आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरातून जेव्हा वारकऱ्यांची दिंडी पंढरपूरसाठी प्रस्थान करते, त्या वेळी त्या मंदिराचा कळस हलतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. हे दृश्य पाहण्यासाठी देश-विदेशातून लाखो भाविक आळंदी येथे गर्दी करतात. अशाच वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध असलेले आणखी एक प्राचीन मंदिर जालना जिल्ह्यातील पारडगाव येथे आहे. येथील जोगेश्वरी काळभैरवनाथ मंदिर विशेषतः डोलणाऱ्या दीपमाळांसाठी प्रसिद्ध आहे. वार्षिक पालखी सोहळ्याच्या वेळी मंदिरासमोरील एक दगडी दीपमाळ काहीशी डोलते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. हा सोहळा पाहण्यासाठी या काळात येथे हजारो भाविकांची गर्दी जमते.
पौराणिक संदर्भानुसार, भगवान शिवाचे उग्र आणि भीषण रूप असलेले भैरवनाथ हे मूलतः एक महत्त्वाचे लोकदैवत मानले जाते. भैरव हा भगवान शंकराचा प्रमुख गण आहे. पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखालाही भैरव असे संबोधले जाते. शैव आगमांनुसार भैरवाचे आठ प्रकार मानले जातात आणि त्यांच्या प्रमुखांना अष्टभैरव म्हणतात. महाराष्ट्रातील गावागावांत हे दैवत काळभैरवनाथ, काळभैरी, बहिरीनाथ, भैरी, भैरोबा आणि सिद्धनाथ अशा विविध नावांनी पूजले जाते. नागराजाची कन्या असलेली माता जोगेश्वरी ही काळभैरवनाथांची पत्नी मानली जाते.
याच कारणामुळे या मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर नागदेवतेची स्वतंत्र प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
पारडगावच्या सीमेवर जोगेश्वरी काळभैरवनाथांचे हे मंदिर आहे. मंदिराच्या भोवती एक भक्कम दगडी तटभिंत बांधलेली आहे. या तटभिंतीतील दुमजली प्रवेशद्वाराजवळ जिवाजी बाबांचे एक लहान मंदिर आणि नागदेवतेचे स्थान आहे. या ठिकाणी प्रथम नागदेवतेचे दर्शन घेऊन मगच मुख्य भैरवनाथाच्या दर्शनाला जाण्याची प्रथा आहे. प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस एकूण नऊ भव्य दीपमाळा उभारलेल्या आहेत. यांपैकी पाच दीपमाळा पारंपरिक चिरेबंदी दगडी बांधकामातील आहेत, तर उर्वरित चार दीपमाळा विटा आणि सिमेंटच्या आहेत. या दीपमाळांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या माथ्यावर तुळशीवृंदावने आहेत. नवदीपमाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दीपमाळा उत्सवांच्या वेळी शेकडो दिव्यांनी उजळून निघतात.
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार किल्ल्यासारखे भव्य, रुंद आणि चिरेबंदी दगडांनी बांधलेले आहे. या प्रवेशद्वाराच्या वरच्या मजल्यावर नगारखाना आहे. येथे आजही दररोज सकाळ-संध्याकाळ नगारे वाजवले जातात. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर मंदिराचे प्रशस्त प्रांगण दिसते. तटभिंतीच्या आतील बाजूस सर्वत्र दगडी बांधणीच्या ओवऱ्या आहेत. या ओवऱ्यांमध्ये प्रवेशद्वाराच्या आतील बाजूला मारुती, गरुड आणि रक्षकदेवतांच्या शेंदूरचर्चित मूर्ती आहेत. नगारखान्याच्या मागील बाजूच्या भिंतीवर नवग्रहांची चिन्हे आणि नक्षीकाम कोरलेले आहे.
प्रांगणात मुख्य मंदीरासमोर धातूचा एक मोठा त्रिशूळ आहे. त्रिशुळ हे भैरवनाथ दैवताचे मुख्य प्रतीक मानले जाते. त्यापुढे होमकुंड आणि त्यापुढील उंच अधिष्ठानावर मंदिर आहे. हे मंदिर प्रामुख्याने उत्तर-मध्ययुगीन काळातील विशेषतः मराठा कालखंडातील स्थापत्यशैलीचे प्रतिनिधित्व करते. या मंदिराची रचना दोन प्रमुख भागांत विभागलेली आहे. मंदिराचा पाया आणि गर्भगृहाच्या भिंती भक्कम दगडी बांधकामात आहेत, तर वरचे शिखर विटा आणि चुन्याच्या साहाय्याने तयार केलेले आहे. महाराष्ट्रातील मराठा काळातील मंदिरांमध्ये ही रचना प्रामुख्याने आढळते.
हे मंदिर उंच आणि भक्कम दगडी अधिष्ठानावर म्हणजेच जगतीवर उभे आहे. हे बांधकाम कोणत्याही अतिरिक्त नक्षीकामाशिवाय साध्या आणि सुबक चिरेबंदी पाषाणात केलेले आहे. मंदिराच्या बाह्य भिंती पाषाणाच्या आहेत आणि वरच्या भागात छताच्या खाली दगडी कपोत काढलेले आहेत. या कपोतांवर विविध देवदेवतांची व त्यांच्या वाहनांची शिल्पे कोरलेली आहेत.
प्रांगणातून चार पायऱ्या चढून उंच अधिष्ठानावर असलेल्या मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपाचे छत कोरीव नक्षीकामाने युक्त आहे. गर्भगृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या शाखेवर पुष्पलता आणि वेलींचे कोरीव काम केलेले आहे. गर्भगृहात एका उंच वज्रपीठावर भगवान भैरवनाथांची भव्य शेंदूरचर्चित मूर्ती आहे. पूजेच्या वेळी या मूर्तीला पारंपरिक फेटा आणि सोवळे नेसवले जाते. मुख्य मूर्तीच्या उजव्या बाजूस बटुक भैरवनाथांची लहान मूर्ती आणि डाव्या बाजूस माता जोगेश्वरी व भैरवनाथांची बहीण बागेश्वरी यांच्या मूर्ती आहेत. अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण शेंदूर लेपनामुळे या मूर्तींचे मूळ पाषाण रूप आता स्पष्टपणे दिसत नाही. या मुख्य मूर्तींशिवाय उत्सवाच्या काळात पालखीत ठेवण्यासाठी एक स्वतंत्र उत्सवमूर्तीही येथे आहे.
मंदिराच्या बाह्य भिंतींवर शरभ शिल्पे कोरलेली आहेत. एकाच वेळी आपल्या चार पायांत चार हत्ती, सोंडेत एक हत्ती आणि स्वतःच्या शेपटीने आणखी एका हत्तीला उचलून घेऊन जाणारा एक शक्तीशाली काल्पनिक प्राणी असे या शरभ शिल्पाचे रूप आहे. या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याचे बहुस्तरीय शिखर होय. हे शिखर मराठा स्थापत्यशैलीतील नागर पद्धती आणि दख्खनी सुलतानी प्रभावाचे मिश्रण मानले जाते. शिखर अनेक आडव्या थरांमध्ये वर चढत जाते. प्रत्येक थरावर लहान कमानीदार देवकोष्टके आहेत. त्यांत विविध देवदेवतांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. शिखराच्या कोपऱ्यांवर लहान मिनार स्तंभ उभारलेले आहेत. शिखराच्या एका कोपऱ्यावरील स्तंभावर वर चढणारे नागशिल्प कोरलेले स्पष्टपणे दिसते. शिखराच्या वरच्या भागात एक घुमटाकार आमलक आणि त्यावर कळस आहे. मंदिर परिसरात महादेव आणि श्रीदत्त यांची लहान मंदिरे आहेत, तसेच एक प्राचीन औदुंबराचा वृक्ष आहे. मंदिराच्या मागील बाजूस पाण्याचा एक जुना दगडी बारव म्हणजेच पायऱ्यांची विहीर आहे.
येथे चैत्र नवरात्र हा मुख्य उत्सव म्हणून साजरा केला जातो. या नऊ दिवसांत मंदिरात अखंड शिवपुराण कथेचे आख्यान होते. चैत्र महिन्याच्या शेवटच्या रविवारी या यात्रेचा मुख्य सोहळा पार पडतो.
यानंतर आश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रात माता जोगेश्वरीचा उत्सव साजरा केला जातो आणि घटस्थापना केली जाते. या काळात अनेक सुवासिनी महिला कडक व्रत करून मंदिर परिसरातच मुक्काम करतात. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला येथे मोठ्या उत्साहात काळभैरव जन्मोत्सव साजरा केला जातो.
या मुख्य उत्सवांशिवाय दर रविवारी आणि अमावस्येच्या दिवशी जोगेश्वरी देवी व भैरवनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात. या विविध उत्सवकाळात भैरवनाथांच्या उत्सवमूर्तीची पालखी काढली जाते. या पालखी सोहळ्याविषयी असे सांगितले जाते की ही पालखी मंदिरातून बाहेर पडताना जड होते. सुरुवातीला केवळ दोन व्यक्ती ही पालखी उचलतात, परंतु मुख्य प्रवेशद्वाराजवळ येताच तिचे वजन वाढल्याने ती उचलण्यासाठी आठ भाविकांना जोर लावावा होतो.
पालखी जेव्हा मुख्य प्रवेशद्वारातून बाहेरील प्रांगणात येते, नेमक्या त्याच वेळी समोरील दगडी दीपमाळ काहीशी संथपणे डोलू लागते. हा चमत्कार पाहण्यासाठी हजारो भाविक येथे उपस्थित असतात. दररोज सकाळी पाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात दर्शनासाठी येता येते.