
शेती व पशुपालन हे ग्रामीण भागातील समाजाच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. डोंगर, झाडे, नदी, पशू व पक्षांना पूजनीय मानणाऱ्या या समाजात गणपती, महादेव व पार्वती या मुख्य देवतांसोबत वाघोबा, झोटिंग, चेडोबा, नागोबा, बहिरीदेव, चंद्र–सूर्य, गवळीदेव, गावदेवी आदींनाही देवत्व बहाल करून त्यांना पुजले जाते. असेच एक प्राचीन व प्रसिद्ध काळमदेवाचे मंदिर नंदुरबार तालुक्यातील एचाळे गावातील डोंगरावर आहे. मार्गशीर्ष महिन्यात तीन दिवस भरणारी या देवाची यात्रा प्रसिद्ध आहे. नंदुरबारसह शेजारी असलेल्या गुजरात व मध्यप्रदेशातील भाविकही यावेळी येथे दर्शनासाठी येतात.
मंदिराची अख्यायिका अशी की आदिदेव महादेवाने मंत्र व सामर्थ्याने काळमदेव, चांगलखुलतान, पुनपाच्या, वानराशी व धुरकाटा या पाच देवांची निर्मिती केली आणि त्यांना पृथ्वीवर पाच ठिकाणी राहण्यास सांगितले. त्यापैकी काळमदेव म्हणजेच काळा महादेव हे नंदुरबार तालुक्यातील एचाळे गावाजवळील वृजामाळ डोंगरावर वास्तव्यास आले. देव येथे आले आहेत, असे समजल्याने देवाचे भक्त पावबा येथे येऊन देवाची पूजाअर्चा करू लागले. एक दिवशी देवाने पावबास या ठिकाणी मंदिर बांधण्याचा आदेश दिला. आपण धनहीन असल्याने मंदिर बांधण्यास असमर्थ आहोत, असे पावबाने देवास सांगितले. तेव्हा मंदिर बांधण्यासाठी लागणारे धन तुला डोंगरातील दगडांखाली मिळेल, असे देवाने सांगितले. या पावबाने मजुरांच्या साह्याने तेथे शोध घेतला असता त्याला पुरेसे धन सापडले. त्यानंतर त्याने या मंदिराचे बांधकाम सुरू केले.
काळमदेवाचे प्राचीन मंदिर उंच डोंगरावर आहे. डोंगराच्या पायथ्यापर्यंत असलेल्या रस्त्यापर्यंत वाहनाने येता येते. या पायथ्याजवळ मंदिराचे प्रशासकीय भवन आहे. यात्रेदरम्यान व इतरवेळीही भाविकांसाठी येथे
सोयीसुविधा पुरविल्या जातात. येथून कच्चा रस्ता व १०५ पायऱ्या चढून डोंगरमाचीवरील मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात दोन्ही बाजूस लोखंडी नळ्यांचे सुरक्षा कठडे लावलेले आहेत. येथून पुढे दोन बाजूला भिंती व त्यावर छत असलेला सभामंडप आहे. हा सभामंडप अलीकडील काळात बांधलेला आहे व त्याच्या भिंतींना खिडक्या आहेत.
पुढे मंदिराचे लहानसे गर्भगृह आहे. देवस्थान खुप प्राचीन असले तरी मंदिराचे बांधकाम अत्यंत साध्या पद्धतीचे आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर नारळ वाढवण्यासाठीचा पाषाण व दर्शनी भिंतीत दीपकोष्टके आहेत. गर्भगृहात काळमदेवाची शेंदुरचर्चित स्वयंभू पाषाण मूर्तीं आहे. देवाच्या सर्वांगावर चलनी नाणी व नोटा चिटकवलेल्या असतात. मूर्तीच्या दोन्ही बाजूस प्राचीन पाषाणी दिवे आहेत व ते सतत प्रज्वलित असतात. गर्भगृहाच्या भिंतींत डाव्या व उजव्या बाजूला प्रत्येकी दोन दीपकोष्टके आहेत. गर्भगृहातून बाहेर पडण्यासाठी उजव्या बाजूला प्रवेशद्वार आहे. गर्भगृहाच्या छतावर घुमटाकार शिखर व त्यावर कळस आहे.
मंदिराच्या मागील बाजूस काही अंतरावर डोंगर कड्यात अरुंद गुहा आहे. या गुहेच्या मुखाजवळील पाषाणांना शेंदूर लावलेला आहे. या ठिकाणी भाविकांनी तयार करून आणलेला शिऱ्याचा प्रसाद वाहिला जातो. या प्रसादाला कढई असे संबोधले जाते. वृक्षाच्या पानावर शिरा ठेवून, त्यावर फुल ठेवून ते पान देवापुढे ठेवण्याची प्रथा आहे.
मार्गशीर्ष शुद्ध पंचमी, ज्याला आदिवासी समाजात नागपंचमी अथवा नाग दिवाळी म्हणून संबोधले जाते, या दिवसापासून तीन दिवसांचा वार्षिक जत्रोत्सव येथे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांतूनही हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. यावेळी देवास नारळ, कढई म्हणजे रव्याचा शिरा तसेच कोंबडे व बकरे अर्पण केले जातात. ढोल ताशांच्या गजरात देवऋषींचे नृत्य व देवाची स्तुती करून आपल्या कुळ–कबिल्याच्या कल्याणाची गाणी गायली जातात. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेदरम्यान परिसरात खाद्य पदार्थ, घरगुती वापराच्या वस्तू व उपकरणे, कृषी अवजारे, कपडे अशा विविध वस्तूंची दुकाने सजून परिसरास बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त होते.