पुण्यातील शिवाजीनगर परिसरात गर्द वनराजींनी बहरलेल्या एका उंच भागात श्री सद्गुरू जंगली महाराज मंदिर आहे. १३३ वर्षांपूर्वीचे हे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील विशेष म्हणजे १८९० पासून आजतागायत या मंदिरात अखंड नंदादीप तेवत ठेवण्यात आला आहे.
सिद्धयोगी जंगली महाराजांचा जन्म सोलापूरजवळील होनमुर्गी येथे झाला. लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेच्या महाराजांनी मराठी, कन्नड, संस्कृत सोबत उर्दू, फारसी भाषांवर प्रभुत्व मिळवले. मल्लविद्येतही ते पारंगत होते. त्यांनी विविध धर्मांचा अभ्यास करतानाच आयुष्यभर सर्वसमावेशक भूमिका अंगीकारली. वेद, योगशास्त्र, मंत्रशास्त्र, राजयोग, हठयोग असा विद्याभ्यास करत ते संन्यासी म्हणून देशभर फिरत होते. या प्रवासात त्यांनी देवस्थानांचा जीर्णोद्धार केलाच, पण मोठा शिष्यगणही अनुग्रहीत केला. त्यांच्या सिद्धीची अनुभूती अनेकांना आली.
देशभर भ्रमंती करून जंगली महाराज १८६८ मध्ये पुण्याला येण्यापूर्वी श्री क्षेत्र देहू येथे थांबले होते. असे म्हटले जाते की, देहूत त्यांनी तुकाराम महाराजांच्या घरापासून ते त्यांच्या वैकुंठगमनाच्या स्थळापर्यंतचा रस्ता बांधून घेतला आणि भक्तांसाठी धर्मशाळा व पुंडलिकाचे मंदिर बांधले. पुण्यात आल्यानंतर भांबुर्डे गावातील रोकडोबा मंदिरात ते वास्तव्यास होते. या मंदिरात पशू बळी, बगाड अशा अघोरी प्रकारांबरोबरच रेड्यांच्या झुंजी आणि तमाशांचे फड लागत असत. (बगाड म्हणजे, नवसपूर्तीसाठी स्त्री-पुरुषांच्या पाठीत मोठा लोखंडी गळ टोचून त्यांना एका लाकडाच्या मोठ्या खांबावर लटकवले जाते व ती काठी पाच किंवा सात वेळा मंदिरासमोर फिरवली जाते.) महाराजांनी वास्तव्य सुरू केल्यानंतर तेथील अनिष्ट प्रथांना पायबंद लावला. मंदिरात मारुतीची प्रतिष्ठापना करून नामसंकीर्तन आणि बलोपासनेला चालना दिली. (सुदृढ, निरोगी शरीरयष्टी व स्वसंरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या कसरतीला बलोपासना म्हटले जाते.) येथे रात्रंदिवस भजन-कीर्तन होऊ लागले. करमणुकीसाठी तमाशांऐवजी कुस्त्यांचे फड रंगू लागले. जंगली महाराजांनी १८८१ मध्ये स्थापन केलेले भजनी मंडळ आजही तेवढ्याच भक्तिभावाने भजन सेवेत दंग आहे.
आयुष्याची अखेर आल्याची चाहूल लागल्यावर त्यांनी भांबुर्ड्याच्या टेकडीवर आपल्या समाधीची जागा निश्चित केली. तेव्हा तिथे अक्षरशः जंगल होते. ४ एप्रिल १८९० रोजी महाराजांचे देहावसान झाले आणि तेव्हापासून या टेकडीवर महाराजांची समाधी आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या परमभक्त रखमाबाईंनी त्यांचा संप्रदाय आयुष्याच्या अखेरपर्यंत चालवला. फेब्रुवारी १९०२ मध्ये त्यांचाही स्वर्गवास झाला. त्यांची समाधी महाराजांच्या समाधीजवळच उभारण्यात आली आहे. हे स्थान म्हणजे आजचे जंगली महाराज मंदिर.
मंदिराच्या प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. येथून वर मंदिरात जायला पायऱ्या आहेत. काही पायऱ्या चढून गेल्यावर मंदिराच्या प्रांगणात पोचतो. तेथे डाव्या बाजूला पंच्याहत्तर फूट उंच ध्वजस्तंभ आहे. १९६७ पूर्वी येथे कमी उंचीचा स्तंभ होता. मात्र तो हलू लागल्यानंतर नव्या ध्वजस्तंभाची उभारणी करण्यात आली. त्यासाठी पाच फूट उंचीचा षटकोनी चौथरा बांधून दोन फूट उंचीची पक्की कमळाची प्रतिकृती बांधण्यात आली आहे. त्याच्या मध्यभागी उंचच उंच ध्वजस्तंभ उभा आहे. यावर सोन्याचे लेपन केलेला कळस बसविलेला असून त्यावर सदैव भगवा ध्वज फडकत असतो.
प्रांगणातून पुढे गेल्यावर हंड्या, झुंबरांनी सुशोभित केलेला मोठा मंडप लागतो. तेथे डाव्या बाजूस नगारा, तर उजवीकडे एक समाधीस्थान आहे. ही समाधी जंगली महाराजांच्या गुरूंची आहे, असे म्हटले जाते. नगाऱ्याच्या डावीकडे एका मंदिरात पादुका प्रतिष्ठापित आहेत. तेथे महाराजांच्या स्नानाचे ठिकाण होते, अशी मान्यता आहे.
मंडपातून पुढे आल्यावर महाराजांचे प्रशस्त समाधीस्थान आहे. दक्षिणोत्तर बांधण्यात आलेल्या या समाधीच्या मागे अंदाजे दहा फूट उंचीचे महाराजांचे भव्य तैलचित्र आहे. मानेपासून कमरेपर्यंत रुळलेला जटासंभार, कपाळावरील उभे गंध, तेजस्वी डोळे, जिवंत वाटणारा चेहरा, पिळदार देहयष्टी असे ते चित्र पाहताना भाविक तल्लीन होऊन जातात. हा सगळा परिसरच भक्तिमय वातावरणाने भारलेला वाटतो.
हे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सद्गुरूंनी ४ एप्रिल १८९० मध्ये समाधी घेतली, तेव्हापासून आजतागायत समाधी स्थानाजवळ अखंड नंदादीप तेवत ठेवण्यात आला आहे. सद्गुरुंच्या पुण्यतिथीचा सोहळा पंधरा दिवसांचा असतो. त्यामध्ये प्रवचन, कीर्तन, भजन, गायन, व्याख्यान असे कार्यक्रम असतात.
मंदिरात रोज सूर्योदयापूर्वी महाराजांच्या समाधीला मंगलस्नान घालून पूजा केली जाते. त्यानंतर कापूर आरती होते. सूर्यास्तास आरती, सायंप्रार्थना आणि रात्री नऊ वाजता पंचपदी होऊन शेजारती करण्यात येते. सोमवार आणि गुरुवारी पहाटे ५.३० ते रात्री १० पर्यंत मंदिरात हजारो भक्त दर्शनासाठी येतात. इतर दिवशी हीच वेळ सकाळी ५.३० ते दुपारी १ व सायंकाळी ४ ते रात्री १० अशी असते.