शक्ती, भक्ती आणि समर्पण यांचे प्रतीक म्हणून हनुमानाला ओळखले जाते. देशभरात हनुमानाची वेगवेगळ्या स्वरूपातील मंदिरे आहेत. नाशिकमध्ये पंचवटी येथील हनुमान मंदिरही आगळेवेगळे आहे. येथील साडेअकरा फूट उंच आणि सात फूट रुंद हनुमानाची मूर्ती असलेले काट्या मारुती मंदिर प्रसिद्ध आहे. हनुमानाची उंच मूर्ती पाहण्यासाठी आणि याचना ऐकणारा मारुती, अशी ख्याती असल्यामुळे येथे अनेक भाविक दर्शनाला येतात.
मंदिराची आख्यायिका अशी की पांडव वनवासात असताना त्यांना येथे एका बाभळीच्या झाडाखाली हनुमानाची मूर्ती सापडली. बाभळीच्या काट्यांत सापडल्यामुळे तिला ‘काट्या मारुती’ म्हणून ओळखले जाऊ लागले. मूर्ती साडे अकरा फूट उंच आणि साडेसात फूट रुंद असल्यामुळे तिला ‘लंबे हनुमान’ असेही म्हटले जाते. पांडवांनी योग्य जागा पाहून या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर काही काळ त्यांनी या मूर्तीची सेवा केली.
काट्या मारुतीचे मंदिर छोटेखानी आहे. पंचवटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून गोलाकार घुमट म्हणजेच मंदिराचा कळस दिसतो. मंदिराचे प्रवेशद्वार लहान असले तरी त्यावर आकर्षक नक्षीकाम आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर पायऱ्या चढून काही अंतर पुढे जावे लागते. समोर प्रशस्त सभामंडप आहे. सभामंडपासमोर हनुमानाची मोठी मूर्ती आहे. मूर्ती मोठी असल्यामुळे गाभाऱ्यात जागा कमी आहे. पुजारी उभा राहून पूजा करू शकेल एवढीच जागा गाभाऱ्यात आहे. हनुमानाच्या गाभाऱ्याशेजारी राम आणि सीता यांच्या मूर्ती असलेला दुसरा गाभारा आहे. पेशवेकाळात हे मंदिर बांधण्यात आले, असे सांगण्यात येते; पण मंदिर कोणत्या वर्षात बांधण्यात आले याची निश्चित माहिती उपलब्ध नाही.
मंदिरातील मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. दगडात हनुमान कोरून त्यावर शेंदूर लेपलेला आहे. चांदीचा मुकुट, चांदीची गदा, चांदीचे हार यामुळे मूर्ती आणखी खुलून दिसते. उत्सवकाळात मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट केली जाते. गाभाऱ्याला छोटा दरवाजा आहे. त्याच्या बाहेर गाभाऱ्याची वेगळी चौकट तयार करण्यात आली आहे. त्यापुढे भाविकांना प्रवेश दिला जात नाही. उत्सव काळात मूर्तीला वेगवेगळ्या रंगांचा पोषाख केला जातो.
हनुमान जयंती आणि रामनवमीला काट्या मारुती मंदिरात उत्सव असतो. यावेळी सकाळी पाच वाजल्यापासून दर्शनाला गर्दी होते. हनुमान जयंतीला रात्री बारा वाजता हनुमान जन्माचा पाळणा घेतला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अभिषेक, पूजा, शेंदूर लेपन केले जाते. दुपारी भजन, कीर्तन केले जाते. भाविकांना महाप्रसाद दिला जातो. रामनवमीच्या दिवशीही महाप्रसादाचे वाटप केले जाते. या दिवशी भाविक येथील राम मंदिरातून या मंदिरात हनुमानाच्या दर्शनाला येतात.
मंदिरात सकाळी १० वाजता आरती केली जाते. त्यानंतर दुपारी मारुतीच्या मूर्तीला नैवेद्य दाखविला जातो. सायंकाळी ७ वाजता पुन्हा आरती केली जाते. मंदिरात पहाटे ५ ते रात्री १० वाजेपर्यंत दर्शन घेता येते.