जाति न पूछो साधु की, पूछ लीजिये ज्ञान। मोल करो तरवार का, पड़ा रहन दो म्यान।। म्हणजेच अध्यात्म हा कुण्या एका जातीचा अधिकार नव्हे. सर्व मानव जातीवर परमेश्वराची सारखीच कृपा बरसते. त्यामुळे ज्ञानी पुरुषाला कोणत्याही जातीत बंदिस्त करू नये, असे कबीरदास म्हणतात. मानवतेची अखंड सेवा करणारे महान संत राजाराम भागूजी जाधव उर्फ कैकाडी महाराज यांचे कार्य असेच मानवतेच्या उद्धाराचे होते. या कैकाडी महाराजांचा पंढरपूर येथील मठ विविध शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. या मठातील कैकाडी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्याने अलौकिक समाधान अनुभवता येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
कैकाडी महाराजांचा जन्म १९०७ साली नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण गावी झाला. त्यांना ७१ वर्षाचे आयुष्य लाभले. २१ ऑक्टोबर १९७८ साली त्यांनी पंढरपुरात याच मठात देह ठेवला. आयुष्यभर मानव सेवा करणाऱ्या कैकाडी महाराजांनी परमेश्वराचा शोध घ्यावा म्हणून ऐन तारुण्यात सुखी संसाराचा त्याग केला. खऱ्या सुखाच्या शोधात भारत भ्रमण केले. याकाळात त्यांनी भारतातील अनेक भाषा अवगत केल्या. त्यांनी ३६ वर्षे तपश्चर्या केली. १२ वर्षे उभे राहून तप केले. पाच वर्षे हिमालयातील बर्फाळ गुहेत तर दोन वर्षे अज्ञातवासात व्यतीत केली. याच काळात त्यांना लहान बाळाच्या रूपात परमेश्वराचा साक्षात्कार झाला. त्यानंतर मानवसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद त्यांनी अखेरपर्यंत उराशी बाळगले. त्यांनी गरजेपुरते अन्न व लोकलज्जेपुरते कपडे हा नियम अंगिकारला. माणुसकी हाच खरा धर्म या विचारांचा आयुष्यभर प्रचार आणि प्रसार केला. शिष्यांनी गुरुदक्षिणा काय द्यावी असा प्रश्न केला तेव्हा आपणास नामजप लेखनाच्या वह्या द्याव्यात, असे महाराजांनी सांगितले. त्यांच्या भक्तांनी आपल्या विविध आराध्य, इष्टदेवांचे नामजप लिहून त्या वह्या महाराजांना अर्पण केल्या. एक सहस्र कोटी नामजप संकलन झाल्यावर त्याचे मंदिर उभारावे, अशी आज्ञा महाराजांनी आपले धाकटे बंधू तुकाराम काकांना केली. तुकाराम काकांच्या प्रयत्नाने हा आगळा वेगळा मठ पंढरपुरात उभा राहिला.
जुन्या पेठेतील या मठास भक्कम तटबंदी आहे. तटबंदीतील दुमजली प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दोन चौकोनी स्तंभ व त्यांतील देवकोष्टकांत देवतांच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष व वरील मजल्यावर नगारखाना आहे. या मठाची इमारत चार मजली आहे. इमारतीत उजव्या बाजूला विविध पुतळे व त्यांच्या बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. एकदा प्रदक्षिणा मार्गात प्रवेश केला की अर्ध्यातून बाहेर पडता येत नाही. प्रदक्षिणा मार्गावर अनेक ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. येथील दरवाजांची रचना विविध पशू-पक्षांच्या आकाराची असल्याने आकर्षक वाटते. प्रदक्षिणा मार्गात विविध दालने आहे. प्रदक्षिणेच्या मार्गात अनेक दरवाजे आहेत. प्रदक्षिणेचा मार्ग कधी आगगाडीतून जातो, कधी तो गायीच्या पोटातून अथवा गरुडाच्या छातीतून बाहेर पडतो, अशी अनेक आकर्षणे या प्रदक्षिणा मार्गात आढळतात.
मठातील पहिले दालन मातृदेवतांना अर्पण केलेले आहे. येथे अनेक संत, ऐतिहासिक पुरुष व त्यांच्या माता यांची शिल्पे आहेत. मठातील दुसऱ्या दालनात अनेक मुनी व ऋषींची शिल्पे आहेत. पुढे नवनाथ, तीर्थंकर, गौतम बुद्ध तसेच दशावतारांची शिल्पे आहेत. याशिवाय या मठात पुराणातील अनेक राजे महाराजांची शिल्पे, संत महंत व त्यांच्या आयुष्यातील प्रसंगशिल्पे आहेत. सुमारे एक हजारहून अधिक शिल्पे येथे आहेत. प्रत्येक शिल्पाजवळ त्यासंदर्भात माहिती लिहिलेली आहे. चारही मजल्यावरील शिल्पे पाहून खाली आल्यानंतर पुन्हा मठाच्या प्रांगणात प्रवेश होतो. येथे कैकाडी महाराजांचे समाधीमंदिर आहे. समाधी मंदिरासमोर स्वागत कमानीत दोन्ही बाजूला दोन चौथरे व त्यांवर सिंह व वाघ यांनी एकमेकांना अलिंगन दिलेले आहे, अशी शिल्पे आहेत. समाधीमंदिर प्रांगणापेक्षा उंच चौथऱ्यावर असल्याने वर जाण्यासाठी पाच पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला कठडे आहेत. चौथऱ्याच्या चारही बाजूंनी, पायरी मार्ग सोडून कठडे आहेत. या कठड्यांवर देवी देवतांची शिल्पे आहेत.
समाधी मंदिराच्या प्रवेशद्वारात दोन्ही बाजूला दोन नक्षीदार गोलाकार स्तंभ व स्तंभांवर महिरपी तोरण आहे. मंदिरात वज्रपिठावर कैकाडी महाराजांची योग मुद्रेतील ध्यानस्थ मूर्ती आहे. मंदिराच्या छतावर अनेक देवी-देवता, पशू व पक्षांची शिल्पे आहेत. या मठात अनेक वास्तू आहेत. त्यात भक्त निवास, स्वयंपाक घर, अन्नछत्र आदी इमारतींचा समावेश आहे. सर्व इमारती व त्यांच्या छतावर अनेक देवी-देवता, साधू-संतांची शिल्पे आहेत.
पंढरपुरातील इतर सर्व मंदिरे व मठांप्रमाणे आषाढी व कार्तिकी एकादशीला राज्यातील विविध भागातून आलेले भाविक समाधीच्या दर्शनासाठी येतात. यावेळी त्यांच्या निवास व अन्नाची व्यवस्था मठातर्फे केली जाते. मठात दरवर्षी २१ ऑक्टोबरला कैकाडी महाराजांच्या पुण्यतिथीचा सोहळा साजरा केला जातो. याशिवाय दररोज मठात नित्य नेमाने भजन, किर्तन, प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. दररोज सकाळी सात ते सायंकाळी ७ पर्यंत भाविक या मठात दर्शनासाठी येऊ शकतात.