
कौंडिण्यपूर म्हणून उल्लेख असलेल्या कुंडल गावाचा इतिहास सुमारे १५०० वर्षे प्राचीन आहे. ऐतिहासिक उल्लेखांनुसार चालुक्यवंशीय राजा सत्येश्वराच्या राजधानीचे हे ठिकाण होते. जैन धर्मात कुंडलला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. येथील डोंगरावर भगवान पार्श्वनाथ, तसेच वर्धमान महावीर यांनी धर्मसभा घेतली होती. राजा विजयादित्याने इ.स. ७०५ मध्ये कुंडल जिनालयाला दान दिले होते. याच कुंडलमधील काळा महादेव म्हणजेच कपिलेश्वर मंदिर हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पाचशे ते सहाशे वर्षे प्राचीन असलेले हे मंदिर काळ्या दगडांत उभारले असल्याने ते काळा महादेव म्हणूनच जास्त प्रसिद्ध आहे.
असे सांगितले जाते की कुंडलच्या पश्चिम दिशेला असलेले डोंगर हे कुंडलाकार म्हणजे गोलाकार आहेत. या डोंगराच्या कुशीत असल्यामुळे या नगराला कुंडल असे ओळखले जाऊ लगले. कृष्णा नदीने सुजलाम सुफलाम केलेल्या कुंडलचा इतिहास वैभवशाली आहे. प्राचीन काळी कुंडल ही
सर्वांगिण प्रगती झालेली नगरी होती. ती ज्या कुंतल राष्ट्राची राजधानी होती त्यावर चालुक्य, राष्ट्रकुट आणि कदंब घराण्यांनी राज्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भाग होण्याचे भाग्यही या प्रदेशाला लाभले. या साऱ्या संपन्न राजवटींच्या पाऊलखुणा कुंडल परिसरात ठिकठिकाणी दिसतात. वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम आणि रचना असलेले हे मंदिर त्या संपन्नतेचाच एक भाग आहे.
कुंडल गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी हे मंदिर आहे. मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीच्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रवेशद्वाराजवळ आतील बाजूला एक मोठा पिंपळवृक्ष आहे. या वृक्षाला मोठा पार बांधलेला आहे व त्यावर अखंड दगडात कोरलेले मोठे नागशिल्प आहे. त्यापुढे असलेले मुख्य मंदिर उंच जगतीवर आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या द्वारशाखेवर दोन कलाकुसर केलेले स्तंभ व वरील बाजूस तीन शिखराकृती आहेत. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या बंदिस्त सभामंडपात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराजवळ
आतील बाजूला अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती व त्यापुढे कासवमूर्ती आहे. सभामंडपातील कलाकुसर केलेल्या दगडी स्तंभांवर तुळया व त्यावर मंदिराचे छत आहे. येथील भिंतींवर असलेल्या देवकोष्टकांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. त्यामध्ये विठ्ठल–रुख्मिणी, गणपती आणि हनुमान या मूर्तींचा समावेश आहे. बारकाईने पाहिल्यास या मूर्तींवर नाजूक असे कोरीव काम दिसते. यापैकी एका देवकोष्टकात शिव आणि पार्वतीची सुंदर मूर्ती आहे. सहसा मंदिरात असलेल्या मूर्तींमध्ये महादेव जटाधारी रुपात असतात. पण काळ्या दगडात कोरलेल्या येथील शंकराच्या डोक्यावर मुकुट आहे. चतुर्भुज रुपातील या शंकराच्या एका हातात त्रिशुल आहे व दुसऱ्या हातात नाग आहे. एक हात आशिर्वादासाठी समोर आहे आणि दुसरा हात डावीकडे बसलेल्या पार्वतीच्या खांद्यावर आहे. येथून पुढे अंतराळात प्रवेश होतो. अंतराळात असलेल्या गर्भगृहाच्या द्वारशाखांवर नक्षीकाम आहे. ललाटबिंबाच्या वरील भागात देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. गर्भगृहात जमिनीपासून वर शाळुंका असलेली कोरीव शिवपिंडी आहे. त्यावर पितळी नागाचा फणा आहे.
मंदिराच्या प्रदक्षिणामार्गावर तीन घुमट्या आहेत. या साऱ्या घुमट्यांच्या कमानीवर नीट पाहिले तर देवनागरी लिपीत काही अक्षरे कोरलेली दिसतात. त्यावरून मंदिराचे मूळ बांधकाम पंधराव्या शतकात झाले असावे आणि वेळोवेळी त्याचा जिर्णोद्धार झाला असावा, असा अभ्यासकांचा कयास आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ सभामंडपाच्या बाह्यभागावर काही ठिकाणी वीरगळ आणि सतीशिळा आहेत. या मंदिरावर कळस मात्र नाही. या मंदिरात महाशिवरात्रीला मोठा उत्सव होतो. यावेळी तालुक्यातील अनेक गावांतून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. याशिवाय श्रावणी सोमवारीही येथे भाविकांची गर्दी असते.