकळीस आलेल्या किल्ल्यात आजही वास्तव्यास आहेत.
शहराच्या वेशीवर असलेल्या या मंदिराचा परिसर शांत व प्रसन्न आहे. या मंदिर परिसराला जाळीदार कुंपण आहे. या कुंपणातील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणातील उद्यानातून मंदिरापर्यंत येण्यासाठी मार्गिका आहे. या मार्गिकेच्या दोन्ही बाजूंना फुलझाडे लावण्यात आली आहेत. मंदिरासमोर यज्ञकुंड आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. आठ पायऱ्या चढून उंच अधिष्ठानावर असलेल्या या मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना प्राचीन गजराज शिल्पे आहेत. आयताकृती सभामंडपात नखशिखांत शिल्पकाम असलेले सुंदर स्तंभ आहेत. या स्तंभांवर गणेश, महाकाली, महिषासूरमर्दिनीसह विविध देव-देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. स्तंभांच्या छताकडील भागात भारवाहक यक्ष कोरलेले आहेत. सभामंडपातील प्रवेशद्वाराकडील भिंतींमध्ये कक्षासने व त्यासमोरील बाजूस असलेल्या भिंतींमध्ये देवकोष्टके आहेत. सभामंडपात चार स्तंभांच्या मध्यभागी शेंदूरचर्चित नंदीची मूर्ती आहे.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखा शिल्पांकित आहेत. द्वारशाखांच्या खालील बाजूला द्वारपाल शिल्पे व उत्तरांगावर नक्षीदार तोरण आहे. गर्भगृहात एका पाषाणी वज्रपिठावर देवीच्या शेंदुरचर्चित तांदळा स्वरूपातील दोन मूर्ती आहेत. या मूर्तींच्या समोरील बाजूला प्राचीन शिवपिंडी आहे. या मंदिराच्या भिंतींमध्ये असलेल्या गवाक्षातून सकाळी सूर्याची किरणे थेट गर्भगृहात पडतात. मंदिराच्या बाह्य भिंतींवरही शेकडो शिल्पे आहेत. त्यापैकी काही मैथुन शिल्पेही आहेत.
या मंदिरात अकोला जिल्ह्याच्या विविध भागांतील भाविक दर्शनासाठी येतात. मंगळवारी तसेच शुक्रवारी भाविकांची संख्या अधिक असते. शारदीय नवरात्रोत्सव येथे उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवादरम्यान येथे देवीचा वास असतो, अशी श्रद्धा असल्याने येथे नऊही दिवस भाविकांची गर्दी असते. हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असल्यामुळे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भाविकांना येथील देवीचे दर्शन घेता येते. या वास्तूला १९५८ मध्ये संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.